प्राजक्त तनपुरेंच्या साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त #5मोठ्या बातम्या

प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, FACEBOOK/PRAJAKT TANPURE

फोटो कॅप्शन, मंत्री प्राजक्त तनपुरे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. मंत्री प्राजक्त तनपुरेंची 13 कोटींहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने डिसेंबर महिन्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

त्यावेळी त्यांची 9 तास चौकशी करण्यात आली होती. सोमवारी ईडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. यावेळी तनपुरेंची एकूण 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

त्यामुळे आता नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीच्याच राज्यमंत्र्याच्या कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आता पुन्हा खळबळ उडाली आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

नागपूरमध्ये प्राजक्त तनपुरे यांचा राम गणेश गडकरी साखर कारखाना आहे. त्याचा लिलाव झाल्यापासून हा कारखाना वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर हा कारखाना प्रसाद शुगर अँड अलाईड कंपनीने विकत घेतल्यानंतर ईडीलाही या कारखान्याचा व्यवहार संशयास्पद वाटत होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळीही मुंबई, पुणे, नागपूर आणि अहमदनगरमध्ये धाडी टाकण्यात आल्या होत्या.

या धाडीत नागपूरमधील कारखान्याची एकूण 90 एकर जमीन तर अहमदनगरमधील 4 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे.

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी पक्षातून राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. ते प्रसाद साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत.

2. महाराष्ट्र चवताळला तर उद्रेक होईल- सुभाष देसाई

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने प्रयत्न करूनही केंद्र सरकारने निर्णय घेण्याचे टाळल्याने जन अभियान अधिक तीव्र केले जाणार आहे.

महाराष्ट्र चवताळला, तर उद्रेक होईल, असा इशारा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. आता हे अभियान आंदोलनात परिवर्तित होईल.

आजवर समंजसपणे मागणी करणारा मराठी माणूस चवताळला, तर तो मागेपुढे पाहणार नाही. संघर्ष अटळच असेल, छत्रपतींचा महाराष्ट्र तयार आहे, असा ठाम निर्धार देसाई यांनी व्यक्त केला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

सुभाष देसाई, शिवसेना, मराठी भाषा
फोटो कॅप्शन, मंत्री सुभाष देसाई

अभिजात दर्जा मिळण्यासाठी कुठलीच अडचण नसताना संघर्ष का करावा लागतो? जे हक्काचे आहे ते मिळवण्यासाठी आवाज का उठवावा लागतो? जनतेला किती दिवस झुलवत ठेवणार? रस्त्यावर उतरूनच न्याय मिळणार का?

हे सारे प्रश्न आता 13 कोटी मराठी भाषिक विचारत आहेत, असे देसाई यांनी नमूद केले. अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीला कुठले फायदे मिळणार ? केंद्राकडून किती निधी मिळणार ? या बाबींसाठी हा संघर्ष नाही.

आता हा प्रश्न 13 कोटी मराठी भाषिकांच्या अस्मितेचा झाला आहे. केवळ भारतच नव्हे, तर 55 हून अधिक देशातल्या मराठी बांधवांनी एकमुखाने ही मागणी केली आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

3. माधवी पुरी बुच सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष

भांडवली बाजाराची नियामक संस्था 'सेबी'चे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे येत असून, सोमवारी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार माधबी पुरी बुच या सेबीच्या नवीन अध्यक्षा म्हणून कार्यभार पाहतील. पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आलेले मावळते अध्यक्ष अजय त्यागी यांची त्या जागा घेतील. 'नवभारत टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रारंभिक तीन वर्षांच्या कालावधीसाठी बुच यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तथापि या संबंधाने औपचारिक आदेश लवकरच काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सेबीच्या पूर्णवेळ संचालक म्हणून बुच यांची कारकीर्द राहिली आहे.

नव्याने स्थापित आणि चीनमध्ये शांघाय येथे मुख्यालय असलेल्या नवीन विकास बँकेच्या बुच या सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल या खासगी गुंतवणूकदार संस्थेच्या सिंगापूरस्थित कार्यालयाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

त्याआधी बुच यांचा आयसीआयसीआय समूहात प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या.

4. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

सायन येथील एसआरए इमारतीतील घराबाबत वाचा फोडण्यासाठी मंत्रालयात आज एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. रूपा मोरे असे या महिलेचे नाव असून तिने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी तिला तात्काळ अडवलं. त्यामुळे पुढील अनर्थ ठरला. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रूपा मोरे या मध्यमवयीन महिलेने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला रोखले. तिच्यासोबत तिची दोन मुलेही होती. रूपा मोरे यांना नंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

5. कच्चा बदामचा गायक कार अपघातात जखमी

कच्चा बदाम गाण्याचे गायक भूबन बड्याकर यांचा सोमवारी रात्री अपघात होऊन जखमी झाले. अपघातानंतर त्यांना पश्चिम बंगालमधील बीरभूममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या अपघातानंतर असे समजले की, ते एक जुनी कार घेऊन चालवण्यास शिकत होते. त्यांच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या छातीला आणि दोन ठिकाणी जखम झाली आहे. सध्या ते रुग्णालयात दाखल झाले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे. 'आज तक'ने ही बातमी दिली आहे.

भुबन बदयाकर

फोटो स्रोत, YOUTUBE GRAB

फोटो कॅप्शन, भुबन बदयाकर

भूबन बड्याकर हे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी गावातील राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. भूबन अजूनपर्यंत शेंगदाणे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)