नरेंद्र मोदींना IIM च्या विद्यार्थ्यांनी लिहिले पत्र, 'द्वेषपूर्ण वक्तव्यांबाबत मौन बाळगू नका' - #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. तुमच्या मौनामुळे द्वेषपूर्ण वक्तव्यांना उत्तेजन, आयआयएम विद्यार्थी-प्राध्यापकांचे पंतप्रधानांना पत्र

"माननीय पंतप्रधान, सध्या देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या घटनांवर तुम्ही साधलेलं मौन हे आम्हा सर्वांसाठी निराशाजनक आहे," असं पत्र आयआयएम अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

या पत्रात ते पुढे लिहितात, "आपल्या देशाच्या बहुसांस्कृतिक स्वरूपाला आमच्या लेखी फार महत्त्व आहे. पण माननीय पंतप्रधान महोदय, या घटनांवरचं तुमचं मौन हे अशा द्वेषपूर्ण आवाजांना अधिक बळ देत आहे आणि त्यातून आपल्या देशाच्या एकता आणि सामाजिक सलोख्यालाच तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे".

"जर द्वेष पसरवणारे आवाज मोठे असतील, तर त्यांना विरोध करणारे आवाज त्याहून मोठे असायला हवेत. मौन हा आता या सगळ्यावर अजिबात पर्याय राहिलेला नाही, हे समजल्यानंतर काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हे पत्र पाठवण्यासाठी पुढाकार घेतला", अशी माहिती आयआयएम बेंगळुरूचे प्राध्यापक प्रतीक राज यांनी दिली.

"आपल्या राज्यघटनेनं कोणत्याही भितीशिवाय आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. पण आता आपल्या देशात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे," असं या पत्रात म्हटलं आहे.

2. गोवा, उत्तर प्रदेशात शिवसेना निवडणूक लढणार-राऊत

गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. गोव्यात काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा आमचा विचार असल्याचेही राऊत म्हणाले. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

वेळेनुसार निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी करून हा निर्णय घेतलेला आहे. निवडणुका घेणं गरजेच आहे. जाहीर सभांवर बंदी घातली आहे, ती बंधनं सर्वांसाठी समान असावीत असेही राऊत यावेळी म्हणाले.

"प्रमोद सावंत यांना जर स्वबळावर सत्ता येईल असा आत्मविश्वास असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांपेक्षा प्रमोद सावंत मोठे नाहीत. कारण पर्रिकर होते तेव्हा 13 जागा आल्या होत्या", असा टोला राऊत यांनी लगावला.

3. मदर तेरेसा यांच्या संस्थेच्या प्रमाणपत्राचं नूतनीकरण

नोबेलविजेत्या संत मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी (एमओसी) या संस्थेची परदेशी देणगी नियमन कायद्यानुसारची (एफसीआरए) नोंदणी केंद्र सरकारने गुरुवारी पुन्हा नियमित केली.

परदेशी देणगी स्वीकारण्याबाबतचे संस्थेचे प्रमाणपत्र आता 2026च्या अखेपर्यंत वैध असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 'एनडीटीव्ही'ने ही बातमी दिली आहे.

प्रतिकूल बाबींचे कारण देत मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या परदेशी देणगी नोंदणीचे नूतनीकरण करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नकार दिला होता.

कोलकातास्थित 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' संस्थेबद्दलच्या माहितीनुसार संस्थेच्या 'एफसीआरए' प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यात आले असून ते आता 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत वैध असेल.

4. चंदीगढमध्ये भाजपचा महापौर; विनोद तावडेंचा प्रभाव

चंदीगढ महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने 35 पैकी 14 जागा जिंकल्या. महापौरपदासाठी 19 नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. तो पाठिंबा मिळवण्यात 'आप'ला यश आलं नाही.

पंजाबचे प्रभारी विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजपचा महापौर होणार आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी महापौर निवडून आणून दाखवण्यात तावडे यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या सरबजीत कौर महापौर होणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे 7 तर अकाली दलाचा एक असे 8 नगरसेवक तटस्थ राहिले.

यामुळे काँग्रेसची कोंडी झाली. भाजपचे 13 नगरसेवक होते. पण इथल्या खासदार या महापालिकेच्या सदस्य असतात असा नियम दाखवत भाजपने सरशी साधली.

काँग्रेस आणि भाजपच्या तुलनेत मतदारांनी आप पक्षाला पाठिंबा दिला. भाजपचे मावळते महापौर रविकांत शर्मा यांचा निवडणुकीत पराभव झाला.

5. राज्यात अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका

राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला. नाशिकमधील देवळा भागाला शनिवारी अवकाळी पावसानं चांगलच झोडपलं, पिकांचं मोठं नुकासान झाल्यानं इथला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्याचबरोबर मेशी परिसरात दिवसाआड दुसऱ्यांना अवकाळी पावसानं हजेरी लावली.

कळवण तालुक्यातही पावसानं हजेरी लावली. चांदवड तालुक्यातील हिरापूर, भोयेगावसह अनेक गावांमध्ये तुरळक पाऊस झाला. यावेळी काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारंबळ उडाली.

उमराणे परिसरात पावसामुळं कांदा रोप आणि रब्बी पीक, काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

मालेगाव शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं पण पाऊस झाला नाही. त्याचबरोबर वणी, डांगसौदाणे, रेडगाव खडजाम, महालपाटणे, देवपूरपाडे, ब्राह्मणगाव, निवाणे, ठेंगोडा, किकवारी बुद्रुक, अभोणा आणि इगरपुरी या भागातही पावसानं तुरळक हजेरी लावली.

नागपुरात गारपीट झाली. विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जोरदार पावसासह उपराजधानीत गारपीट पाहायला मिळाली. उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस तसंच गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी मुंबईतही पाऊस पडला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)