ब्रेन जीम काय असते? नवी मुंबईतल्या 'ब्रेन जीम ट्रेनर' कशिश लखानी ची गिनीज बुकात नोंद

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

रुबिक क्यूब तुम्ही सोडवलं आहे का? जर तुम्हाला काही मिनिटांतच हे रुबिक क्यूब सोडवता आलं असतं तर तुमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असती.

गिनीज बुकमध्ये नाव येण्याची संधी हुकली असं वाटतंय ना! नुकताच नवी मुंबईत राहणाऱ्या कशिश लखानी यांची आणि त्यांच्या 'ब्रेन जीम अॅकेडमी'ची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.

यासह ज्यांनी या इंव्हेटमध्ये सहभाग घेतला त्यांना देखील 'गिनीज बुक'ने प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे.

एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी 'रोटेटिंग क्यूब' पूर्ण सोडवल्याचा रेकॉर्ड कशिश यांच्या नावावर आहे.

ही गोष्ट त्यांची आणि त्यांच्या ब्रेन जीमची आहे.

जीम म्हटलं की डंबेल्स, बेंचप्रेस, ट्रेडमिल अशा गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.

कशिश यांची देखील एक जीम आहे. पण तिथे तुम्हाला या गोष्टी नाही दिसणार. तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे क्यूब, सुडोकू, अॅबेकस या गोष्टी दिसतील. आणि या जीमच्या ट्रेनर आहेत कशिश लखानी.

कशिश या एमबीए आहेत. काही वर्षं त्यांनी कॉर्पोरेटचा जॉब केला, मग रिअल इस्टेटचा व्यवसाय. पुढे त्यांना दोन मुली झाल्या. मग त्यांनी पूर्णपणे आपल्या कुटुंबालाच वेळ द्यायचे ठरवले.

पण जेव्हा त्यांची मुलगी चार-पाच वर्षांची होती तेव्हा तिला त्यांनी तिला एका क्लासमध्ये घातलं. हा क्लास होता रुबिक क्यूब आणि अॅबेकसचा.

याच गोष्टीमुळे त्यांना प्रेरणा मिळाली स्वतःचं ब्रेन जीम उघडण्याची.

सध्या त्यांच्या मुली 8 आणि 6 वर्षांची आहे. मोठी मुलगी अनायशा ही भारतातली सर्वांत कमी वयाची मोझाईक मेकर आहे, असं कशिश सांगतात.

'मोझाइक मेकर' म्हणजे रुबिक क्यूबच्या माध्यमातून ती चित्रं काढते. त्यांच्या मुलीला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिकं मिळाली आहेत.

"तीन वर्षांपूर्वी माझी मुलगी एका क्लासमध्ये जात होती. तिथे ती रुबिक क्यूब सोडवायला शिकली. जेव्हा हे पाहिलं तेव्हा जाणवलं की हे किती महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते, हात आणि डोळ्यांचा समन्वय वाढतो, त्यामुळे मी युट्युबवर हे कसं सोडवलं जातं ते पाहिलं. मग त्यानंतर मी माझ्या मुलांना शिकवलं," कशिश सांगतात.

याचे काय फायदे झाले?

विविध कोडी सोडवल्यावर बुद्धीचा विकास झपाट्याने होतो. त्याचे अनेक फायदे आहेत असं कशिश सांगतात. "माझ्या मुली टीव्ही कमी पाहू लागल्या, त्यांचा स्क्रीनटाइम कमी झाला. त्यांची एकाग्रता वाढली आणि त्या अभ्यासातही हुशार होत आहेत असं माझ्या लक्षात आलं.

"मुलांची वाढ होण्यासाठी त्यांच्या बुद्धीचा पूर्ण विकास होणं आवश्यक आहे. त्यासाठी मेंदूला त्या प्रकारे प्रशिक्षण देणं, चालना देणं गरजेचं आहे. आमच्या लहानपणी अशा गोष्टी नव्हत्या. पण सुदैवाने आता या गोष्टी आल्या आहेत. तेव्हा अशा अॅक्टिव्हिटीज पालकांनी आपल्या मुलांकडून करून घ्यायला हव्या असं मला वाटतं."

