You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांना धक्काबुक्की
मुंबईत दादर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आज (2 फेब्रुवारी) काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.
पेगासस हेरगिरीच्या प्रकरणावरून काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही गर्दी केली. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबवत असताना पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याचं दिसून आलं. भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयातून बाहेर येत कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असताना कार्यकर्ते तिथेच रस्त्यावर ठाण मांडून बसले.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही शक्य ती खबरदारी घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
महिला पोलिसांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली का? यावर उत्तर देताना पोलीस अधिकारी म्हणाल्या, "जे झालं ते तुमच्या समोर झालं आहे. कॅमेऱ्यात सर्व आहे. मी आता काहीच बोलू शकत नाही."
काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलनादरम्यान ते म्हणाले, "नागरिकांचे फोन टॅप केले जात आहेत. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांची हेरगिरी सुरू आहे. याविरोधात काँग्रेसने आंदोलन केले."
आपल्याच देशात नागरीक सुरक्षित नसल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबई युथ काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं.
तसंच भाजपचे नेते प्रसाद लाड आणि कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
यावेळी प्रसाद लाड म्हणाले, "भाजपच्या कार्यालयावरती येण्याची हिंमत काँग्रेसने दाखवली. याचा निषेध म्हणून आम्ही विरोधात आंदोलन केलं. पण पोलिसांनी आम्हाला अडवलं. आम्ही अर्धा तास लढा दिला. मंगलप्रभात लोढा, कालीदास कोळंबकरांसहीत आम्हाला अटक केली आहे. याचा आम्ही निषेध करतो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)