You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धुळे : 89 तलवारी व एक खंजीर जप्त, जालन्याकडे जात होती गाडी
धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिसांनी स्कार्पिओकार मधून अवैधरित्या वाहून नेली जाणारी 90 धारदार शस्त्रं पकडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 89 तलवारी व एक खंजीर जप्त करण्यात आलं आहे आणि संबंधितांवर अवैधरित्या शस्त्रं बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरून एका स्कार्पियो कारमधून जवळपास 90 धारदार शस्त्रं वाहून नेले जात असल्याचे आढळून आले आहे. सोनगीर पोलिसांना गस्तीच्या वेळी संशयास्पद स्कार्पिओ कार आढळल्यामुळे कार चालकाला कार थांबविण्यासंदर्भात सांगण्यात आले.
पण कार चालकाने पोलिसांकडे लक्ष न देता गाडी आणखीन भरधाव वेगाने जोरात पळवली. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करत तिला अडवलं आणि गाडीची झडती घेतली. त्यामध्ये जवळपास 90 धारदार शस्त्रं पोलिसांना आढळून आले आहेत.
या संदर्भात कारमध्ये असलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना याविषयी विचारला असता, हे शस्त्र चित्तोडगड येथून जालना कडे नेले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
आता ही शस्त्र कुठल्या मोठ्या घातपाताच्या उद्देशाने नेली जात होती का यादृष्टीने धुळे पोलीस या संदर्भातील पुढील तपास करीत आहेत.
औरंगाबाद आणि पिंपरीतही तलवारी आढळल्या
याआधी औरंगाबाद आणि त्यानंतर पिंपरीत डीटीडीसी कुरियरमधून आलेल्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
डीटीडीसी कुरियर कंपनीमध्ये पार्सलने आलेल्या एकूण 97 तलवारी, 2 कुकरी आणि 9 म्यान असा एकूण 3 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
औरंगाबाद शहरात कुरियर पार्सलमधून आलेल्या 37 तलवारी जप्त करण्यात आल्यात.
या तलवारी पंजाबच्या विविध जिल्ह्यातून डीटीडीसी कुरियरमार्फत औरंगाबादला पाठवण्यात आल्या होत्या.
औरंगाबादमध्ये कुरियरमधून तलवारी पार्सल येण्याची ही पहिली घटना नाही. गेल्यावर्षी पोलिसांनी कुरियरमधून आलेल्या 5 तलवारी जप्त केल्या होत्या.
पण या तलवारी कोण मागवतंय? याचा वापर कशासाठी आणि कोण करतंय?
कुरियरमधून आल्या 37 तलवारी
बुधवारी सकाळी औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिसांनी शहरातील डीटीडीसी कुरियर कंपनीवर छापेमारी केली.
कुरियरच्या पार्सलमधून तलवारी आणि कुकरी (नेपाळी चाकू) आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कुरियर कंपनीत जाऊन पोलिसांनी संशयास्पद पार्सल उघडली. तेव्हा या पार्सलमधून तब्बल 37 तलवारी आणि एक कुकरी निघाली. पोलिसांनी हा सर्व माल तात्काळ जप्त करून चौकशीला सुरूवात केली.
औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत दराडे सांगतात, "या तलवारी पंजाबच्या जलंधर, अमृतसर आणि इतर शहरातून पाठण्यात आल्या आहेत."
या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असल्या तरी, या कोणी पाठवल्या आणि कोणासाठी आणि कशासाठी पाठवल्या? याचं कोडं अजूनही पोलिसांना उलगडलेलं नाही.
याचं कारण म्हणजे, या पार्सलवर कोड भाषेत नवं लिहिण्यात आली आहेत. "यावर लिहीण्यात आलेली नावं कोडवर्डमध्ये आहेत. जागेचं नावं, व्यक्तीचं पहिलं नाव आणि नंबर आहे," वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत दराडे पुढे म्हणाले.
पार्सल पंजाबमधून आल्यामुळे पोलीस अधिकारी पंजाब पोलिसांशी संपर्क करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत पार्सलवर असलेल्या नंबराच्या माध्यमातूनही या तलवारी कोणी मागवल्या त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
या तलवारी आणि कुकरी कार्डबोर्डच्या सात वेगवेगळ्या पार्सलमधून पाठवण्यात आल्या होत्या.
पोलीस निरीक्षक गणपत दराडे पुढे सांगतात, "या पार्सलवर औरंगाबादमधील पाच आणि जालन्यातील दोन जणांचे पत्ते आहेत."
तलवारी का मागवण्यात आल्या असतील याचा शोध आता पोलीस अधिकारी घेत आहेत.
लग्न, बर्थ-डे आणि शौक म्हणून मागवल्या जातात तलवारी?
औरंगाबाद शहरात कुरियर पार्सलमधून तलवारी येण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी दोन वेळा पोलिसांनी कुरियरमधून आलेल्या तलवारी जप्त केल्या होत्या.
गेल्यावर्षी औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुरियरमधून आलेल्या पाच तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
कुरियरमधून या तलवारी का मागवल्या जातात? या तलवारी कोण बाळगतं? याबाबत आम्ही पोलीस निरीक्षक केंद्रे यांना विचारलं. ते म्हणाले, "या तलवारी दानिश नावाच्या एका आरोपीने आणल्या होत्या. लोकांना तो तलवारी भाड्याने किंवा विकत द्यायचा. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली होती."
कुरियरमधून आलेल्या तलवारी जप्त केल्यानंतर पोलिसांनी औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी छापे टाकले. ज्यांनी तलवारी खरेदी केल्या होत्या त्यांच्यावर अवैध तलवार बाळगल्याप्र करणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी 55 तलवारी जप्त केल्या होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार या तलवारी एक हजार ते अडीच हजार रूपयांना विकल्या जायच्या.
या तलवारींचा वापर कशासाठी केला जातो? असं विचारल्यावर व्यंकट केंद्रे पुढे म्हणाले, "लोकांनी या तलवारी लग्नासाठी, वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी विकत घेतल्या होत्या. असं चौकशीत स्पष्ट झालं होतं."
पंजाबमधून तलवारी का येतात?
पंजाबमध्ये शीख धर्मिय लोक तलवारी बाळगतात. धार्मिक कारणामुळे शीखांना तलवार किंवा कृपाण ( तलवारीचं छोटं रुप ) बागळण्याची कायदेशीर पारवानगी आहे. तसंच देशात इतर व्यक्तींना परवाना असेल तर तलवार बाळगता येते.
केंद्र सरकारच्या आर्म्स कायद्याप्रमाणे, तलवार ही शस्त्रांच्या कॅटेगरीमध्ये मोडते. त्यामुळे यासाठी परवाना असणं बंधनकरक आहे. दरम्यान एकदा परवाना मिळाला की दरवर्षी या परवान्याचं नुतनिकरणं करावं लागतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)