You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हैदराबाद ऑनर किलिंग : 'माझ्या नवऱ्याला मारणाऱ्या भावावरील रागामुळेच मी सध्या जिवंत आहे'
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी, हैदराबादहून
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"मला माझ्या भावाला भेटायचं आहे. राज नाही तर मीसुद्धा जिवंत राहू इच्छित नाही. पण माझ्या भावाचा जो राग मला आला आहे तोच मला जिंवत ठेवायला एकमात्र कारणीभूत आहे. राजला, माझ्या नव-याला त्यानं ज्या प्रकारे मारलं, मला त्याच्यासोबत तेच करायचं आहे. त्यालासुद्धा हे समजायला पाहिजे की आमच्यासोबत काय झालं आहे..."
उद्वस्त झालेली आशरीन सुल्ताना आम्हाला सांगत असते. ती पराकोटीचं बोलत असते, पण जे तिनं स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि सध्या भोगते आहे, ते विचारात घेता हे बोलणं समजू शकतं. ती येण्या-या प्रत्येकाला हीच भावना बोलून दाखवते आहे. आशरीनची अवस्था केवळ जाणीवेनंच आपल्याला घाबरवून सोडणारी आहे.
धर्माचे, जातींचे नियम तोडून, जीवावर खेळून ज्याच्यावर प्रेम केलं आणि चार महिन्यापूर्वीच लग्न करुन आयुष्यभर ज्याच्यासोबत रहायचं तिनं ठरवलं, त्या नागराजूची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. ती हत्या करणारा तिचा सख्खा भाऊ मोबिन आहे.
लग्नाला पहिल्यापासून विरोध असल्यानं तिच्या माहेरचे दरवाजे तर कधीच बंद झाले आहेत. ती यापूर्वी कधी नागराजूच्या घरी आली नाही. आता तिथं येण्याशिवाय पर्याय नाही. तिला कुठे जायचं हे माहित नाही.
नागराजूची हत्या ईदच्या दुस-या दिवशी, 4 मे रोजी, हैद्राबादमध्ये झाली. देशभरात ती घटना, तो व्हीडिओ पाहून, धक्क्याची एक लाट सळसळत गेली. ते विसरता येत नाही. दोघे जण अमानुषपणे लोखंडी हत्यारांनी नागराजूवर वार करताहेत. आशरीन त्याला वाचवायचा आटोकाट प्रयत्न करते आहे. बाजूला गर्दी आहे, बघे आहेत. पण कोणी मदतीला येत नाही. त्या धांदलीत तिला दिसतं की मारणारा आपला भाऊच आहे.
आशरीन नंतर आम्हाला सांगते की तिनं त्याही अवस्थेत भावाला म्हटलं की, तुला जर मला परत घरी घेऊन जायचं असेल तर मी येते, पण तिच्या नागराजूला सोडा. पण तसं झालं नाही.
कारण हे होतं की नागराजू एका हिंदू दलित कुटुंबातून येतो आणि आशरीन एका मुस्लिम कुटुंबातून. धर्माची एक मोठी पुराणभिंत त्यांच्या मध्ये उभी होती. आशरीनच्या कुटुंबियांना हे अजिबात नको होतं. खास करुन तिच्या भावाला. त्याचा राग यापूर्वीही लपला नव्हता, असं सगळे आता सांगतात. पण आशरीनला नागराजूसोबत आयुष्य व्यतीत करायचं होतं. हा रस्ता नागराजूच्या ऑनर किलिंगकडे गेला.
आता जेव्हा या दोघांच्या प्रेमाची कहाणी, त्याला झालेला विरोध, पूर्वीच्या काही घटना समोर येत आहेत, तेव्हा हे समजतं की दोघांनाही कल्पना होती, भीती होती की ज्या रस्त्यावरुन आपण चाललो आहोत, त्यावर पुढे काय होऊ शकतं. त्या जाणीवेतूनच ते पुढची पाऊलं टाकते होते. पण या शक्यतेमुळे ते घाबरले नाहीत आणि स्वत:च्या प्रेमाचा बळी द्यायला तयार झाले नाहीत.
त्यांच्या या कहाणीशी संबंध आलेल्या कोणालाही आम्ही भेटलो, विचारलं, तेव्हा समजलं, आशरीन आणि नागराजू जाणीवपूर्वक या रस्त्यानं चालत गेले.
