You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार : उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, 'आदित्य' शब्द मागे घेतो #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, 'आदित्य' शब्द मागे घेतो - अजित पवार
उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचा 'मुख्यमंत्री' असा उल्लेख केल्याचं अजित पवारांचं विधान काल (15 जानेवारी) दिवसभर चर्चेत राहिलं. मात्र, नंतर अजित पवारांनी स्वत: यावर स्पष्टीकरण देत चर्चा थांबवली.
न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
झालं असं की, पुण्यात कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीआधी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, "नागरिकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरू केलीय. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील."
अनवाधनाने आपण आदित्य ठाकरेंनाचा 'मुख्यमंत्री' म्हटल्याचे अजित पवारांना लक्षात आलं नाही. त्यात आधीच उद्धव ठाकरेंच्या आजारापणामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या चर्चेत या विधानाची भर पडली.
मात्र, कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांनीच याबाबतचा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले, "मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्या ठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. आमच्यात तसा कोणताही गैरसमज नाही. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत."
अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं तरी राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्येही मात्र अजित पवारांच्या अनवाधनानं झालेल्या चुकीची खमंग चर्चा झाली.
2) नाव 'राष्ट्रवादी' असलं, तरी तो पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष - फडणवीस
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. लोकमतनं ही बातमी दिलीय.
"पवारांचा पक्ष असा आहे की, पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाए उसके जैसा. ते कधी समाजवादी पक्षाशी संवाद साधतात, कधी तृणमूलशी संवाद साधतात," असं म्हणत फडणवीसांनी पुढे राष्ट्रवादी 'पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष' असल्याचं म्हटलं.
"राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष नाही, त्यांचं राष्ट्रीय अस्तित्व नाही, राष्ट्रीय विचारही नाहीत, नाव राष्ट्रवादी असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष आहे," असं फडणवीस म्हणाले.
"शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला ते दाखवणं गरजेचं आहे. गोव्यात थोड्या जागांवर लढण्याचा विचार करत असले तरी त्यांचा कुठलाही फायदा होणार नाही," असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया आलेली नाही.
3) सपासोबत युती नाही, अखिलेश यादवांनी अपमान केला - चंद्रशेखर
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानं उत्तर प्रदेशात पक्षांतरं आणि युत्या-आघाड्यांना सध्या जोर आला आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत अनेक लहान-सहान पक्ष जोडले जात असतानाच, आझाद समाज पार्टीनं पाठ वळवलीय.
यूपीतल्या येत्या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती करणार नसल्याचं आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी जाहीर केलं. अखिलेश यादव यांनी अपमान केल्याचा दावाही त्यांनी केला.
सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.
"आम्ही एका महिन्यापेक्षा जास्त दिवस यावर चर्चा करत होतो आणि मागच्या सहा महिन्यांपासून भेटी झाल्या. पण युतीसंदर्भात काहीही साध्य झालं नाही. म्हणून आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढू," असं चंद्रशेखर म्हणाले.
दुसरीकडे, उत्तर प्रदेशात भाजपला हरवणं येऱ्या-गबाळ्याचं काम नाही, असं केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी म्हटलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
"उत्तर प्रदेशात भाजप सोडून गेले त्यांचंच नुकसान होईल. भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप 300 जागा जिंकणार आहे," असा दावाही रामदास आठवलेंनी केलाय.
4) अझीम प्रेमजींविरोधात याचिका दाखल करणं वकिलांना पडलं महागात
विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांच्याविरोधात एकाच प्रकरणात अनेक याचिका करणं कर्नाटकातील दोन वकिलांना महागात पडलंय.
कर्नाटक हायकोर्टानं या दोन्ही वकिलांना दोन महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
अझीम प्रेमजी यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करत, या एकाच प्रकरणात ''इंडिया अवेक फॉर ट्रान्स्परन्सी या स्वयंसेवी संस्थेच्या आर सुब्रमणियन आणि पी सदानंद या दोन वकिलांनी एकाहून अधिक याचिका दाखल केल्या होत्या.
गेल्यावर्षी कोर्टानं या संस्थेला याच प्रकरणात 10 लाखांचा दंड ठोठावला होता. मात्र, आता वकिलांनाही दोषी ठरवत, तुरुंगात धाडलं आहे.
5) कोरोनाच्या संकटापेक्षा भयानक आजची शिक्षणव्यवस्था - डॉ. अभय बंग
"कोरोनाच्या संकटापेक्षा अधिक भयानक संकट म्हणजे आजची शिक्षण व्यवस्था आहे. ती इतकी असक्षम आहे की त्यातून मुलांना काहीच मिळत नाही," असं ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. अभय बंग म्हणतात, "कोरोनामुळे मुलांची दोन वर्षे वाया गेली अशी ओरड करणारे या वाईट शिक्षण व्यवस्थेवर काहीच बोलत नाहीत. या व्यवस्थेला आता पर्याय गरजेचा आहे. महात्मा गांधींच्या वर्धा शिक्षण योजना किंवा 'नई तालीम'च्या धर्तीवर नव्या शिक्षण व्यवस्थेची गरज आहे."
"असरचा सर्व्हे येतोय, त्यामध्ये सांगण्यात येतंय की पाचवीच्या वर्गातल्या मुलाला धड वाचता येत नाही. मग त्या मुलाची पाच वर्षे वाया गेलीच ना? हे शिक्षण व्यवस्थेमध्ये राजरोस घडतंय. ही मुलं खऱ्या अर्थाने निरक्षरच आहेत. हे शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव आहे," असं डॉ. बंग म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता