एसटी संप: शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्तांवर कारवाई #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1.शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी डीसीपींना हटवलं

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे.

झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवलं असून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आक्रमण केलं.

2.आज झुकलात तर पुन्हा भगव्याचे दर्शन होणार नाही- फडणवीस

"कोल्हापुरात येताच बाळासाहेब ठाकरे यांचे एक पोस्टर पाहायला मिळायचं आणि एक ऊर्जा मिळत असे. मात्र, आज आलो त्यावेळी पोस्टर पाहायला मिळालं, पण बाळासाहेब यांच्या फोटोसोबत सोनिया गांधी यांचा फोटो होता. ते पाहून वेदना झाल्या. कोल्हापूर उत्तर हे भगव्याचे असून, ते भगव्याकडे आलेच पाहिजे, असे म्हणत आज झुकलात तर, पुन्हा भगव्याचे दर्शन होणार नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, "विरोधी पक्षाने तुमची काय अवस्था केलीय हे विधिमंडळात पाहताय ना? असा प्रश्न उपस्थित करत 2019 साली महापुरात आम्ही जी मदत दिली तशी मदत तुम्ही महापुरात का दिली नाही असे ते म्हणाले.

या देशात लोकशाही आहे तुमची दहशत चालणार नाही. महाराष्ट्रात सरकार नाही तर भ्रष्टाचार आहे. कोरोना काळात इंग्लिश दारुवरचा टॅक्स कमी केला बेवड्यांचे हे सरकार आहे का? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला".

3.मुंबईत कोरोना XE व्हेरियंटचा रुग्ण

मुंबईतून बडोद्याला प्रवास करणाऱ्या एका 67 वर्षीय पुरुषांमध्ये एक्स ई व्हेरियंट (XE) आढळला आहे. या रुग्णाला बडोद्यामध्ये 12 मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोविड तपासणी करण्यात आली. सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षण विरहित आहे. या रुग्णाने कोविशील्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

मुंबईतील सांताक्रूझचा रहिवाशी आहे. गुजरातमधील बडोदा येथे तो रुग्ण गेला होता. बडोदा येथे रिपोर्ट जिनोमिक सिक्वेन्स करण्यात आले. त्यात XE चा व्हेरियंट आढळून आला. एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. 1 आणि बी ए. 2 चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहितीवरून दिसते. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. एक्स ई व्हेरियंटला घाबरण्याचे कारण नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

4.राज ठाकरे ठाण्यातल्या सभेतून 'करारा जवाब देणार'

गुढीपाडव्याला शिवाजी पार्क इथे झालेल्या सभेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी ठाण्यात सभा घेत आहेत. या सभेचा ट्रेलर मनसेनं जारी केला आहे. उत्तर सभा असं या सभेला नाव देण्यात आलं असून 'करारा जवाब मिलेगा' असंही यात म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला या सभेत राज ठाकरे उत्तर देणार आहेत. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला होता. तसेच मदरशांमधले गैरप्रकाराबाबत वक्तव्य केले होते. यानंतर महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

भाजप-मनसे युतीची चर्चा, हिंदुत्ववादी भूमिका, कार्यकर्त्यांची नाराजी अशा विषयावर राज ठाकरे हे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.

5. सुहास जोशी, राजीव नाईक यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

अभिनय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी, २०१८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान केला गेला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

संगीत, नाट्य, नृत्य, लोककला या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, पं. सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक यांच्यासह 44 कलावंतांना वर्ष 2018 चे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले होते. अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या कलावंतांना प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.

संगीत नाटक अकादमीची जनरल कौन्सिल आणि राष्ट्रीय संगीत, नृत्य व नाटक अकादमी यांची गुवाहाटी येथे 26 जून 2019 रोजी झालेल्या बैठकीत या 44 कलावंतांना हा सन्मान देण्याचे ठरवले गेल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने तेव्हा सांगितले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)