"आजकाल मुलं युट्युब, टीव्हीवर बराच वेळ घालवताना दिसतात. यामुळे त्यांच्या मनाची चलबिचल होते. एकाग्रता कमी झालेली दिसते. ज्याला आपण अंटेंशन स्पॅन म्हणतो तो कमी होताना दिसतो. पण ब्रेन अॅक्टिव्हिटीजमुळे या गोष्टी कमी होताना दिसल्या.

"माझ्या मुलांना जो फायदा झाला तसाच फायदा इतर मुलांना देखील व्हावा या उद्देशाने मी ब्रेन जीम सुरू केली. माझी मुलगी आठ वर्षांची आहे. ती चार वर्षांची असल्यापासून मी तिला शिकवत आहे."

"सुडोकू, केनकेन, रुबिक क्यूब याचे क्लास मी घेते. मला 15 प्रकारचे क्यूब सोडवता येतात. ज्यामुळे मुलांच्या बुद्धीचा विकास होईल हसत खेळत बुद्धीचा विकास होईल, अशाच गोष्टी मी मुलांना शिकवते," असं कशिष सांगतात.

यामुळे नातेसंबंध देखील दृढ होतात असं देखील कशिश सांगतात. "अनेक कुटुंबं अशी आहे जिथं मुलं आणि पालक, तसेच आजी-आजोबा आणि मुलं एकत्र येऊन रुबिक क्यूब सोडवतात. एकच प्रकारची कृती सोबत केल्यानंतर आपोआपच जवळीक निर्माण होते, सुसंवाद वाढतो आणि औपचारिक नातं मागे पडून मैत्रीचं नातं निर्माण होतं."

गिनीज बुकचा रेकॉर्ड कसा बनला?

गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड बनवावा ही कल्पना कशी सुचली तेव्हा कशिश सांगतात, "माझी मुलगी रुबिक क्यूबने मोझाइक बनवते. त्यात तिचे अनेक रेकॉर्ड्स आहेत पण गिनीज बुकमध्ये 'यंगेस्ट' ही वेगळी कॅटेगरी नाहीये. त्यामुळे इतर कोणत्या कॅटेगरी आहेत का याचा अभ्यास केला. माझ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल या दृष्टीने मी काय करता येईल हे पाहिले. अनेकांचं स्वप्न असतं की असं काही ना काही करावं जेणेकरून आपलं नाव गिनीज बुकमध्ये येईल. तेच स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मला आनंद वाटतो यात मी यशस्वी झाले."

"गिनिज बुकमध्ये एक कॅटेगरी असते ज्याला मास रेकॉर्ड म्हणतात तसा मास रेकॉर्ड करावा असं मला वाटलं. त्यानुसार मी नोंदणी केली. एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी रुबिक क्यूब सोडवल्याची नोंद झाली आहे. 6 फेब्रुवारी रोजी 250 जणांनी झूमवर हा रेकॉर्ड बनवला. गिनीज बुक अधिकाऱ्यांच्या देखरेखीत हा रेकॉर्ड बनला," असं कशिश सांगतात.

"सिंगापूर, अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी यात सहभाग घेतला. रुबिक क्यूब सोडवण्यासाठी एक तासाचा वेळ देण्यात आला होता पण सर्व सहभागी उमेदवारांनी ते दहा मिनिटांच्या आत सोडवले आणि आमच्या नावावर रेकॉर्डची नोंद झाली.

"गिनीज बुक तर हे एक निमित्त होतं, पण मला असं वाटतं की जास्तीत जास्त मुलांनी, विद्यार्थ्यांनी आपली बुद्धी चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, ब्रेन अॅक्टिविटीज कराव्या. याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी हा माझा उद्देश आहे. यामुळे मुलांचे आरोग्य देखील चांगले राहील तसेच त्यांच्या बुद्धीचा विकास होऊन ते जास्त सर्जनशील होतील. ते मोबाईल, टॅबलेट यासारख्या स्क्रीनपासून काही काळ दूर राहतील," असं कशिश यांना वाटतं.

"जसं शरीर बळकट करण्यासाठी शरीराचे स्नायू बळकट होणं आवश्यक असतं तसंच बुद्धीवान होण्यासाठी मेंदूचे स्नायू, ब्रेन मसल्स बळकट होणं आवश्यक असतं आणि ब्रेन जीमची संकल्पना हीच आहे," असं कशिश सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)