2022 Bollywood Release: नवीन वर्षात या चित्रपटांची पाहत आहेत सर्वजण वाट

फोटो स्रोत, YRF films
- Author, सुप्रिया सोगळे
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
2022 च्या नवीन वर्षामध्ये मनोरंजन क्षेत्र आणि विशेषतः चित्रपटसृष्टीलाही आशेचा नवा किरण दिसत आहे.
कोरोनाच्या साथीमुळं 2021 मध्ये बहुतांश काळ चित्रपटगृहं बंदच होती. सध्या ओमिक्रॉनच्या संसर्गामुळं तिसऱ्या लाटेचा धोका समोर आहे. मात्र तसं असलं तरी चित्रपटसृष्टीनं हळू हळू वेग घ्यायला सुरुवात केली आहे.
यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. प्रेक्षक वाट पाहत असलेल्या अशाच काही चित्रपटांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करू सुपरस्टार्सच्या चित्रपटांपासून.
चार वर्षांनी पडद्यावर झळकणार आमीर
आमीर खान जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर लाल सिंग चढ्ढा या नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे. हॉलीवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हा भारतीय रिमेक आहे.
आमीर खान या चित्रपटात शीख व्यक्तीच्या भूमिकेत आहे. कोरोनाच्या साथीमुळं चित्रपट रिलीज व्हायला जवळपास एका वर्षाचा उशीर झाला आहे.
अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चढ्ढामध्ये करिना कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 ला प्रदर्शित होईल.
अक्षय कुमारचा चौकार
दरवर्षी चार चित्रपट करणारा अक्षय कुमार 2022 मध्येही चौकार लगावण्यास सज्ज आहे.
त्याच्या चित्रपटांमध्ये ऐतिहासिक पृथ्वीराज चौहान 21 जानेवारी, 2022 ला प्रदर्शित होईल. तर आनंद एल राय यांच्याबरोबर रक्षाबंधन हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

फोटो स्रोत, Hype PR
त्याशिवाय दिवाळीला बहुचर्चित रामसेतू चित्रपट प्रदर्शित होईल. त्यात जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा त्याच्याबरोबर भूमिकेत असतील. तर अक्षयचा चौथा चित्रपट 'ओ माय गॉड 2' असेल. तो 'ओ माय गॉड' चा सिक्वल आहे. त्यात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असेल.
राजामौलींच्या 'आर आर आर' मध्ये अजय देवगण
बाहुबलीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक एस एस राजामौली 'आर आर आर' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. यात ज्युनियर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. संपूर्ण देशभरात हा चित्रपट वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी प्रदर्शित होईल.

फोटो स्रोत, Universal PR
अजय देवगणचा स्पोर्ट्स ड्रामा 'मैदान' 3 जून, 2022 ला प्रदर्शित होईल.
तर इंद्रकुमार दिग्दर्शित 'थँक गॉड' चित्रपट 29 जुलै, 2022 ला प्रदर्शित होत असून, त्यात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुलप्रीत असणार आहेत.
अमिताभही अनेक चित्रपटांत झळकणार
महानायक अमिताभ बच्चन सध्या चित्रपट सृष्टीतील सर्वांत व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. त्यांचे अनेक चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत.
यात बहुचर्चित सायन्स फिक्शन चित्रपट 'ब्रह्मास्त्र' चाही समावेश आहे. त्यात अमिताभ रणबीर कपूर आणि आलिया भट्टबरोबर झळकणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 ला प्रदर्शित होईल.

फोटो स्रोत, Universal PR
सैराट या मराठी चित्रपटाद्वारे चर्चेत आलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळेबरोबर अमिताभ बच्चन 'झुंड' चित्रपटात झळकतील.
'क्वीन' मुळं चर्चेत आलेले दिगदर्शक विकास बहल यांच्या 'गुडबाय' या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता यांच्याबरोबर झळकतील. दोन्ही चित्रपटांच्या पर्दर्शनाची तारीख अद्याप निश्चित नाही.
अजय देवगण बरोबर अमिताभ 'रनवे 34' मध्ये पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. 29 एप्रिलला तो प्रदर्शित होत आहे.
ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट
2020 मध्ये जगाचा निरोप घेतलेल्या ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' देखील 2022 मध्ये प्रदर्शित होईल.
हितेश भाटिया दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासह जुही चावला आणि परेश रावल मुख्य भूमिकेत असतील.
महिलाप्रधान चित्रपट
2022 मध्ये अनेक महिलाप्रधान चित्रपट येत आहेत. त्यात अनेक रंजक कथा आणि उत्तम अभिनयाची पर्वणी पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. त्यात कंगना राणावतचा 'तेजस' या एका धाडसी पायलटवरील आधारित चित्रपटाचा समावेश आहे.
भारतीय हवाई दलाच्या ऐतिहासक घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. लढाऊ तुकडीत महिलांचा समावेश करणारं वायूदल हे देशातील पहिलं संरक्षण दल बनलं होतं. हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2022 ला प्रदर्शित होईल.
तापसी पन्नू दोन महिला प्रधान चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्यापैकी एक भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांच्यावर आधारित 'शाबाश मिठू' आहे. तो 4 फेब्रुवारी 2020 ला प्रदर्शित होईल.

