You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कराची विद्यापीठात बॉम्बस्फोट, तीन चिनी नागरिकांसह चौघांचा मृत्यू
पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात मंगळवारी (26 एप्रिल) एका बॉम्ब स्फोटात तीन चिनी शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
विद्यापीठातील फॉरेन फॅकल्टीपासून कन्फ्यूशियस केंद्राच्या दिशेने येणाऱ्या व्हॅनमध्ये हा स्फोट झाला.
संचालक आणि दोन शिक्षकांचा यात मृत्यू झाला आहे. स्फोट झालेल्या व्हॅनच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला आहे.
हुआन गुइपिंग, दिंग मुपेंग आणि चेन साई अशी मृतकांची ओळख पटली आहे. गुईपिंग हे केंद्राचे संचालक होते. दिंग मुपेंग आणि चेन साई हे या केंद्रातील शिक्षण होते.
मृत्यू झालेल्या ड्रायव्हरचे नाव खालिद आहे. या स्फोटात एक चिनी नागरिक आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.
सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोघांनाही जखम झाल्याचं समोर आलं आहे. जवळच्या पटेल हॉस्पिटलमध्ये जखमींना दाखल केलं आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटिव्ही फूटेज ताब्यात घेतलं असून तपास सुरू केला आहे.
स्फोट कुठल्या प्रकारचा होता हे आताच स्पष्ट होणार नाही, यासंदर्भात चौकशी सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं.
वृत्तपत्र आणि वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा,
1. घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारींना हिंदुत्व शिकवू नये-मुख्यमंत्री
"बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं आहे, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. हे कुठून आले घंटाधारी हिंदुत्वावादी? घंटाधारी हिंदुत्वावाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. जिकडे हनुमान चालीसा म्हणायची तिकडे म्हणा. भीम रुपी महारुद्र काय असतं. शिवसेना अंगावर आले तर शिवसैनिक दाखवतील. आमचं हिंदुत्व हनुमानाच्या गदेसारखी आहे," असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
"सध्या सभेचे पेव फुटले आहे, मीही सभा घेणार आहे. या सभेत सगळ्यांचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे. नव हिंदू आणि तकलादू आणि नकली हिंदूत्वादी आले आहे, तुमचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा आहे, असं म्हणणाऱ्यांचा समाचार घ्यायचा आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचा आहे", असा इशाराही त्यांनी दिला.
"शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणायला हे काय धोतर आहे का, की घातलं नेसलं आणि सोडलं. जे आम्हाला हिंदुत्व सोडल्याची टीका करत आहे. तुम्ही हिंदुत्त्वासाठी काय केलं. जेव्हा बाबरी पाडली गेली तेव्हा बिळात लपून बसला होता. राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा कोर्टाने दिला आहे. राम मंदिरासाठी तुम्ही झोळ्या पसरवल्या आहेत", अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
2. आदिवासी भागात 3 वर्षात 15 हजार बालविवाह
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील आदिवासी भागांत 15 हजारांहून अधिक बालविवाह झाल्याची आणि आदिवासी समाजातील कुपोषण आणि बालमृत्यूंमागे बालविवाह हे महत्त्वाचे कारण असल्याचे राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्याची दखल घेऊन ही संख्या चकित करणारी असल्याचे न्यायालयाने म्हटले.
तसेच बालविवाहाच्या कुप्रथेचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना करण्याची गरज बोलून दाखवताना त्या असणार आहेत, अशी विचारणाही न्यायालयाने केली. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
राज्यातील आदिवासी भागात, विशेषत: मेळघाटमध्ये, कुपोषणामुळे अर्भक आणि गरोदर व स्तनदा मातांचा मृत्यूदरावर प्रकाश टाकणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
आदिवासी भागांमध्ये आजही मुलींचे बाराव्या वर्षी लग्न होते. पंधराव्या वर्षांपर्यंत किंवा त्याआधीही त्या गर्भवती होतात. परिणामी आई आणि बाळाचा मृत्यू होतो. आमच्या माहितीत तथ्य आहे की नाही, अशी विचारणा करून सर्वेक्षणाचे आदेश न्यायालयाने दिले होते.
महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच बालविवाह रोखल्याचीही न्यायालयाने यावेळी प्रामुख्याने दखल घेतली. तसेच सरकारला या प्रकरणे आणखी सक्रिय होऊन बालविवाह प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करून बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे न्यायालयाने म्हटले.
3.समृद्धी महामार्ग दुर्घटनेत 1 ठार, 2 जखमी
उदघाटनाआधीच समद्धी महामार्गाच्या नागपूर-शेलूबाजार टप्प्यातील एक कमान कोसळली आहे.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या अपघातामुळे उदघाटन सोहळा दीड ते दोन महिने लांबणीवर गेला आहे.
महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आला आहे. त्यापैकी 16 क्रमांकाचा ओव्हरपासचा आर्च कोसळून अपघात झाला. हे काम पाच-सहा दिवसात होणं कठीण आहे. तज्ज्ञांनी वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर पद्धतीचे बांधकाम सुचवले आहे. त्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. नागपूर ते सेलूबाजार टप्प्याचा लोकार्पण सोहळा पुढे ढकलावा लागेल असं चित्र आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
4.महाविकास आघाडीत शकुनीमामाचा सुळसुळाट- सदाभाऊ खोत
"महाविकास आघाडी विकास कामांवर बोलायला तयार नाही. परंतु, एका शकुनीमामाकडून सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचं काम होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्याची सेना कौरवाची सेना असते आणि आम्ही पांडवाची सेना आहे. आम्ही या कौरवांचा नाश करु", असं माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
'जागर शेतकऱ्यांचा आक्रोश बहुजनांचा' हे राज्यव्यापी अभियान 29 एप्रिल पासून कोकणातून सुरू करत असल्याची घोषणाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली. 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यात सध्या फक्त फालतुगिरी सुरू आहे. हे सरकार नोकर भरतीवर बोलत नाही. सरकारने आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला आहे. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.
5. 'जोपर्यंत महिला खेटर पूजन करणार नाहीत तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही'
"कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं आहे, पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो? तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरणाऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते. अशा लोकांचं महिला जोपर्यंत 'खेटरं पुजन' करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही", असं शब्दात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेवट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. 'टीव्ही9'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
यावेळी त्यांनी कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करण्याला आमचा विरोध असल्याचं म्हटलं. यातून त्यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून जाहीर झालेल्या मातोश्रीबाहेरील हनुमान चालिसा आंदोलनाला विरोध दर्शवला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)