You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदाबाद बॉम्बस्फोटावरील भाजपची पोस्ट ट्विटरने का हटवली?
अहमदाबादमध्ये 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर गुजरात भाजपनं एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट वादात अडकल्यानंतर ट्विटरनं त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवलं.
18 फेब्रुवारी 2022 रोजी विशेष न्यायालयानं अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल सुनावला. न्यायालयानं 49 दोषींपैकी 38 जणांना फाशीची शिक्षा, तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालानंतर गुजरात भाजपनं अधिकृत ट्विटर हँडलवरून चित्र ट्वीट केलं. या चित्रात एकाचवेळी अनेकांना फासावर लटकवलेलं दाखवण्यात आलं होतं.
या ट्वीटला कॅप्शन देण्यात आलं होतं की, 'सत्यमेव जयते… दहशतवाद्यांना माफ केलं जाणार नाही.'
या चित्रात दाखवण्यात आलेले लोक विशिष्ट धर्माचे होते. त्यामुळे ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.
या वादानंतर ट्वीट डिलिट करण्यात आलं.
भाजपची प्रतिक्रिया काय?
गुजरात भाजपचे प्रवक्ते यामल व्यास यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हटलं की, "ट्वीटद्वारे देण्यात आलेला संदेश स्पष्ट होता की, ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना शिक्षा झालीय. स्फोटातली गुन्हेगारांच्या अनुषंगानं ते चित्र रेखाटण्यात आलं होतं. ते कोणत्याही एका विशिष्ट समाजाविरोधात नव्हतं."
गुजरात भाजपचे मीडिया सेल संयोजक यज्ञेश दवे यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हटलं की, "हा निकाल दुर्मिळातील दुर्मिळ मानला गेला. या निकालानंतर गुन्ह्यातील सर्व गुन्हेगारांचे फोटो वृत्तपत्त छापले गेले आणि टीव्हीवरही दाखवले गेले होते. त्यावरूनच हे चित्र रेखाटण्यात आले होते. फाशी दाखवण्यात आली आणि चित्र ट्वीट करण्यात आलं."
ट्वीट डिलिट करण्याबाबत ते म्हणाले, "काही समाजकंटकांनी आमच्या ट्वीटला रिपोर्ट केलं आणि त्यामुळे ट्विटरनं ते डिलिट केलं."
गुजरात काँग्रेसनं काय म्हटलं?
"दहशतवादाचा धर्माशी काहीही संबंध नसतो आणि हे काँग्रेसपेक्षा इतरांना कुणाला चांगलं माहित नसेल. कारण काँग्रेसनं दोन माजी पंतप्रधान दहशतवादामुळे गमावलेत," असं गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोषी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं.
ते पुढे म्हणाले की, "भाजप कोर्टाच्या निकालाचा फायदा घेऊ पाहतेय आणि वादग्रस्त ट्वीटच्या माध्यमातून निकाल साजरा करतायेत. असे निकाल राजकीय फायद्यासाठी वापरणं योग्य नाही."
नागरिकांचं म्हणणं काय आहे?
भाजपच्या कृतीचा निषेध करत, अमेरिकेतील मुस्लीम स्कॉलर ओमर सुलेमान लिहितात की, "जेव्हा 'जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही' देशातील सत्ताधारी पक्ष असं ट्वीट करतं, तेव्हा आपण कुठे चाललो आहोत हे स्पष्ट होतं. अत्यंत भयावह आणि सध्या जे शाळांमध्ये हिजाबबंदी, काश्मीरमध्ये अवैध ताबा यांसारख्या गोष्टींशी साम्य दाखवणारंच आहे."
पत्रकार राहुल पंडिता लिहितात, "हे अत्यंत लाजीरवाणे कृत्य आहे. हे जर मागे घेतलं नाही, आणि मागे घेण्याची शक्यता कमीच आहे, तर या ट्वीट प्रकरणात सरकारचा सहभाग असल्याचं गृहित धरलं पाहिजे."
गुजरात भाजपच्या ट्वीटमध्ये राष्ट्रीय प्रतिकाचा वापर केल्याबाबत संताप व्यक्त करत, शाहीन नामक युजर म्हणतात, "अल्पसंख्यांक समाजाविरोधात द्वेष पसरवण्यासाठी राष्ट्रीय प्रतिकाच्या वापरास परवानगी आहे का? @TwitterIndia @Twitter, आशा आहे, तुम्ही हे ट्वीट तातडीनं मागे घ्याल, ज्यातून मुस्लिमांवर निशाणा साधण्यात आलाय आणि राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान करण्यात आलाय."
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी ट्वीट केलंय की, "नरसंहारासारखं चित्र भारताच्या सत्ताधारी पक्षानं करून, त्यांनी त्यांचा हेतू स्पष्ट केलाय. सर्वात वरील बाजूस त्यांनी भारताच्या प्रतिकाचाही वापर केलाय. माहिती व तंत्रज्ञानमंत्री @Ashwinivaishnaw यांनी तातडीनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की, हे सरकारचं धोरण आहे का आणि गुन्हेगारांना अटक करा."
अभिनेत्री श्रुती सेठनं ट्विट करून म्हटलंय की, "तुम्ही या ट्वीटला कशी परवानगी दिलीय @TwitterIndia"
खालसा एडचे संस्थापक रविंदरसिंग यांनी म्हटलंय की, "अतिशय द्वेषपूर्ण आणि गुन्हेगारी वृत्तीचं! हे भारतातील सत्ताधारी पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल आहे. असं दिसतंय की ते दुसऱ्या नरसंहाराकडे वळतायेत."
गुजरात भाजपच्या या ट्वीटवर केवळ भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही टीका होतेय.
ऑस्ट्रेलियातील हिंदी भाषेचे प्राध्यापक इआन वूलफोर्ड म्हणतात की, "तुम्हाला माहित आहे का, तुम्ही काय करताय ते. गुजारतमध्ये तुमचा पक्ष सत्ताधारी आहे आणि तुम्ही नरसंहाराला प्रोत्साहन देणारा संदेश देताय, तेही तुमच्या जवळपास 15 लाख फॉलोअर्सना. हे धक्कादायक कृत्य आहे. तुम्ही अत्यंत गलिच्छ कृती केलीय. जगभरातून या कृतीचा निषेध केला गेला पाहिजे."
अहमदाबाद स्फोट प्रकरणाचा निकाल
2008 साली अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटाच्या निकालात विशेष न्यायालयानं 49 पैकी 38 जणांना फाशीची शिक्षा, तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. UAPA आणि IPC सेक्शन 302 अंतर्गत या आरोपींना दोषी ठरवण्यात आलं.
याआधी विशेष न्यायालयानं 77 पैकी 49 आरोपींना दोषी, तर 28 जणांना निर्दोष सोडलं होतं.
निकाल सुनावताना विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी आदेश दिला की, स्फोटात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाखांची नुकसानभरपाई द्यावी, तर जखमींना 50 हजारांची मदत द्यावी. शिवाय, किरकोळ जखमा झालेल्यांना 25 हजारांच्या मदतीचे आदेशीही देण्यात आलेत.
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 साखळी स्फोट झाले होते. हे स्फोट वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते. यात 56 लोकांचा जीव गेला होता, तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते.
इंडियन मुजाहिद्दीन आणि हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी या दोन संघटनांनी या स्फोटाची जबाबदारी घेतली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)