आर्यन खान प्रकरण: प्रभाकर साईलच्या मृत्यूचं आव्हान गृहखात्याने स्वीकारायला हवं- सामना #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. प्रभाकर साईलच्या मृत्यूचं आव्हान गृहखात्याने स्वीकारायला हवं- सामना

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील एक साक्षीदार प्रभाकर साईलचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

"भाजपचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही शोक व्यक्त करून ठाकरे सरकारला जाब विचारतात पण प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांना साधी हळहळही वाटू नये याचं आश्चर्य वाटतं.

"एनसीबीचे अधिकारी ज्या भाजप नेत्यांबरोबर उठबस करत होते त्यांनी प्रभाकर साईलच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या भावना तितक्याच संशयास्पद आहेत. धाडसाने जे सत्य बोलत आहेत ते एकतर तुरुंगात ढकलले जात आहेत किंवा प्रभाकर साईलप्रमाणे संशयास्पदरीत्या मरण पावत आहेत. महाराष्ट्राच्या गृहखात्याने हे आव्हान स्वीकारायला हवे," असं 'सामनाच्या अग्रलेखात' म्हटलं आहे.

एकप्रकारे साईलच्या मृत्यूवरून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. कारण गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे.

"मारुती कांबळेचं काय झालं? या प्रश्नाप्रमाणे प्रभाकर साईलचं काय झालं? असे प्रश्न सगळ्यांना पडले आहेत. नागपुरातून अडव्होकेट सतीश उके यांना ईडीने एक जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केली. उके यांच्या अटकेचं कारण राजकीय दहशत निर्माण करणे हेच आहे," असं सामनात म्हटले आहे.

2. नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसचे डबे घसरले

मुंबईहून निघालेल्या पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास देवळाली-लहवीतदरम्यान घसरले. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले असले तरी रेल्वेने त्यास दुजोरा दिलेला नाही. अपघातात चार प्रवासी जखमी झाले. या अपघातामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

एलटीटी- जयनगर पवन एक्स्प्रेस इगतपुरीकडून नाशिककडे येत असताना हा अपघात झाला. लहवीतजवळ रेल्वेमार्ग उखडून एकामागोमाग एक डबे घसरले. त्यांची चाके जमिनीत रुतली. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटलेली नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले. पुष्पो महंतो, मुकेश महंतो, सरोज मिश्रा आणि लखीमचंद हे प्रवासी जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

अपघातात रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झाले. इगतपुरी, मनमाड व भुसावळ स्थानकाहून रेल्वेचे आपत्कालीन साहाय्यता पथक, वैद्यकीय पथक, क्रेनसह अपघातस्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त रेल्वे रुळावर घेणे आणि रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी किमान आठ ते 10 तास लागण्याची शक्यता आहे.

या अपघातामुळे मुंबई-भुसावळ मार्गावरच्या अनेक ट्रेन्स रद्द कराव्या लागल्या. काहींचे मार्ग बदलण्यात आले.

3. काश्मिरी पंडितांना विस्थापित करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही- मोहन भागवत

काश्मिरी पंडितांना कट्टरतावादामुळे काश्मीर सोडावं लागलं असलं तरी आता जेव्हा ते पुन्हा परत येतील तेव्हा त्यांना पुन्हा विस्थापित करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असा इशारा मोहन भागवत यांनी दिला. ते श्रीनगरमधील नवरेह उत्सवात बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

मोहन भागवत म्हणाले, "काश्मिरी पंडित गेली 3-4 दशके आपल्याच देशात आपल्या घरातून विस्थापित होण्याचा आघात सहन करत आहेत. या परिस्थितीत आपण पराभव स्वीकारू नये आणि आव्हानांना सामोरे जावे. हेच अत्यावश्यक आहे."

4. धनंजयजी, तुम्ही ऊसमजुरांचा मेळावा घ्या, कोयत्याऐवजी वही पेन पुस्तक देऊया-मुख्यमंत्री

बीडमध्ये ऊसतोडणी मजुरांचा मेळावा घ्या, मी त्या मेळाव्याला उपस्थित राहीन, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं. तर, ऊस तोडणी कामगारांच्या हातात कोयत्या ऐवजी आपण वही पेन पुस्तक देऊया, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.

नव्या वर्षाची सुरवात झालीये, सर्वांना शुभेच्छा देतो. महाविकास आघाडीच्या शुभेच्छा कोरड्या नसतात. जनतेच्या आयुष्यात सुखा समाधानाचे दिवस आणण्याच्या असतात. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की या महामंडळाला गोपीनाथ मुंडे यांच नाव दिलं आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचं नाव दिलं यावरुन पक्षभेद विसरून महाविकास आघाडी कस काम करते याच हे उदाहरण आहे. त्यानुसार आजच्या या महामंडळाला आपण गोपीनाथराव मुंडे यांचं नाव दिलं आहे.

5. मुंबई पोलीस दलातील सात पोलिसांची तडकाफडकी बदली

पासपोर्ट विनाविलंब मिळावी यासाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. असे असतानाही दोन महिने उलटला तरी महिलेला पोलिसांच्या दिरंगाईमुळे पासपोर्ट मिळाला नाही. या महिलेने याबाबत आंदोलन करीत त्याचा व्हीडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करताच पोलिस आयुक्तांनी समता नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकासह सात पोलिसांची रविवारी तडकाफडकी बदली केली. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

कांदिवली येथील नताशा नावाच्या महिलेने पासपोर्टसाठी दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. मात्र एका प्रकरणामुळे पोलिसांकडून पासपोर्टसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते. अनेकदा पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवूनही पोलिस टाळाटाळ करीत असल्याने नताशा हिने समता नगर पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले.

महिलेच्या नातेवाईकांनी या आंदोलनचा व्हीडीओ करून समाजमाध्यमांवर व्हायरल केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हीडीओची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निरिक्षक, उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल अशा सात पोलिसांची साइड ब्रॅन्च म्हणजेच सशस्त्र पोलिस दलामध्ये बदली केली. त्यांच्या विरूध्द विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)