You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत सासणेंची 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
लातूरमधील उदगीर येथे होणाऱ्या आगामी 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे.
सासणे यांची निवड ही एकमताने म्हणजेच बिनविरोध स्वरुपात झाली.
नुकतेच नाशिक येथे 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. त्यावेळी पुढील साहित्य संमेलन येत्या चार महिन्याच्या आतच घेण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात हे साहित्य संमेलन होऊ शकतं.
भारत ससाणे यांचा परिचय
भारत जगन्नाथ सासणे यांचं नाव सध्याच्या आधुनिक लेखक आणि कथाकारांमध्ये घेतलं जातं.
ते केवळ लेखकच नव्हे तर शासकीय अधिकारीही होते. त्यांनी शासनात विविध पदांवर काम केलं आहे.
भारत सासणे यांचा जन्म 27 मार्च 1951 रोजी जालना येथे झाला आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एससी. ही पदवी घेतली.
भारत ससाणे यांनी अदृष्ट, अनर्थ रात्र, अस्वस्थ, आतंक, आयुष्याची छोटी गोष्ट यांसारखी पुस्तके लिहिली आहे.
भारत सासणेंनी ग्रामीण आणि आदिवासी समाजजीवनातील विविध पैलू, स्वभावधर्म आणि माणसांचं चित्रण आपल्या लेखनातून केलं.
उदगीर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारत सासणे यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.
त्यांची सर्वच पुस्तके प्रकाशित करणाऱ्या मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेने एक फेसबुक पोस्ट लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या पोस्टमध्ये मॅजेस्टिक प्रकाशननं म्हटलंय, "मानवी जगण्यातील व्यामिश्रतेचे पैलू उलगडणाऱ्या, शहरी- ग्रामीण अशा विविध स्तरांचा वेध घेणाऱ्या, मानवी नात्यांची गुंतागुंत आणि मनोव्यापारातील गूढता यांचा परस्पर संबंध दाखवणाऱ्या, कधी फॅण्टसीच्या अंगाने जाणाऱ्या तर कधी रखरखीत वास्तवाचे तुकडे समोर ठेवणाऱ्या दीर्घ कथांमधून भारत सासणे यांनी मराठी कथेचं दालन समृध्द केलं आहे. त्याचबरोबर रंजक बाल कथा आणि आशयसंपन्न कादंबऱ्या, नाटके यांचं लेखनही त्यांनी केलं आहे."
"विविध शासकीय अधिकारपदांवर सक्षमपणे काम केलेल्या भारत सासणे यांची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील अत्युच्च सन्मान म्हणता येईल. मॅजेस्टिकचे लेखक म्हणून या सन्मानाचा आम्हाला अभिमान वाटतो," असंही मॅजेस्टिक प्रकाशनानं म्हटलंय.
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भारत सासणे यांचं अभिनंदन केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)