You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओडिशा : आमदाराच्या गाडीची धडक, 7 पोलिसांसह 22 जण जखमी #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) आमदाराच्या गाडीची 7 पोलिसांसह 22 जणांना धडक
बिजू जनता दलाचे आमदार प्रशांत जगदेव यांच्या गाडीनं काही लोकांना धडक दिल्याची घटना घडली आहे. ओडिशातील बाणपूरमध्ये ही घटना घडली असून, यात 7 पोलिस, 2 पत्रकारांसह 22 जण जखमी झाले आहेत. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे.
या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेवेळी आमदार प्रशांत जगदेव हे स्वत: गाडी चालवत होते, अशी माहिती समोर आली आहे.
आमदारांच्या या कृत्यामुळे लोक संतापले आणि आमदारांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. या मारहाणीमुळे आमदारही गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भुवनेश्वरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेबाबत केंद्रांचलचे पोलीस महानिरीक्षक नरसिंह भोले यांनी सांगितलं की, आमदार प्रशांत जगदेव हे सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांच्याविरोधात हत्येसह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
2) संजय राऊतांनी एकांतात बडबडण्याची सवय लावावी - राज ठाकरे
मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांची नक्कल केली आणि त्यावरून आता या दोन्ही नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीका सुरू झाली आहे.
राज ठाकरेंना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, नक्कल करून राजकारण होत नाही.
त्यावर आत राज ठाकरेंनी पुन्हा उत्तर दिलंय. ते म्हणाले, "संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी."
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे ठाण्यातील दिवा इथं उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
आता राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊत राऊत काय उत्तर देतात, हे पाहावं लागेल.
3) 'समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यायचं असेल, तर राज्यानं निम्मे पैसे द्यावे'
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं असेल, तर राज्य सरकारनं या महामार्गासाठी 50 टक्के पैसे द्यावेत, असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलंय.
मनमाड ते मुदखेड रेल्वेच्या विद्युतीकरणाचं उद्घाटन दानवेंच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
रावसाहेब दानवे म्हणाले, "समृद्धी महामार्गाला आम्ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव देणार होतो. परंतु, आता राज्य सरकार बाळासाहेब ठाकरेंचं नाव देत आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यायचं असेल, तर राज्याने 50 टक्के पैसे द्यावे लागतील."
तसंच, "यापुढे कोणत्याही रेल्वे प्रकल्पासाठी राज्याला 50 टक्के पैसे द्यावे लागतील. राज्यातील रेल्वे प्रकल्पाला पैसे दिले तरच प्रकल्प होतील," असेही रावसाहेब दानवे म्हणाले.
4) पंजाबमध्ये 122 अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा घटवली
पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली आणि काही अवधीतच राज्यातील 122 जणांची सुरक्षा घटवल्याचा निर्णय घेण्यात आला.
इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
या 122 जणांमध्ये अनेक राजकीय नेते आहेत. विशेषत: काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदारांचा यात समावेश आहे.
पंजाबमधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचं आदेशपत्र पाठवून सुरक्षा घटवण्यात आलेल्या नेत्यांची यादी सोपवण्यात आलीय.
या यादीत मनप्रीत सिंग बादल, राज कुमार वर्का, भारत भूषण अशु, रणदीप सिंग नाभा यांसह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अजैब सिंग भट्टी, विधानसभेचे माजी अध्यक्ष राणा के. पी. सिंग, रझिया सुल्ताना, परगत सिंग, अमरिंदर सिंग राजा वारिंग यांचाही समावेश आहे.
5) दाऊदचा भाऊ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांसोबत - निलेश राणे
महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हेगारी विश्वाशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांनंतर भाजपनं आता आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे.
भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी ट्विटरवर फोटो शेअर करत शिवसेनेवर टीका केलीय.
निलेश राणेंच्या दाव्यानुसार, या फोटोत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांसोबत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर आहे.
ही बातमी लोकमतनं दिलीय.
या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणालेत, "दाऊद जेवढा पाकिस्तानमध्ये सक्रीय नसेल, त्यापेक्षा अधिक महाविकास आघाडीत सक्रीय दिसतोय."
आता यावर किशोरी पेडणेकरांकडून काय स्पष्टीकरण किंवा उत्तर येतं, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)