पुणे: बालेवाडीच्या स्वर्णवला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात मृत्यू

डुग्गू
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बाणेर येथील अपहरण झालेल्या मुलगा स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेड वरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्या चा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

सुनीता संतोष राठोड वय 36 यांचा अपघातामध्ये नगर महामार्गावर चार चाकी अपघातात मृत्यू झाला असून त्यांची दोन मुले व पती गंभीर जखमी झाले आहेत.

समर राठोड (वय 14) अमन राठोड (वय 6) अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघात

कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

नेमकं काय घडलं होतं?

आठ दिवस झाले तरी मुलाचा शोध लागत नव्हता त्यामुळे बीबीसी मराठीने घटनास्थळी जाऊन आढावा घेतला होता.

बालेवाडी हाय स्ट्रीट पुण्यातला एक महत्त्वाचा भाग. अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या, हॉटेल आणि रहिवासी इमारतींचा हा भाग. थोड्याच अंतरावर मुंबई पुणे महामार्ग सुद्धा आहे. हॉटेल आणि आयटी कंपन्यांमुळे या भागात नेहमीच वर्दळ असते.

बालेवाडी

या भागातच पोलीस चौकी असल्याने पोलिसांचं पेट्रोलिंग सुद्धा सुरू असतं. आम्ही जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा देखील एक पोलिसांची व्हॅन त्या भागात पेट्रोलिंग करताना आढळून आली होती.

घटनास्थळाच्या जवळच एक पान टपरी होती. घटना घडली तेव्हा टपरीचालक तेथेच होता. त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली होती.

1 जानेवारीच्या सकाळी 9 च्या सुमारास त्या टपरीवाल्याने नुकतीच त्याची टपरी सुरू केली होती. नेहमीची पूजा करून त्याने कामाला सुरुवात केली होती. साधारण 9.40 च्या सुमारास त्याच्या टपरीपासून काही अंतरावर अपहरणाची घटना घडली.

"मी सकाळी नुकतीच टपरी सुरू केली होती. त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. माझ्या टपरीपासून काही अंतरावरच त्या मुलाचं अपहरण झालं. अपहरण झालं तेव्हा त्या लहान मुलासोबत एक साधारण 12-13 वर्षाचा मुलगा होता. त्याने घरी जाऊन घटना सांगितली आणि मग त्या मुलाच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली," टपरीवरीवाला सांगत होता.

घटनास्थळाजवळच एक चहाचा ठेला सुद्धा होता. त्या चहाच्या ठेल्यावरुन काही माहिती मिळतेय का हे जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला. घटना घडली तेव्हा तो चहावाला देखील तेथेच होता. अपहरण घटनेची माहिती त्याच दिवशी कळाल्याचं त्यानं सांगितलं. परंतु जेव्हा अपहरणाची घटना पाहिली का याबाबत विचारलं असता त्याने बोलण्यास नकार दिला.

ज्या ठिकाणावरून अपहरण झालं त्याच्यापासून हाकेच्या अंतरावरच पोलीस चौकी आहे. आम्ही जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा अनेक सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा त्या भागात असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी आठ दिवस घेतला शोध

आठ दिवसांनंतरही त्या मुलाचा शोध लागू शकला नव्हता त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. तपास सुरू असल्याचं पोलीस सांगत होते.

त्या मुलाचे फोटो आणि त्याची माहिती अनेक राजकारण्यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली होती, अनेक व्हॉट्सअप ग्रूपवर देखील त्या मुलाची माहिती पाठवली जात होती.

काही सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये एक व्यक्ती त्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असल्याचं दिसलं होतं. परंतु ती व्यक्ती पुढे कुठे गेली? याबाबतची माहिती मिळू शकलेली नव्हती.

आठ दिवस उलटून खंडणीचा किंवा इतर मागणीसाठी अपहरणकर्त्याचा फोन न आल्याने या घटनेचे गूढ अधिक वाढलं होतं पण मुलगा सापडला त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)