You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना: माझ्या भागात हनुमान चालिसा न लावता अजानचा आवाज कंट्रोल झालाय'- वसंत मोरे
- Author, मानसी देशपांडे,
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून.
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
पुण्याच्या कात्रज भागातले मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शनिवारी हनुमानाच्या माहाआरतीचं आयोजन केलं होतं. ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची या राज ठाकरेंच्या आवाहनाला मोरेंनी असहमती दर्शवली होती.
"मला माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने मी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार नाही," अशी भूमिका त्यावेळी त्यांनी मांडली होती. याच मुद्द्यावरून पक्षाने वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरुन बाजूलाही केलं गेलं. यानंतर 4 तारखेला जेव्हा राज्यभर मनसेनं भोंग्याविरोधात आंदोलन केलं, तेव्हा मात्र वसंत मोरे पुण्यात नव्हते.
पुण्यात परतल्यानंतर त्यांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं. आधी विरोध आणि मग महाआरतीचं आयोजन, अशी विरोधाभासी भूमिका त्यांनी का घेतली, यावर त्यांच्यांशी साधलेला हा संवाद -
प्रश्न - भोंग्याविरोधातल्या आंदोलनावर असहमती दाखवल्यानंतर आता महाआरतीचं आयोजन हा तुमच्या भूमिकांमधला विरोधाभास नाहीये का?
वसंत मोरे- माझी पहिली भूमिका ही एक लोकप्रतिनिधी म्हणून मांडली होती. मी पंधरा वर्षं या भागात मनसेचं नेतृत्व करतोय. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो कसं काम करतो हे कार्यकर्त्यांना सध्या कळत नाही.
माझी भूमिका ही राजसाहेबांच्या विरोधातली नव्हती. ती लोकप्रतिनिधीची भूमिका होती. माझ्या भागात कोणत्याही प्रकारे हनुमान चालिसा न वाजवता अजानवरच्या आवाजावर कंट्रोल आला. माझ्या मुस्लीम बांधवांनी सहकार्य करुन अजानच्या आवाजाचा डेसिबल कमी केलाय.
प्रश्न - मग आता हनुमान आरतीच्या आयोजनाच्या मागचा उद्देश काय आहे?
वसंत मोरे - माझ्या खिशात या आरतीसाठी पोलिसांची परवानगी आहे. पोलीस परवानगी द्यायला तयार आहेत. जर मनसेच्या पुण्यातल्या सगळ्या नेत्यांना शहरातल्या आठही विधानसभा मतदारसंघात अशाप्रकारे आरत्या करता आल्या असत्या.
प्रश्न - तुमच्या मुस्लीम मतदारांपर्यंत या आरतीच्या माध्यमातून कोणता संदेश जातोय असं तुम्हाला वाटते?
वसंत मोरे - त्यांनी स्वतः अजानवर कंट्रोल केलाय. आम्ही हनुमान चालिसा, म्हणून आरती म्हणून आमचं पहिल्यापासूनचे संबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करतोय. या भागात कोणत्याही प्रकारचे दंगेधोपे होणार नाही याची काळजी घेतोय.
प्रश्न - हे एका दिवसाचे आंदोलन नाही हे मनसेने स्पष्ट केलंय. त्यामुळे या पुढे मनसेमधला तुमचा प्रवास कसा असेल?
वसंत मोरे - माझा राज ठाकरेंवर पूर्ण विश्वास आहे. माझा प्रवास हा त्यांच्याचपासून सुरू झालाय. बाकीच्यांनी बोलणं बंद करावं. त्यांनी मला जे सांगायचंय ते सांगितलंय.
प्रश्न - तुम्हाला तुमच्या पद्धतीने व्यक्त होण्याचं पक्षात स्वातंत्र्य आहे का?
वसंत मोरे - मी एक लोकप्रतिनिधी आहे. माझ्या भागात मी अशाच प्रकारे काम करत आलोय. माझ्या भागात मला विकासकामांसाठी ओळखलं जातं. त्यामुळे इथे मी माझ्या पद्धतीने या आरतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय.
प्रश्न - तुमच्या सारखेच मुस्लीम मतदार असेलेल्या मनसेच्या नेत्यांनी आता पक्षात कसं राहावं?
वसंत मोरे - ते ज्याचं त्याने ठरवायचंय की कशापद्धतीने काम करायचंय.
प्रश्न - आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या नवीन धोरणाचा पक्षाला फायदा होईल का?
वसंत मोरे - माझ्या भावाविषयी बोलायचं तर, आमचा भाग हा शहराचा उपनगरीय भाग आहे. या भागातल्या मतदारांची मानसिकता थोडी वेगळी आहे. या भागात राहणारे मुस्लिम हे 25-30 वर्षांपासून इथेच राहणारे आहेत.
त्यांच्या तीन-चार पिढ्या इथेच वाढल्या आहेत. माझ्या अगदी लहानपणापासूनचे संबंध आहेत. त्यामुळे मला इथे मला काही अडचण येईल असं मला वाटत नाही. माझे मतदार मला समजून घेतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)