You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका: 'आम्ही 30 वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजलं, ते आता वळवळतंय', #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'आम्ही 30 वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजलं, ते आता वळवळतंय'- उद्धव ठाकरे
मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
भाजपचा उल्लेख सापाचे पिल्लू असा करत या सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, आता ते वळवळ करत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या सततच्या छाप्यांमुळे आपण दबून न जाता आक्रमकपणे तोंड देऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले.
माझं तुम्हाला आव्हान आहे की माझे 170 मोहरे तुमच्या गोटात घेऊन दाखवा आणि सरकार पाडून दाखवा असं आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे.
2. 'समर्थ रामदास शिवरायांचे गुरू होते हे शाळेत वाचलं' - रावसाहेब दानवे
समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वाद ओढवून घेतला होता.
आता त्यांच्याच शब्दांची रेघ ओढत 'समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. मी असेच शाळेत वाचले आणि शिकलो आहे' असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत असताना रावसाहेब दानवे यांनी असं वक्तव्य केलं आहे.
3. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य
परदेशात शिकणारे 90 % वैद्यकीय विद्यार्थी NEETमध्ये पास होऊ शकत नाहीत. त्यामुळेच ते शिक्षणासाठी परदेशात जातात, असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री जोशी यांच्यावर निशाणा साधला आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत केंद्रीय मंत्र्याचे असे वक्तव्य आपल्या अपमानापेक्षा कमी नाही, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
4. मध्य प्रदेशातल्या 2 शहरांत मांस आणि मद्यविक्रीवर बंदी
मध्य प्रदेशच्या कुंडलपूरसह 2 शहरांना पवित्र क्षेत्र म्हणून दर्जा देँण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे.
त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्री होणार नाही.
शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथे 285 किमी दूर दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर इथे जैन समुदायाच्या पंचकल्याणक महोत्सवात याची घोषणा केली. कुंडलपूर आणि बांदकपूर या दोन्ही शहरांना पवित्र शहरांचा दर्जाही त्यांनी यावेळी दिला. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.
5. वीजप्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं राज्यभर आंदोलन
शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता अधिक आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. 4 मार्च रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामीण भागात राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"शेतीला दिवसा 10 तास वीज द्या या मागणीसाठी मागील 9 दिवसांपासून महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. अद्याप महावितरणला जाग आली नाही. आंदोलनाचा दुसरा टप्पा 4 मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामधून सरकारने तोडगा नाही काढला तर आंदोलन व्यापक होईल.", असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)