शरद पवारांनी 'रयत'चं अध्यक्षपद सोडावं, शिवसेना आमदाराची मागणी, महाविकास आघाडीत तणाव #5मोठया बातम्या

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. शरद पवारांनी 'रयत'चं अध्यक्षपद सोडावं, शिवसेना आमदाराची मागणी, महाविकास आघाडीत तणाव

"रयत शिक्षण संस्थेत एकाच कुटुंबातील 9 सभासद झाले आहेत. या संस्थेचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न आहे का? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या संस्थेचं अध्यक्षपद सोडावं," अशी मागणी शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

पण या मुद्य्यावरून आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले असून त्यावरून तणाव वाढत असल्याचं दिसत आहे.

शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं.

"तुम्ही 50 टक्के भागीदार असलेल्या गौरीशंकर संस्थेची अवस्था काय आहे? या संस्थेतील क्लार्कचा आणि प्राध्यापकांचा साधा पगार देता आला नाही. तसंच तुम्ही घेतलेल्या साखर कारखान्याचं पुढे काय झालं," असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

इतकंच नव्हे तर शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते असं म्हणत आव्हाड यांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

2. एक वर्ष निलंबन म्हणजे आमदारकी रद्द होण्यापेक्षाही वाईट - सुप्रीम कोर्ट

पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांवर एका वर्षाची निलंबनाची कारवाई ही आमदारकी रद्द झाल्यापेक्षाही वाईट आहे, असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवल आहे.

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, Reuters

गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्याविरोधात भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

याप्रकरणी काल (मंगळवार, 11 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

आमदारांचं एक वर्षांचं निलंबन हे आमदारकी रद्द केल्यापेक्षाही वाईट आहे. कारण या काळात त्यांच्या मतदासंघाचे कुणीच प्रतिनिधित्व करणारे नाही. जर आमदारकी रद्द केली तर त्या जागी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला स्थान मिळते. पण एक वर्ष निलंबन म्हणजे, मतदारसंघासाठी कोणत्याही शिक्षेसारखंच आहे, असं न्यायमूर्तींनी यावेळी म्हटलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

3. महाराष्ट्रात तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, हे गोव्यात होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची तृणमूल किंवा काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही. स्पष्ट बहुमत गोव्याची जनता भाजपलाच स्पष्ट बहुमत देईल. महाराष्ट्रात तीन पक्षांनी जनमताची चोरी केली. ते आम्ही गोव्यात होऊ देणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, facebook

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "गोव्यात भाजप फार मोठा आहे, कोणाच्या जाण्याने या पक्षाला फार फरक पडेल असं नाही. त्या उलट पक्षात येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे."

या निवडणुकीत भाजपा चांगल्या फरकाने सरकार स्थापन करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

4. अमेरिकेतून डुकरांचं मांस आयात करण्यास केंद्राची परवानगी

अमेरिकेतून भारतात डुकराच्या मांसाची आयात करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली असून ऐतिहासिक पाऊल म्हणून या घटनेकडे पाहिलं जात आहे.

अमेरिकेतील डुकरांपासून तयार केलेली विविध उत्पादनं आता भारतात आयात करणं या निर्णयामुळे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे भारताची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली झाली असून अमेरिकेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ही बातमी 'द हिंदू'ने दिली.

5. अजिंक्य रहाणेच्या तंत्रकौशल्यात समस्या - गौतम गंभीर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरल्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.

"रहाणेच्या तंत्रकौशल्यात मागच्या वर्षापासून काहीतरी अडचण आहे. खेळताना त्याचा पायच बाहेर येत नाही, ज्यामुळे त्याला खेळताना संतुलन ठेवता येत नाही. दक्षिण आफ्रिकेत चेंडू खूप सीम होतो, त्यामुळे केवळ हाताच्या बळावर आपण फलंदाजी करु शकत नाही," असं मत माजी खेळाडू गौतम गंभीर यांनी व्यक्त केलं.

गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य रहाणेकडून अपेक्षेनुसार कामगिरी होऊ शकली नाही. त्यामुळे त्याला संघाचं उपकर्णधारपदही गमवावं लागलं होतं. एकामागून एक डावात अपयशी ठरत असल्यामुळे अजिंक्य रहाणेवर संघातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवेल, अशी भीती आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)