देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल, ट्विटरवरून सोडले टीकास्त्र

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर कडाक्याची टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय, सामाजिक भूमिकांबद्दल चर्चा सुरू आहे. या चर्चेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यातील आणि मुंबईतील सभाही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.

'सोनिया गांधी यांना आधी विरोध करुन नंतर पुन्हा त्यांचं नेतृत्व मान्य करणे, ते छ. शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाल्यापासून महाराष्ट्रात जातींचं राजकारण सुरू झालं. शरद पवार नास्तिक आहेत' असे विविध आरोप राज ठाकरे यांनी केले होते. या सगळ्या आरोपांना काल 13 एप्रिल रोजी शरद पवार यांनी उत्तरही दिले होते. वाचा- शरद पवार : शाहू, फुले, आंबेडकरांचा उल्लेख शिवछत्रपतींच्या भूमिकेचा उल्लेख करण्यासारखंच

आता या वादामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

शरद पवार यांच्या आजवरच्या भूमिकांमधील विसंगती आणि राजकारण हे दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर एक ट्वीट्सची मालिकाच प्रसिद्ध केली आहे.

आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पहिले ट्वीट करताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'एकाबाजूला आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. ते राज्यघटनेत काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370 ला समाविष्ट करण्याविरोधात होते. मात्र त्यांच्या इच्छा आणि मूल्यांच्या विरोधात काय बोलले जात आहे ते पाहा,' असे म्हणून फडणवीस यांनी बिझनेस स्टँडर्ड वर्तमानपत्राची एक लिंक या मुख्य ट्वीटमध्ये देतात.

कलम 370 रद्द झाल्यावर त्याचे स्वागत अजित पवार यांनी केले होते. मात्र ते संसदेत याला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेच्याविरोधात असल्याचे लक्षात येताच शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा पक्षाच्या भूमिकेवर काही परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले. अनेकदा राज्यातलया नेत्यांना राष्ट्रीय मुद्दे समजत नाहीत, त्यामुळे अशी वक्तव्यं केली जातात असं पवार म्हणाले होते.

थोडक्यात कलम 370 ला पाठिंबा देणं ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेविरोधात आहे असं फडणवीस यांनी सुचवलं आहे.

शरद पवार यांनी 'द काश्मीर फाइल्स' या सिनेमावरही टीका केली होती. त्यालाही देवेंद्र फडणवीसांनी या ट्वीटमालिकेत उत्तर दिलं आहे. काश्मीर फाइल्सवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये लिहितात, 'द काश्मीर फाइल्सवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची जी विधाने ऐकत आहोत यात आजिबात आश्चर्य नाही.

किंबहुना, ते राष्ट्रवादीच्या तुष्टीकरण धोरण आणि राजकारणाच्या आणि जातीय आधारावर समाजाचे ध्रुवीकरण करण्याच्या दशकांच्या जुन्या ट्रॅक रेकॉर्डशी पूर्णपणे सुसंगत आहेत.'

त्यानंतर केलेल्या ट्वीटमधून शरद पवार मुस्लिमांचे तुष्टीकरण करतात असं देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलं आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप नवाब मलिक यांच्यावर झाल्यावर शरद पवार काय म्हणाले होते पाहा असं लिहून फडणवीस यांनी हिंदुस्थान टाईम्स वर्तमानपत्राची एक लिंक दिली आहे. या बातमीत नवाब मलिक हे मुसलमान असल्यामुळे त्यांचं नाव दाऊदशी जोडलं, असं शरद पवार या बातमीत म्हणत आहेत.

नवाब मलिकांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी इशरत जहाँबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शऱद पवार यांच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात मनसेच्या सभेतही मुंब्र्यातील गुन्हेगारांची यादी वाचताना राज यांनी इशरतचा उल्लेख केला होता.

देवेंद्र ट्वीटमध्ये म्हणतात, '2013 मध्ये त्यांनी इशरत जहाँ निर्दोष असल्याचे सांगून रेकॉर्ड केला होता', असं सांगून फडणवीस यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. 'तसेच इशरत जहाँला केवळ निर्दोष म्हटले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तिला मदत केली आहे.

घटनेच्यावेळी सत्तेत असूनही गुप्तचर विभागाला बदनाम करण्यापर्यंत मजल गेली होती.' असं ट्वीट केलं आहे. या ट्वीटला त्यांनी इंडिया टुडेच्या बातमीचा पुरावा जोडला आहे.

यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना मुंबईत रझा अकादमीचा मोर्चा झाला होता त्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या प्रकरणाचा उल्लेख राज ठाकरे यांनीही सभेत केला होता.

देवेंद्र ट्वीटमध्ये लिहितात, '2012मध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते तेव्हा मुंबईत आझाद मैदानात लाजिरवाणा हिंसाचार झाला. अमर जवान ज्योतीची विटंबना झाली, पण गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रझा अकादमीबाबत मवाळपणा दाखवत मुंबईचे सीपी बदलले!'

यानंतर मुस्लिमांसाठी वेगळा कोटा ठेवणे, हिंदू दहशतवाद शब्दाचा उल्लेख करणे, मुंबईत 13 स्फोट झाले असं माध्यमांना सांगणे अशा वेगवेगळ्या प्रकरणांचा उल्लेख फडणवीस यांनी आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये केला आहे. या सगळ्या ट्वीटमध्ये त्यांनी त्या घटनांच्यावेळेस प्रसिद्ध झालेल्या बातम्या जोडल्या आहेत.

अल्पसंख्याक लोकच सरकार पाडू शकतात असं विधान शरद पवार यांनी केलं होतं त्यासाठी फडणवीस यांनी डेक्कन हेराल्डच्या बातमीची लिंक दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)