कॉलेजमध्ये झाली होती भेट
हैद्राबादपासून साधारण ऐंशी किलोमीटर अंतरावर विकाराबाद आहे. याच तालुक्यात मारपल्ली नावाचं गाव आहे जे नागराजूचं गावं. इथून साधारण दहा किलोमीटरवर गणपूर आहे जे आशरीनचं गावं. पण तिथं आता तिच्या कुटुंबातलं कोणीही नसतं. हा सगळा पट्टा, हिंदू आणि मुस्लिम, दोघांच्याही बहुसंख्येचा. डोळ्यालाही ते दिसतं. याच गावातल्या कॉलेजमध्ये नागराजू आणि आशरीन दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले. मैत्री झाली. नकळत ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
आम्ही जेव्हा या गावात पोहोचलो तेव्हा आशरीनसह नागराजूचं कुटुंब, सगळे नातेवाईक गावाबाहेर असलेल्या त्यांच्या समाजाच्या दफनभूमीमध्ये असतात. आठवणींच्या कढ आला आहे. नागराजूनं गाव सोडून जवळपास दोन वर्षं झाली आहेत. पण एकंदरीत विरोध पाहता, वातावरण पाहता आणि सामाजिक वास्तव पाहता असं दिसतं की, त्याला इथे परत यायचं नव्हतं. म्हणून तो हैद्राबादला गेला. तिकडंच त्यांनी लग्न केलं. त्रास नको म्हणून काही दिवस विशाखापट्टणमला ते जाऊन राहिले. हैद्राबाद सुरक्षित असेल म्हणून परत आले, पण तसं झालं नाही.
नागराजूला जिथं दफन केलं आहे तिथं त्याचे आजोबा नागरपल्ली जगन आम्हाला भेटतात. त्यांच्याकडून समजतं की नागराजूनं त्याच्या घरीही लग्नाबद्दल सांगितलं नव्हतं. कारण आशरीनच्या घरच्यांचा तीव्र विरोध माहीत होताच. त्यांच्यापर्यंत काही पोहोचू नये. घाबरुन त्यानं स्वत:च्या घरी काही सांगितलं नाही.
"प्रश्न आम्हाला पसंत होतं की नाही हा नाहीच आहे. आम्हाला काही माहितीच नव्हतं तर आम्ही काय मत सांगणार? त्यांचं लग्न झालं तेव्हा आम्हाला समजलं की, असं काही आहे. त्यांनी घरी सांगितलं नाही. मुलगी मुसलमान, हा हिंदू. तिच्या घरचे लोक हिंदूशी लग्न करायला तयार नव्हते म्हणून हा स्वत:च्या घरी बोलू शकला नाही. तो घाबरला. इथे सांगितलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता," जगन सांगतात.
पण हे फार काळ लपून राहिलं नाही. आशरीनच्या घरच्यांनी लग्न झालं आहे हे समजताच पोलिसांत तक्रार केली. मुलगी हरवली आहे म्हणून. पण हे दोघं पोलिसांत हजर झाले तेव्हा समजलं की, ते कायद्यानं सज्ञान आहेत आणि नियमांनुसार त्यांनी सगळं केलं आहे. पण आशरीनच्या भावाचा राग काही कमी झाला नाही. त्यांनी विरोध करण्याचे, हे संबंध तोडण्याचे अनेक प्रयत्न केले.
घरच्यांना आशरीनला 'परत' न्यायचं होतं
या प्रयत्नांबद्दल मुहम्मद कलिमुद्दिन आम्हाला सांगतात. ते या पंचायतीचे प्रमुख राहिले आहेत. इथलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे गावातले तंटेबखेडे घेऊन लोक त्यांच्याकडे येतात. तसेच आशरीनचे नातेवाईकही शेजारच्या गावातून त्यांच्याकडे आले होते. त्यांचं म्हणणं होतं की, या विवाहामुळं त्यांना त्यांच्या समाजात त्रास होतो आहे. त्यांना आशरीनला परत घरी न्यायचं होतं.
कलिमुद्दिन सांगतात की त्यांनी त्या नातेवाईकांना समजावलं.
