पुणे सायकल चोरी प्रकरण: विमानाने येऊन करायचे चोरी, पोलिसांनी असा लावला छडा

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

तुम्ही दुचाकी चोरणारे, कार चोरणारे चोरटे पाहिले असतील, पण पुणे पोलिसांनी महागड्या सायकल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून महागड्या 33 सायकल आणि एक बुलेट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या सगळ्या मुद्देमालाची किंमत तब्बल सात लाख रुपये आहे. विशेष म्हणजे सायकल चोरल्यानंतर त्यांच्या गावी जाण्यासाठी आणि पुन्हा सायकल चोरण्यासाठी पुण्यात येण्यासाठी चोरटे विमानाने प्रवास करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

बुद्धदेव बिश्वास (वय 22, रा. पश्चिम बंगाल) आणि जयंता बिश्वास (वय 22 रा. पश्चिम बंगाल ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. बुद्धदेव आणि जयंता यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उच्चभ्रू सोसायट्यांमधील महागड्या सायकल चोरी केल्या होत्या.

गेल्या चार महिन्यांपासून ते सायकल चोरी करत होते. महागड्या सायकल चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. त्या तक्रारींच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.

सायकलची चोरी का?

बुद्धदेव हा एका सायकल दुकानात कामाला होता. ज्या दुकानात तो कामाला होता तो दुकानदार जुन्या सायकल देखील विकत होता. त्यामुळे आपण सायकल चोरून त्या विकू शकतो अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली.

जयंता हा चायनीझच्या गाडीवर काम करायचा. लॉकडाऊनमध्ये त्यांचं काम गेलं होतं. त्यामुळे झटपट पैसे मिळवण्यासाठी दोघांनी सायकल चोरण्याची योजना आखली.

बुद्धदेव याने याआधी कोथरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील अशा 20 सायकल चोरल्या होत्या. सायकल चोरीची सहसा पटकन कोणी तक्रार करत नाही. सायकलला नंबर प्लेट नसल्याने सायकल शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान असते.

त्यामुळे दोघांनी सायकल चोरण्याचे ठरवले. या दरम्यान ते त्यांच्या मूळ गावी पश्चिम बंगालला देखील गेले होते. काही सायकल चोरुन विकल्यानंतर ते विमानाने पश्चिम बंगालला जायचे आणि पुन्हा विमानाने पुण्याला यायचे.

सायकल कशी चोरायचे?

सायकल चोरण्यासाठी दोघांनी प्लॅनची आखणी केली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून दोघे चांगले कपडे घालायचे. तसेच महागडे मोबाईल देखील वापरायचे.

चोरी करण्यासाठी त्यांनी स्वारगेट, भारती विद्यापीठ, खडक, दत्तवाडी, मार्केटयार्ड या भागातील उच्चभ्रू सोसायट्यांची रेकी केली होती. रेकी केल्यानंतर रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत कटरच्या सहाय्याने सायकलचे कुलुप तोडून सायकल चोरी करायचे.

सायकल चोरी केल्यानंतर ते ती लगेच घरी नेत नव्हते. सायकल चोरी करुन ते पुण्यातील कुठल्याही एका भागात लावून जात. नंतर वेश बदलून ते ती सायकल काही दिवसांनी दुसरीकडे लावत असत. आणि पुन्हा वेशांतर करुन ती सायकल घेऊन ते ती विकत होते.

आरोपी हे फक्त महागड्या सायकलच चोरी करत होते. त्यांनी चोरी केलेल्या सायकलमध्ये पन्नास हजार ते दीड लाख किंमतीच्या सायकल देखील आहेत. या सायकल चोरून ते काही हजारांमध्ये दुसऱ्याला विकत होते. मिळालेल्या पैशांमधून मौज मजा करायचे आणि विमानाने त्यांच्या मुळगावी निघून जायचे.

आरोपींना पकडलं कसं?

सायकलचा कुठला नंबर नसल्याने पोलिसांना आरोपींना पकडणं सोपं नव्हतं. सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण म्हणाल्या, ''पोलिसांनी 7 ते 8 दिवस आरोपींचा माग काढायचा प्रयत्न केला. सायकल चोरणारे हेच आरोपी आहेत, याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींनी पश्चिम बंगालला जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढले होते. पोलिसांनी अटक केली नसती तर ते पळून जाण्याच्या तयारीत होते.''

स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर म्हणाले, ''सायकल चोरीच्या तक्रारी आल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे आणि संदीप साळवे यांची टीम तयार करण्यात आली. पोलिसांनी ज्या ठिकाणांवरुन सायकल चोरी झाल्या तिथून सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली.

"आरोपी स्वारगेट भागातून पुणे विद्यापीठाच्या मार्गे औंधच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. पुढे ते कुठे जात होते हे कळू शकत नव्हते. पोलिसांनी सलग सात दिवस पहाटे 3 ते 5 दरम्यान आरोपींवर पाळत ठेवली. आरोपी सापळ्यात अडकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.''

पोलिसांनी आरोपींकडून 33 महागड्या सायकल आणि एक चोरीची बुलेट हस्तगत केली आहे. आरोपींनी आणखी सायकल चोरल्या असल्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. त्या दिशेने सुद्धा पोलीस तपास करताहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)