You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महादेव सरोदे : एकेकाळी शेतमजुरी करणारा शेतकरी असा झाला करोडपती
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
महादेव सरोदे यांना आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कधी काळी शेतात मजुरीचं काम करावं लागलं होतं. पण आज त्यांनी 50 एकर शेती विकत घेतली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते वर्षाला कोटींच्या घरात ते उत्पन्न घेतायत. संत्री, द्राक्ष अशा फळबागांमधून त्यांना हे भरघोस उत्पन्न मिळतंय.
वाशिमच्या असोले गावात 50 एकर शेतीवर फळबागा फुलवणारे महादेव सरोदे मुंबईला राहतात, पण महिन्यातून दोन ते तीन वेळा गावी शेतात प्रत्यक्ष भेट देतात. पण दररोज शेतात काय सुरू आहे, पीक-पाण्याची काय परिस्थिती आहे यावर मुंबईहून देखरेख ठेवतात.
असोला सारख्या छोट्याश्या गावातून ते मुंबईपर्यंत आणि शेती करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
सरोदे यांच्याकडे वडिलोपार्जित इंचभरही शेतजमीन नव्हती. त्याचं अख्खं कुटुंब शेतात राबायचं. आणि सरोदेही गावात दुसऱ्यांकडे मजुरीच्या कामावर जायचे. मजूरी करत असतानाच त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं होतं.
अकोल्याहून BSC केल्यानंतर त्यांनी कामासाठी मुंबई गाठली. ट्रकवर मजूर म्हणून काम करत त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाईन आर्ट आणि इंटिरियर डिझायनिंगच शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. शिक्षण सुरू असतानाच काम मिळत गेली. त्यातून आर्थिक मिळकतही होत होती.
पण लहानपणापासून असलेली शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
जेव्हा शेतजमीन खरेदी केली...
इंटिरिअर डिझायनर म्हणून चांगला जम बसल्यावर ते मुंबईत बोरिवलीमध्ये स्थाईक झाले.
पहिल्यांदा त्यांनी 2007 साली आपल्या असोला गावी साडेपाच एकर शेती घेतली. त्यानंतर बारा वर्षांमध्ये त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती घेत त्यांनी 50 एकर जमिनीपर्यंतचा पल्ला गाठलाय.
सरोदे सांगतात, "सुरूवातीला साडेपाच एकर शेती विकत घेतली तेव्हा तिथे काहीच नव्हतं. मी वीज कनेक्शन घेतलं. विहीरी खणल्या. त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये पाण्याचा अतिरिक्त स्रोत म्हणून दोन कूपनलिका आणि एक राखीव शेततलाव तयार केलंय.. त्यामुळं त्यांच्या शेताला पाण्याची कमतरता कधीच भासत नाही. ठिबक सिंचनाने संपूर्ण शेतीला पाणी दिलं जातं."
पण हे करण्याआधी त्यांनी पहिल्यांदा आपल्या शेतात अडीच एकरात शिमला मिरचीची लागवड केली होती. त्यात साडेसात लाखाचं उत्पन्न आलं. गहू लावला तर 40 क्विंटल गहू झाला. मग संत्रा आणि इतर फळबागांकडे ते वळले.
'शिकत शिकत फळबागा केल्या'
सोयाबीन, तूर, कापूस या पारंपरिक पिकांमधून यशाचा पल्ला गाठता येत नाही हे सरोदे यांना तोपर्यंत कळून चुकलं होतं. त्यामुळे ते फळबाग शेतीकडे वळले.
होस्टेलमध्ये असताना त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या मित्रांची शेती पाहून आपल्या विदर्भाच्या मातीतही काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा असं वाटायचं. म्हणून त्यांनी सुरूवातीला संत्रा बाग लावली.
फळबागेचं तंत्र शिकत शिकत त्यांनी आपल्या संत्र्याच्या बाहेत सुधारणा करत झाडांच्या संख्या वाढवली. आज त्यांच्याकडे 5 ते 6 हजार संत्र्याची झाडं आहेत.
"संपूर्ण अभ्यास करूनच संत्रा झाड लावली. झाडांमध्ये किती अंतर असावं, काय फवारणी करावी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. आता माझ्याकडे सीडलेस तसंच नागपुरी संत्रा आहे. यापूर्वी 75 टक्के बाग यायची, पण गेल्यावर्षी पासून संत्राच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली."
गेल्या वर्षी जवळपास 30 ते 35 लाखांचं संत्रा उत्पादन झालं. तर यंदा 200 टन संत्र्याचं पीक म्हणजेच जवळपास 80 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे" असं सरोदेंना वाटतंय.
विदर्भात कशी केली द्राक्षबाग?
मौसमी संकटामुळे संत्राच्या उत्पन्नात घट येऊ शकते, हे जाणून त्यांनी इतर फळबागांही करता येतील का यावर विचार सुरू केला. आता छोट्या क्षेत्रात त्यांनी द्राक्षं, सीताफळ, पेरू, लिंबू, मौसंबी या फळबागांची लागवड केली आहे.
संत्रा उत्पन्नात घट झाली की इतर फळाबागांमधून त्यांची भरपाई होऊ शकते.
