You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: देश, राज्य, महापालिका तुम्हालाच हवी, मग आम्ही काय धुणीभांडी करायची का? #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाई्ट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. देश-राज्य महापालिका तुम्हालाच हवी आहे, मग आम्ही काय धुणीभांडी करायची का?- उद्धव ठाकरे
तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का?" असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. लोकसत्ताच्या 74व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मी पुन्हा येईन असं म्हणून न येणं हे वाईट असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
"सत्ता मिळवा पण ती लोकशाहीच्या मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासवलं आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत", अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
"भविष्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ज्या पद्धतीने आज भाजप चाललं आहे त्या पद्धतीने गेल्यास युती होणार नाही. भाजपने वैचारिक पातळी गमावली आहे. कुणीच कुणाला बांधिल नसतं."
बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांत या केंद्रीय तपास यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. तिथे बंदरावर किती मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडले होते. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. आपली तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजा वृंदावनची संस्कृती रुजलीये, गांजाची शेती होतेय असं चित्र उभं करायचं असं मुख्यमंत्री म्हणाले.
शस्त्रक्रीयेनंतर आता तब्येत सुधारत असून आधी विधिमंडळ अधिवेशनाला व नंतर मंत्रालयात जाणे सुरू करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
2. कोरोना निर्बंध शिथिल करण्याची केंद्राची राज्यांना सूचना
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारांना निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सामाजिक, मनोरंजन, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार करावा असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.महाराष्ट्र टाईम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मास्कचा वापर करणं, सामाजिक अंतर राखणं, अनावश्यक गर्दी टाळणं हे उपाय यापुढेही सुरूच राहतील असं राज्यांच्या मुख्य सचिवांना कळवण्यात आलं आहे.
देशात सध्या 1 लाख 34 हजार 235 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
3. स्वत:च्या भाषेवर हसणं आधी बंद करा - राज ठाकरे
"मराठी भाषा ही जगातील प्रमुख दहा भाषांपैकी एक आहे. ती सहजासहजी मरणार नाही, नष्ट होणार नाही. पण मराठी भाषा टिकण्यासाठी प्रत्येकाने मराठीत बोललंच पाहिजे. आपल्याला आपल्या भाषेत स्वीकारतील की नाही हा विचार कशाला? शहरी आणि ग्रामीण भाषा असा भेद नको. पाणी म्हटलं काय आणि पानी म्हटलं काय, लगेच गावंढळ म्हणून मोकळे होतात. पण त्यात गावंढळ काय? आपण आपल्या भाषेवर हसणं आधी बंद केलं पाहिजे," असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.
"तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम राहिलात तर समोरचा तुमची भाषा समजून घेतो. स्वत:च्या भाषेची लाज बाळगणं आधी बंद करा.
दक्षिणेतील लोक त्यांच्या भाषेवर ठाम असतात. गुजरातमध्ये गुजराती बोलतात. मग आपल्याला मराठी बोलण्यात, मराठीच्या बोर्डबाबत अडचण काय"? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
'मराठी भाषा हे तुमचं अस्तित्व आहे. ते टिकवणं गरजेचं आहे. मराठी भाषा कशासाठी पाहिजेत हे आम्हाला विचारतात. काय गरज आहे, कशाला पाट्या हव्यात वगैरे असं विचारलं जातं. पण या मूठभर लोकांकडे दुर्लक्ष करायचं असतं,' असं राज ठाकरे म्हणाले.
4. एसटी विलीनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही, राज्य सरकारची न्यायालयात माहिती
राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं अशी मागणी एसटी संपादरम्यान करण्यात आली. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
एसटीचं विलीनीकरण करण्याच्या संदर्भात एक उच्च स्तरीय समिती तयार केली होती. या समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार होता. मात्र, हा अहवाल सध्या जाहीर करु शकत नाही अशी माहिती राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली आहे. न्यूज18 लोकमतने ही बातमी दिली आहे.
महामंडळाचे वकील ऍड. नायडू यांनी सांगितले की, जस्टिस काथावला यांच्या ऑर्डरप्रमाणे एस टी विलिनीकरणचा अहवाल सार्वजनिक करण्याआधी कॅबिनेटची मान्यता घेणे गरजेच आहे. त्यामुळे अहवाल कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय सार्वजनिक करता येणार नाही असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
हा समितीचा अहवाल ST महामंडळालाही दिलेला नाही आणि संपकरी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनाही दिलेला नाही अशी माहितीही यावेळी राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात दिली.
यावर विलीनीकरणाच्या संदर्भातील अहवाल द्यायचा की नाही याबाबत आधी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा असं न्यायालयाने म्हटलं. अहवालाला काही आर्थिक तरतूद आहे आणि त्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 11 मार्च रोजी होणार आहे.
5. आयपीएल मुंबई-पुण्यात होणार, गटवार संरचना जाहीर
इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या हंगामासाठी नवे प्रारुप शुक्रवारी जाहीर करण्यात आलं. यंदाच्या हंगामात 8ऐवजी 10 संघ असणार आहेत.
दहा संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे बलाढय़ संघ वेगवेगळय़ा गटात असतील. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
अ-गटात पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे.
ब-गटात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. 26 मार्चपासून 'आयपीएल'चा थरार रंगेल.
प्रत्येक संघाचे आपल्या गटातील सर्व संघांशी प्रत्येकी दोन सामने होतील. तसेच दुसऱ्या गटातील आपल्या ओळीत असलेल्या संघाशी दोन, तर अन्य चार संघांशी प्रत्येकी एक सामना होईल. उदाहरणार्थ, मुंबईच्या समोरच्या ओळीत चेन्नई असल्याने उभय संघ दोनदा आमनेसामने येतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)