शरद पवारांना सदाभाऊ खोत म्हणतात, '...पण तुमच्या नशिबी पंतप्रधानपदाची खुर्ची नाही' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images/Facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) ...पण तुमच्या नशिबी पंतप्रधानपदाची खुर्ची नाही - सदाभाऊ खोत
रयत क्रांती संघटनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला सदाभाऊंनी उत्तर दिलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
उस्मानाबादमधील कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले होते, "काही जण निवडणूक होण्यापूर्वीचं मी येणार मी येणार असं म्हणत होते. मात्र, आम्ही येऊ दिलं नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
फडणवीसांवरील या टीकेला उत्तर देताना सदाभाऊ म्हणाले, "येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही, हे मात्र नक्कीच."
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचं 'मी पुन्हा येईन' ही विधानसभेत गाजलेली कविता आणि नंतर प्रचारादरम्यानचं हे घोषवाक्य गाजलं होतं. तो धागा पकडत विरोधक सातत्यानं टीका करत असतात. मात्र, यावेळी सदाभाऊंनी थेट पवारांनाच त्यावरून उत्तर दिलंय.
2) कीर्तनाच्या क्लिप यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील - इंदुरीकर महाराज
"आपल्या कीर्तनाच्या व्हीडिओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश झालेत. त्यांच्यामुळेच आपण अडचणीत आलो असून अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील," असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे. ही बातमी एबीपी माझानं दिलीय.
अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केलं होतंय. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्यं केलं.

फोटो स्रोत, KIRAN GUJAR
यापूर्वी अपत्य जन्माच्या बाबतीत इंदुरीकर महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून बराच मोठा वादही झाला होता आणि कोर्टाच्या पायऱ्याही चढाव्या लागल्या होत्या.
आता या नव्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
3) निधी द्या, नाहीतर बजेटवर बहिष्कार टाकू - सेना आमदारांचा इशारा
महाराष्ट्रातील 25 शिवसेना आमदारांनी निधीबाबत होत असलेल्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
शिवसेनेचे हे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन दिवसांपूर्वी भेटले आणि त्यांना म्हणाले, "निधी वाटपाबाबत आमच्यावर कमालीचा अन्याय होत आहे, निधी मिळाला नाही तर आम्ही अर्थसंकल्पावेळी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकू."

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेना महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असताना आणि पक्षाचेच प्रमुख मुख्यमंत्री असतानाही, आमदारांच्या निधी वाटपाबाबतच्या तक्रारीमुळे आणि त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प येत्या 11 मार्च रोजी विधिमंडळात सादर केला जाणार आहे.
4) महाराष्ट्राचं महसुली उत्पन्न घटलं
महाराष्ट्रात आधीच तुटीचा अर्थसंकल्प असताना चालू आर्थिक वर्षांत महसुली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्याची तिजोरी हाताळताना वित्त विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
अपेक्षित महसुली उत्पन्नाच्या तुलनेत 90 हजार कोटींचे उत्पन्न फेब्रुवारीअखेर कमी जमा झाल्यानं मोठा वित्तीय खड्डा पडण्याची भीती व्यक्त केली जातेय.
चालू आर्थिक वर्षांत (2021-22) महसुली जमा ही 3 लाख 68 हजार 986 कोटींची अपेक्षित धरण्यात आली होती. फेब्रुवारीअखेर 2 लाख 78 हजार कोटीएवढी महसुली जमा झाली आहे. उद्दिष्टाच्या 75 टक्के हे प्रमाण आहे.

फोटो स्रोत, Twitter/ Ajit Pawar
वित्तीय वर्षांच्या अखेरच्या महिन्यात 90 हजार कोटींची तूट भरून निघणे कठीण आहे. कारण दरमहा 35 ते 40 हजार कोटींच्या आसपास महसूल जमा होतो.
5) BSF जवानाच्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या जवानानं केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये ही घटना घडली. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.
सत्तेपा असं या गोळीबार करणाऱ्या बीएसएफच्या कॉन्स्टेबलचं नाव असून, ते मूळचे कर्नाटकातील आहेत. बीएसएफ मेसमध्ये सत्तेपांनी गोळीबार केला. या घटनेत सत्तेपा यांचाही मृत्यू झालाय.
या गोळीबारात जखमी झालेल्यांना गुरुनानक देव हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय.
अति कामाच्या त्रासामुळे रागाच्या भरात सत्तेपा यांनी गोळीबार केल्याचं प्रथमदर्शिनी सांगण्यात आलंय. मात्र, पोलिसांनी या घटनेच्या चौकशीला सुरुवात केलीय. या चौकशीतून काय कारण समोर येतं, हे पाहावं लागेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