मौसंबीची जवळपास 1000 झाडं, लिंबूची 400 झाडं आहेत. ,
नाशिकचा अभ्यासदौरा केल्यानंतर त्यांनी द्राक्षांच्या बागा लावल्या. पण द्राक्ष बागांचा पहिला प्रयोग अयशस्वी झाल्याचं ते सांगतात. तिथूनच पुढे ही फळ शेती सल्लागारांच्या मदतीने करायला त्यांनी सुरूवात केली.
सांगली जिल्ह्यातील हिम्मत पाटील हे त्यांचे सल्लागार आहेत. सरोदे म्हणतात- पाटलांच्या सल्लामुळे 3 एकरातील संत्रा बागेला चांगली फळ आहेत. आज साधारण 30 टन द्राक्षांच उत्पादन झाडावर असल्याचंही ते सांगतात.
सरोदे यांच्या बागेत तीन एकरवर सुपर सोनाका आणि माणिक चमन अशा दोन जातींची द्राक्षं आहेत.
विदर्भ द्राक्षांसाठी उत्तम?
योग्य नियोजनातून द्राक्षांची शेती चांगली होऊ शकते हे सरोदे यांची फळबाग पाहिल्यावर दिसून येतं. ते म्हणतात "इथल्या वातावरणामुळे विदर्भात द्राक्षं शक्य नाही अस बहुतांश शेतकरी सांगतात. मला वाटतं विदर्भात ड्राय झोन असल्यामुळं द्राक्षांची शेती उत्तम होऊ शकते. थोडं खर्चीक असली तरी सुरूवातीला एकदाच खर्च करावा लागतो. एकदा द्राक्ष बाग लावली की मग वर्षाला एक ते दीड लाख इतकाच खर्च आहे".
सरोदे यांना तीन एकरातील द्राक्ष शेतीसाठी 6 लाख खर्च आला. यातून जवळपास 60 टन द्राक्षांच उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं. पण यंदाच्या मौसमात 30 टन द्राक्षांचं उत्पन्न येईल असं त्यांना वाटतंय. साधारण 50 रुपये किलो भावाने साधारण 15 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
ते म्हणतात, "इतर फळांच्या तुलनेत द्राक्षांच्या पिकाचं व्यवस्थापन वेगळं आहे. पण कष्टकरी शेतकऱ्याला सहज शक्य होईल असंच हे पीक आहे. टेक्निकल म्हणजेच तांत्रिक पद्धतीचं पीक असल्यामुळे फवारणी, खत आणि पाण्याचं नियोजन करता येतं.
महादेव सरोदे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करतायत. व्यवसाय सांभाळून शेतीकडे ते बिझनेस म्हणूनच पाहतायत. महिन्यातले चार दिवस नियमित शेतीला भेट देतात.
शेतीची देखरेख करण्यासाठी त्यांनी दोन पगारी मॅनेजर नेमले आहेत. आणि काही शेतमजूर.
शेतातली प्रत्येक घडामोड म्हणजेच फळबागांवरची फवारणी, रोगराई याविषयी सरोदे यांना मॅनेजर्सकडून नियमित माहिती मिळते.
शिवाय अनेक गोष्टी ते मुंबईतूनच सांभाळतात.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
मुंबईतून मोबाईल अॅपच्या साहाय्याने ते पाण्याचं नियोजन करतात. फळबागांना पाण्याची गरज भासल्यास मोबाईल अॅपमुळे त्यांना सूचना देता येते. इतकंच नाही तर घरबसल्या पाण्याची मोटारही चालू-बंद करता येते. शेतातल्या तांत्रिक अडचणी देखील या अॅपमुळे त्यांना कळतात.
हवामानावर आधारित शेतीचं काटेकोर नियोजन केलं तर उत्तम फळबागा करता येऊ शकतात असं सरोदे यांच म्हणणं आहे.
"हवामानावर आधार शेती केल्यास शेतकऱ्यांना तोटा होत नाही. शिवाय तुम्हाला पीक, फवारणी, खत, पाणी याविषयी योग्य मार्गदर्शन मिळतं. पावसाचा अचूक अंदाज बांधता आला तर शेतीत नुकसान टाळता होऊ शकतं."
हवामान बदलामुळे विदर्भातील संत्रा शेतकरी अडचणीत सापडलेले दिसतायत. गेले काही वर्षं अनेक संत्रा बागायतदार शेतकऱ्यांनी फळपिकांवर येणाऱ्या रोगांमुळे शेती परवडत नसल्याचं म्हटलंय. काही शेतकऱ्यांनी भाव न आल्याने आपल्या बागाही नष्ट केल्याची उदाहरणं समोर आली आहेत.
या पार्श्वभूमीवर बोलताना सरोदे म्हणतात, "संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून मोर्शी, वरुड, चांदुर बाजार प्रसिद्ध आहे. पण तिथल्या शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दर वर्षी अधिक उत्पादन घेणं शक्य आहे".
पारंपरिक शेतीमध्ये अपेक्षेइतकं उत्पन्न मिळतंच असं नाही. पण त्यातही फळबागा तुमचं नुकसान होऊ देत नाही हा अनुभव गाठीशी असल्याचं सरोदे सांगतात. यावर्षी त्यांना संपूर्ण फळबाग शेतीमधून 75 लाखांच उत्पन्न मिळेल असं वाटतंय. तर पुढल्या वर्षी एक कोटींचा टप्पा गाठू असा त्यांना विश्वास आहे.
एका शेतमजुराचा शेतीच्या जोरावर करोडपतीच्या दिशेने झालेला प्रवास अनेकांना प्रेरणा देतोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)