You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षण : आझाद मैदानात व्हॅनिटी कार कशासाठी? सदावर्तेंचा संभाजीराजेंवर निशाणा #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) आझाद मैदानात व्हॅनिटी कार कशासाठी? सदवर्तेंचा संभाजीराजेंवर निशाणा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केलं. मात्र, सरकारनं दिलेल्या आश्वासनांनंतर त्यांनी उपोषण सोडलं.
संभाजीराजेंच्या या उपोषणावर अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी टीका केलीय. लोकमतनं ही बातमी दिलीय.
"खासदार संभाजीराजेंच्या खासदारकीचा कार्यकाळ जून महिन्यात संपतोय. त्यामुळे संभाजीराजे व्हॅनिटी कार घेऊन आझाद मैदानात बसले," असं अॅड. सदावर्ते म्हणाले.
सदावर्ते पुढे म्हणाले, "ज्यावेळेस माणूस आत्मक्लेष एकत्रित करुन, चिंतनासाठी बसतो, त्यावेळेस व्हॅनिटी कार घेऊन बसत नाही. आम्हाला कधी त्याची गरज पडली नाही, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतही कधी व्हॅनिटी कार मी पाहिल्या नाहीत."
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आझाद मैदानात जाऊन संभाजीराजेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं होतं. हे आमरण उपोषण अडीच दिवसच चाललं.
2) भाजप-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस OBC आरक्षणाचे मारेकरी - अॅड. आंबेडकर
"सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले असा खोटा प्रचार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. हे चार पक्षच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहेत," असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर नांदेड दौऱ्यार होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, "आगामी निवडणुकीत या चारही पक्षांना ओबीसी बांधवांनी मतदान करू नये. आम्ही भाजपसोबत कदापीही आघाडी करणार नाही. काँग्रेससोबत आघाडी करायची तयारी आहे, त्यांनी चर्चेसाठी समोर यावं."
3) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई
सांगली जिल्ह्यातील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यानं आरबीआयनं ही कारवाई केलीय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
आरबीआयनं कारवाईच्या पत्रकात म्हटलंय की, "महाराष्ट्रातील सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक बंद करण्याचे आदेश जारी करुन कर्जदारासाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे."
आरबीआयने सांगितले की, लिक्विडेशनवर प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसीकडून पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असेल.
4) अमरावतीच आंध्रची राजधानी, 3 राजधान्या बनवण्याचा अधिकार नाही - न्यायालय
अमरावतीच आंध्र प्रदेशची राजधानी असेल, तीन राजधान्या बनवण्याचा अधिकार विधानसभेला नसल्याचं आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
"अमरावती शहर राजधानीसारखं विकसित केलं जावं. तीन महिन्यात भूखंडांची तरतूद करून, त्यावर सर्व सोयी-सुविधांसह मुलभूत गोष्टी निर्माण कराव्यात," असं न्यायालयानं म्हटलं.
यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं की, राज्याच्या विधानसभेला असा कुठलाच अधिकार नाही की, ज्यातून एकापेक्षा अधिक राजधान्या बनवल्या जाऊ शकतात. अमरावतीतून इतर ठिकाणी कार्यालयं स्थलांतरीत केली जाऊ नये.
5) चेन्नईला मिळणार सर्वात तरुण आणि पहिली दलित महापौर
तामिळनाडूतील चेन्नई शहराला सर्वात तरुण आणि पहिली दलित महौपर मिळणार आहे. 28 वर्षीय प्रिया या लवकर चेन्नई महापालिकेच्या महापौर म्हणून प्रभार स्वीकारतील. डीएमके पक्षानं त्यांच्या नावाची घोषणा केलीय. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.
प्रिया या चेन्नईच्या सर्वात तरुण महापौर असतील, तसंच त्या चेन्नईच्या पहिल्या दलित महापौरही ठरतील.
शिवाय, चेन्नई महापालिकेच्या इतिहासात प्रिया तिसऱ्या महिला महापौर ठरतील. यापूर्वी तारा चेरियन आणि कामाक्षी जयरामन या चेन्नईच्या महापौर होत्या.
चेन्नई महापालिकेत डीएमकेचं वर्चस्व आहे. प्रिया या उत्तर चेन्नईतील थिरू वि का नगर वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)