You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात कोरोना मृत्यूंची संख्या 5 लाख की 40 लाख, आकडेवारीवरून भारत-WHO आमनेसामने
देशभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातलं असून, काही शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीसंदर्भात भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची नोंद ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं एक विशिष्ट कार्यपद्धती अवलंबली. ही पद्धती भारतासंदर्भात योग्य नसल्याचं भारताने म्हटलं आहे.
भारतासारख्या खंडप्राय लोकसंख्येच्या देशात जागतिक आरोग्य संघटनेनं राबवलेलं प्रारूप लागू केलं जाऊ शकत नाही असं भारताने म्हटलं आहे.
न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आलेला लेख
भारताने या कार्यपद्धतीसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेकडे आपली भूमिका मांडली आहे.
न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार भारत कोरोना मृत्यूसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेला सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेला यासंदर्भात सहा पत्रं लिहिली आहेत.
भारताप्रमाणेच चीन आणि बांगलादेश या देशांनीही जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे.
भारताने काय म्हटलं आहे?
न्यूयॉर्क टाईम्समध्ये 16 एप्रिल रोजी 'इंडिया इज स्टॉलिंग डब्ल्यूएचओज एफर्ट टू मेक ग्लोबल कोव्हिड डेथ टोल पब्लिक' (जागतिक पातळीवर कोरोना मृत्यूंची संख्या किती, यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयासात भारताचा खोडा) अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती.
लेखात म्हटल्याप्रमाणे, कोरोनामुळे जगभरात 1.5 कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. आधीच्या अंदाजाच्या तुलनेत ही संख्या खूपच जास्त आहे. मात्र अजूनही ही आकडेवारी जारी करण्यात आलेली नाही.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आधीच्या तुलनेत बरीच अधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेला आढळून आलं आहे, असं लेखात म्हटलं आहे.
कोरोना मृत्यूंसंदर्भात आकडेवारी भारताने घेतलेल्या आक्षेपांमुळे अनेक महिन्यापासूनच मिळालीच नाही.
यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं. त्यात असं म्हटलं आहे की भारताचे सरकार जागतिक आरोग्य संघटनेला सातत्याने माहिती देत आहे.
भौगोलिक स्थिती
विश्लेषणासाठी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे आकडे टियर-1 श्रेणीत समावेश होणाऱ्या देशांनुसार घेण्यात आले आहेत. आकडेवारीसाठीचा गणितीय फॉर्म्युला हा टियर-2 श्रेणीत समावेश होणाऱ्या देशांवर लादण्यात आलं आहे. भारताचा निष्कर्षांबाबत काही आक्षेप नाही तर, या निष्कर्षाप्रत येण्यासाठी जी कार्यपद्धती अंगीकारण्यात आली त्याबाबत भारताने प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतासह चीन, बांगलादेश, सीरिया, इथिओपिया, इजिप्त या सदस्य देशांनी या कार्यप्रणालीबाबत काही आक्षेप नोंदवले आहेत.
मृतांची संख्या मोजताना भौगोलिक स्थिती, लोकसंख्या आणि आकारमान या गोष्टी गृहितच धरण्यात आल्या नाहीत याबाबत भारताने आक्षेप घेतला आहे.
भारताचा मुख्य आक्षेप हा आहे की हा डेटा तयार करताना भारताची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्येची घनता याचा विचारच करण्यात आलेला नाही.
भारतासारख्या प्रचंड क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या देशातील कोरोना मृत्यूंची नोंद घेण्याकरिता सांख्यकीय प्रारूपांचा आधार का घेण्यात आला असा प्रश्न भारताने विचारला आहे. ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला योग्य आहे.
भारताचे असे म्हणणे आहे की जो सांख्यकीय फॉर्मुला टिअर 1 देशांसाठी अवलंबला तोच भारतासाठी अवलंबून मृत्यूच्या अंदाजाबाबत अतिशय भिन्न आकडे देण्यात आले आहेत. भारताने हे म्हटलं आहे की जर खरंच हे आकडे विश्वसनीय असतील तर सर्व टिअर 1 देशांसाठी लागू करून त्यांना जाहीर करावे.
काय त्रुटी आहेत, भारताचा विरोध का आहे?
या प्रारुपाअंतर्गत प्रत्येक महिन्याचं तापमान आणि आणि सरासरी मृत्यू दर यांच्यात परस्परसंबंध मानण्यात आला आहे. हा संबंध आहे हे दाखवण्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये.
भारतातल्या आकडेवारीवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील कोरोना मृत्यूसंदर्भातील सांख्यिकीय पातळीवर अचूक नाही.
भारतात कोरोना मृत्यूंचं परीक्षण होताना संक्रमणाचा दर संपूर्ण देशात कधीच एकसारखा नव्हता.
जागतिक आरोग्य संघटनेनं भारताच्या भूमिकेवर काहीही भाष्य केलेलं नाही.
याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखाचा स्क्रीनशॉट शेअर करताना म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदी खरं बोलत नाहीत आणि बोलू देत नाहीत. ऑक्सिनजच्या अभावी कोणाचाच मृत्यू झाला नाही असं ते खोटं बोलत आहेत. सरकारच्या बेपर्वाईमुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तुमचं कर्तव्य निभावा. पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत मिळायला हवी.
वरिष्ठ पत्रकार हिमानी चंद्रा यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे. केंद्र सरकारने म्हटल्याप्रमाणे भारतात कोरोना मृत्यूंची संख्या 5.2 लाख आहे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार भारतातल्या कोरोना मृत्यूंची संख्या 40 लाख आहे. हिमानी लिहितात की, न्यूयॉर्क टाईम्सला भारतातल्या कोरोना मृत्यूंचा आकडा मिळाला आहे पण अन्य देशातील कोरोना मृत्यूंची आकडा त्यांच्याकडे नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)