ओमिक्रॉन पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पुणे सज्ज आहे का?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये एका दिवसाला साधारण 20 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत, तर पुणे शहरात हीच संख्या दीड ते दोन हजारांच्या घरात आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने आता आरोग्य व्यवस्था देखील सज्ज होत आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 जानेवारीला पुण्यात तातडीची कोरोना आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी चिंता देखील व्यक्त केली होती.

पुणे शहरातील पॉझिटिव्हीटी रेट 18 टक्क्यांपर्यंत गेल्याचं पवार यांनी सांगितलं होतं. तसंच पुणे जिल्ह्यात 36 टक्के पात्र लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही, अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला होता.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील 3 जानेवारीला तातडीची पत्रकार परिषद घेत शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली होती.

मोहोळ म्हणाले होते, ''पुण्यात नवीन कोरोना रुग्णांमध्ये 70 टक्के लोक हे दोन्ही डोस घेतलेले आहेत. 27 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत एका आठवड्यात शहरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चौपट वाढली आहे. यातील बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.''

जम्बो कोव्हिड रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली

कोरोनाच्या पहिल्या लाटेत वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर भागातील सीओईपी कॉलेजच्या ग्राऊंडवर जम्बो कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या कोव्हिड सेंटरचा मोठा फायदा नागरिकांना झाला होता.

दुसरी लाट ओसरल्यानंतर हे कोव्हिड सेंटर बंद करण्यात आलं होते. कोव्हिड सेंटर जरी बंद ठेवण्यात आलं असलं, तरी तिथली व्यवस्था ही तशीच ठेवण्यात आली होती.

सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं पुन्हा हे कोव्हिड सेंटर कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, ''वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जम्बो कोव्हिड सेंटर लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जम्बो कोव्हिड सेंटर मधले 800 पैकी 600 बेड्स कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

''त्याचबरोबर महापालिकेच्या इतर रुग्णालयांमधील 1800 बेड्स देखील कोव्हिड रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. सध्या लागण होणाऱ्यांपैकी 80 टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत.''

'ओमिक्रॉनच्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली नाही'

ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या देशात वाढत असताना आत्तापर्यंत ऑमिक्रोनच्या 78 रुग्णांची नोंद पुण्यात झाली. या रुग्णांपैकी एकालाही ऑक्सिजनची किंवा व्हेंटिलेटरची गरज पडली नाही, अशी माहिती देखील वावरे यांनी दिली.

वावरे म्हणाले, ''पुण्यात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये एकाही रुग्णाच्या आजाराने गंभीर स्वरुप धारण केले नाही. दाखल असलेल्यांपैकी 60 टक्के रुग्ण हे बरे होऊन घरी देखील गेले आहेत.''

पुण्यातील ग्रामीण भागात देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे सज्ज ठेवण्यात आल्याचे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले. तसेच नवीन बाधितांमधील बहुतांश रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सध्याची पुण्याची काय परिस्थिती आहे ?

पुणे शहरात गुरुवारी 2,284 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर पुण्यात 15 हजार775 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. पिंपरी चिंचवडमध्ये 817 नवीन कोरोनाबाधित आढळून आले तर पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी 7,912 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. पुण्याच्या ग्रामीण भागात 369 रुग्ण आढळले तर 3203 इतक्या चाचण्या करण्यात आल्या.

गुरुवारी (6 जानेवारी) पुण्यात 3 तर पिंपरी चिंचवडमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या पुणे जिल्ह्यात 11 हजार 675 इतक्या अॅक्टिव्ह केसेस आहेत.

संपूर्ण पुणे जिल्ह्यात 85 हजार 64 इतके बेड्स असून त्यातील 43 हजार 332 बेड्स गरज पडल्यास वापरता येता येणार आहेत.

दोन्ही लस घेतलेल्यांना का होतोय कोरोना?

ज्यांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेले आहेत अशा लोकांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे दोन्ही लस घेऊन देखील कोरोना का होतोय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याविषयी बीबीसी मराठीने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कॉलेज ऑफ प्रॅक्टिशनर्सचे राष्ट्रीय अधिष्ठाता डॉ. अविनाश भोंडवे यांना विचारले.

भोंडवे म्हणाले, ''आत्ताची लस ही पहिल्या लाटेच्या विषाणूच्या अनुंषगाने तयार केलेली आहे. त्यामुळे त्या विषाणूसाठी लस ही 80 टक्क्यांपर्यंत परिणामकारक होती. डेल्टासाठी ती 60 टक्के होती तर ओमिक्रॉनसाठीची लसीची परिणामकारकता ही 40 टक्के आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतले असले तरी ओमिक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे.

''पण, लक्षणे सौम्य असू शकतील. त्याचबरोबर लस घेतल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. त्यामुळे लस ही कोरोना होऊ नये म्हणून नाही तर कोरोना झाला तर होणारा त्रास आणि मृत्यू टळावा यासाठी घ्यायची आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)