"मी म्हटलं की मी काही करु शकत नाही. जर ती दोघं शांतपणे आली, तुम्ही शांतपणे आलात तर काही बोलणी होऊ शकतील. पण ते दोघेही सज्ञान आहेत. आपला त्यांच्यावर अधिकार नाही. कायद्यानं लहान असते तर काही सांगू शकलो असतो. पण कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाही. ते दोघे आपलं भविष्य स्वत: ठरवू शकतात. तुम्ही त्यात हस्तक्षेप करु नका," असं ते म्हणतात.
पण तेव्हा कलमुद्दिनना वाटलं नाही अवघ्या तीन महिन्यात प्रकरण एवढ्या टोकाला जाईल की कोणाचा त्यात जीव जाईल. त्यांचं ऐकलं गेलं नाही. ते म्हणतात की या ग्रामीण भागात आंतरधर्मीय लग्नं फारशी होत नाहीत. पण दोन समुदायांमध्ये वैर आहे, भांडणं आहेत असंही नाही. इथं मात्र आशरीनचा राग मर्यादा ओलांडून गेला.
आर्य समाज पद्धतीने लग्न
31 जानेवारी 2022 ला, म्हणजे चार महिन्यांपूर्वी नागराजू आणि आशरीनचं लग्न झालं. ते झालं आर्य समाजी पद्धतीनं. आर्य समाजी धार्मिक पद्धती करतात, पण ते उदारही असतात. हैदराबादच्या लक्ष्मीनगर या जुन्या शहरातल्या ज्या आर्य समाज कार्यालयात त्यांचं लग्न झालं तिथं आम्ही गेलो. एम रविंद्र हे इथं पुरोहित आहेत. त्यांनीच या दोघांचंही लग्न लावलं. ते म्हणतात की, इथं आंतरधर्मीय लग्नं होतात, पण ते बहुतांश शहरांतली असतात. ते स्वत: वर्षाला साधारण आठ-दहा अशी लग्नं लावतात.
पण अशी लग्न लावण्याअगोदर या जोडप्यांचं समुपदेशन केलं जातं. त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या मताविषयी माहिती घेतली जाते. ते जे करताहेत त्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे का हे समजून घेतलं जातं. तसंच समुपदेशन नागराजू-आशरीनचंही झालं होतं.
"त्यांच्या कुटुंबात विरोध होता. कुटुंबातले सगळे हा विवाह मान्य करणार नाही म्हणून त्यांना भीती वाटत होती," रविंद्र सांगतात.
पण इथं लग्न करतांना इतर धर्मातल्या व्यक्तीला हिंदू धर्मात यावं लागतं. तो निर्णय आशरीननं घेतला होता. "जेव्हा ख्रिश्चन किंवा मुस्लिम येतात तेव्हा त्यांना हिंदू धर्मात यावं लागतं. त्यांना प्रमाणानुसार काही गोष्टी करव्या लागतात. मगच लग्न होतं. जे हे मान्य करतात त्यांचंच इथं लग्न होतं. या दोघांच्या लग्नावेळेसही तसं झालं. त्यांनी गायत्री मंत्रंही म्हटला," रविंद्र सांगतात.
लग्नासाठी आशरीन धर्माची भिंत ओलांडून 'पल्लवी' झाली. ती पण हे सांगते. पण त्यांच्या दृष्टीनं हे प्रेमात, आयुष्यात एकत्र येण्यासाठी धर्म कधीच आडवा येणार नव्हता. दोघंही स्वत:च्या धर्माची रेखा ओलांडायला तयार होते. तो निर्णय आशरीननं घेतला. "मला कोणतीच अडचण नव्हती की राज हिंदू होता. मला तो फक्त असा दिसायचा की तो केवळ माझ्यासाठी आहे. हिंदू-मुस्लिम असं काही नाही. आम्ही एकमेकांसाठीच आहोत. एकमेकांना समजून घेऊ शकतो. आयुष्यभर एकमेकांसोबत राहू शकतो," ती सांगते.
तिचं या दु:खातही स्पष्टपणे असं बोलणं हे दाखवून देतं की जरी त्यांना माहिती होतं की रस्ता सोपा नाही, पण तरीही धर्माच्या भिंती त्यांच्यासाठी विरघळल्या होत्या. ते प्रेमानं केलं होतं. पण ज्यांना या भिंती उभ्याच हव्या होत्या, त्याचा संबंध ज्यांच्याशी अभिमानाचा होता, त्यांनी नागराजू आणि आशरीनच्या स्वप्नांचा जीव घेतला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)