'संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवणार' - मोहित कंबोज #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, MOHIT KAMBOJ/TWITTER
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. 'संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवणार' - मोहित कंबोज
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांच्यावर केलेले आरोप त्यांनी फेटाळले आहेत.
आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचंही कंबोज म्हणाले. तसंच कोणतेही तथ्य नसताना आरोप केल्याने संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचंही मोहित कंबोज म्हणाले. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
पत्रा चाळ जमिनीत मोहित कंबोज यांची गुंतवणूक असल्याचा आरोप संजय राऊत यांनी मंगळवारी (15 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत केला.
कंबोज हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'फ्रंटमॅन' आहेत आणि तेच त्यांना एक दिवस बुडवणार असंही राऊत म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पत्रा चाळ येथील जमीन माझ्या कंपनीने कायदेशीररित्या खरेदी केली होती आणि त्यात आमचं आर्थिक नुकसानही झालं असं कंबोज यांनी स्पष्ट केलं.
आपले आणि संजय राऊत यांचे पूर्वीपासून संबंध असल्याचंही कंबोज म्हणाले. दरवर्षी गणेशोत्सवात संजय राऊत घरी येतात तसंच अनेकदा राऊतांना आर्थिक मदत केल्याचा दावाही कंबोज यांनी केला आहे.
2. 'हिंदूंचे सण आले की अटी लागू करतात' - राम कदम
19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याबाबत राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.
शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत 200 जण आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी 500 जणांना उपस्थित राहता येईल असं सरकारकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय.

फोटो स्रोत, RAM KADAM/TWITTER
गृह विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी मान्यता दिली. सर्व नियमांचं पालन करत आरोग्याची काळजी घेत शिवजयंती साजरी करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
भाजपने मात्र या नियमावलीवर टीका केलीय. आमदार राम कदम यांनी यासंदर्भात ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.
"हिंदूंचा उत्सव आला की अटी लागू केल्या जातात. शिवजयंती साजरी करताना ठाकरे सरकारच्या जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही. काय करायचं ते करा आम्ही शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करणार," असं राम कदम म्हणाले.
3. 'राज ठाकरे यांना 'मराठी हृदयसम्राट' असेच म्हणा' - मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'मराठी हृदयसम्राट' असेच संबोधले जावे, इतर कोणतीही पदवी वापरू नये असा आदेश पक्षाने दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मनसेकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी निवेदन जारी करण्यात आलं आहे. "महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावापुढे प्रचलित असलेली 'मराठी हृदयसम्राट' हीच उपाधी लावण्यात यावी. इतर कोणतीही उपाधी वापरण्याचा उद्योग करू नये. या आदेशाचे तंतोतंत पालन करावे." एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
मंगळवारी (15 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचे बॅनर उभारण्यात आले. या बॅनर्सवर राज ठाकरे यांच्या नावासमोर 'हिंदू हृदयसम्राट' असा उल्लेख करण्यात आला आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिक 'हिंदुहृदयसम्राट' असे म्हणत. आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणणारे बॅनर लागल्याने याची चर्चा होत आहे.
4. नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण चांदिवाल आयोगासमोर त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, NAWAB MALIK/SOCIAL MEDIA
मुंबईतील करमायकल रोडवर गाडीत स्फोटकं सापडल्याप्रकरणी नवाब मलिक यांनी काही वक्तव्य केली होती. यासंदर्भात ही चौकशी होणार असून चांदिवाल आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
17 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना आयोगासमोर हजार राहण्यचे आदेश दिले आहेत.
स्फोटक गाडीत ठेवल्याच्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार परमबीर सिंह आणि सचिन वाझे आहेत असा आरोप मलिक यांनी चौकशी दरम्यान केला होता. याप्रकरणी त्यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो.
5. मिताली राजच्या नावावर 'हा' नवीन विक्रम
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या कर्णधार मिताली राज यांनी सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. लोकमतने हे वृत्त दिलं.

फोटो स्रोत, HARRY TRUMP-ICC
सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या मिताली राज जगातील पहिल्या क्रिकेटपटू बनल्या आहेत. 12 फेब्रुवारीला मिताली राज यांनी न्यूझीलंडविरुद्धचा सामना खेळून 22 वर्षे 231 दिवसांची कारकिर्द पूर्ण केली.
यापूर्वी पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. सचिनची वनडे कारकिर्द 22 वर्षे 91 दिवसांची आहे. आता सचिनच्या नावावर पुरुष क्रिकेट टीमचा विक्रम आहे.
तर महिला क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम आता मितालीच्या नावावर आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























