You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनू सूदला दुबई गोल्डन व्हिसा, पण हा व्हिसा असतो काय? तो कोणाला मिळतो?
दुबई सरकारनं सोनू सूदला दुबईचा गोल्डन व्हिसा दिला आहे. सोनू सूद यांना काही दिवसांपूर्वीच हा सन्मान मिळाला आहे. सोनू सूदने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी शेअर केली आहे.
त्यानं म्हटलं आहे, "मला गोल्डन व्हिसानं सन्मानित केल्याबद्दल दुबई सरकारचा आभारी आहे. दुबई माझ्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे. प्रगतीसाठी ही खूप चांगली जागा आहे. मी या सोयीबद्दल अधिकाऱ्यांचा आभारी आहे."
शाहरुख खान, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्याकडेही दुबईचा गोल्डन व्हिसा आहे.
काय आहे गोल्डन व्हिसा?
गोल्डन व्हिसा हा 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी मिळणारा व्हिसा आहे, जो 2019 मध्ये जाहीर करण्यात आला होता.
UAEचे उपराष्ट्राध्यक्ष आणि दुबईचे नेते शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांनी 21 मे 2019 रोजी गोल्डन कार्ड व्हिसा जाहीर केला. गुंतवणूकदार, निवडक डॉक्टर्स, इंजिनियर्स, वैज्ञानिक आणि कलाकारांना पर्मनंट रेसिडन्सी (PR) देण्यासाठी ही गोल्डन कार्ड योजना सुरू करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
UAE मध्ये पैसा ओतणाऱ्या वा इतर प्रकारे गुंतवणूक करणाऱ्यांना, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मोठ्या कंपन्यांच्या मालकांना, महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना, विज्ञान संशोधक आणि हुशार विद्यार्थ्यांना UAEच्या विकासामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असल्याचं सांगितलं गेलं.
गोल्डन व्हिसाचे फायदे
गोल्डन व्हिसाधारकांना अनेक सुविधा मिळतात. सगळ्यांत महत्त्वाची सुविधा म्हणजे ते इतर कोणाही व्यक्तीच्या वा कंपनीच्या मदतीशिवाय UAEमध्ये आपल्या पती वा पत्नी आणि मुलांसोबत राहू शकतात.
यापूर्वी यासाठी एखाद्या स्पॉन्सरची आवश्यकता असायची.
UAE मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के लोक भारतीय वंशाचे स्थलांतरित आहेत.
सोबतच हा व्हिसा असणाऱ्या व्यक्ती तीन कर्मचाऱ्यांना स्पॉन्सर करू शकतात. शिवाय त्यांना स्वतःच्या कंपनीच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यासाठी रेसिडेंसी व्हिसादेखील मिळवता येऊ शकतो.
हा व्हिसा अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 70पेक्षा जास्त देशांमधल्या 6,800 लोकांना फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
10 वर्षांनंतर नूतनीकरण
UAEच्या रेसिडेन्सी आणि परदेशी बाबींकडे लक्ष देणाऱ्या GDRFAचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद अल मारी यांनी 2019 मध्ये हे सांगितलं होतं की, या गोल्डन कार्ड व्हिसाचा कालावधी 10 वर्षांचा असेल. यानंतर हा व्हिसा रिन्यू करावा लागेल.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय प्रवाशांची संख्या सर्वांत जास्त असल्याचं सांगितलं जातं. देशाच्या 90 लाखांच्या लोकसंख्येमध्ये भारतीयांची संख्या किमान 30 टक्के आहे.
भारतीय दुतावासाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार UAEमध्ये राहणारे बहुतेक भारतीय नोकरी करतात, पण यामध्ये सुमारे 10 टक्के लोक हे कामगारांवर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंबीय आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)