फोटो स्रोत, Universal PR
तसंच, तापसी तिच्या होम प्रोडक्शनचा पहिला चित्रपट 'ब्लर्र' च्या प्रदर्शनाबाबतही लवकरच घोषणा करणार आहे.
संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी' मध्ये आलिया भट्ट मुंबईतील 60 च्या दशकातील वेश्येच्या भूमिकेत झळकेल. हा चित्रपट 18 फेब्रुवारी 2022 ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
तर राणी मुखर्जी, आशिमा छिब्बर यांच्या 'मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे' मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 2011 मधील नॉर्वेतील प्रसिद्ध प्रकरणावर आधारित आहे. त्यात भारतीय दाम्पत्याला त्यांच्या मुलांपासून वेगळं केलं जातं. 20 मे 2022 ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
सिक्वेलची रांग
2022 मध्ये अनेक सिक्वेलही येणार आहेत. त्यात अक्षय कुमारचा 'ओ माय गॉड 2' आणि कार्तिक आर्यनचा 'भुलभुलैय्या 2' हे प्रमुख चित्रपट आहेत. भुलभुलैय्या 2 मध्ये कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत असेल. 25 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

फोटो स्रोत, Universal PR
अनिल शर्मा यांच्या 2000 मधील हिट चित्रपट गदरचा सिक्वेलही प्रदर्शित होईल. यात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा एकत्र दिसतील.
'बधाई दो' हा 2018 मधील 'बधाई हो' चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वल आहे. तो एक कौटुंबीक चित्रपट आहे. भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट 4 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल.
टायगर श्रॉफचा 'हिरोपंती 2' हा रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे. यात टायगर श्रॉफसह नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
पॅन इंडिया चित्रपट आणि अभिनेते
बाहुबलीच्या यशानंतर पॅन इंडिया चित्रपटांबाबत दर्शकांचा ओढा याकडे वाढला आहे. त्यामुळं दक्षिण भारतातील अभिनेत्यांच्या अनेक चित्रपटांना मोठं ओपनिंग मिळत आहे.

फोटो स्रोत, Universal PR
बाहुबलीद्वारे प्रसिद्ध झालेल्या प्रभास याचा पुढील पॅन इंडिया चित्रपट 'राधेश्याम' असेल. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. हा चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होईल.
तर कन्नड सुपरस्टार यशचा पॅन इंडिया चित्रपट केजीएफचा दुसरा भाग 14 एप्रिल 2022 ला प्रदर्शित होणार आहे. त्यात संजय दत्त आणि रवीना टंडनही महत्त्वाच्या भूमिकेत असतील.

फोटो स्रोत, Spice PR
दक्षिण भारतातील कबीर सिंह म्हणून प्रसिद्ध विजय डेवेराकोंडादेखील हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. लायगर चित्रपटात तो अमेरिकेचा बॉक्सर माइक टायसनबरोबर लढताना दिसेल. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होईल.
तर दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीदेखील 'मेरी ख्रिसमस' द्वारे हिंदी चित्रपटांत पदार्पण करतोय. श्रीराम राघवन त्याचं दिग्दर्शन करणार आहे. कतरिना त्यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत असेल. 23 डिसेंबर 2022 ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
संवेदनशील विषय
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'काश्मीर फाइल्स' 26 जानेवारी, 2022 ला प्रदर्शित होईल. त्याची कहाणी काश्मिरी हिंदुंच्या पलायनावर आधारित आहे.
नवी पिढी, नवी कहाणी
83 मध्ये जोरदार अभिनय करणारा रणवीर सिंह यावर्षी गुजराती अवतारात चाहत्यांसमोर येईल. 'जयेशभाई जोरदार' हा त्याचा आगामी चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल.

फोटो स्रोत, YRF films
तसंच रोहित शेट्टीबरोबर आणखी एका चित्रपटात तो काम करत आहे. सर्कसमध्ये तो झळकणार आहे.
रणबीर कपूर यशराजचा अॅक्शनपट 'शमशेरा' मध्ये दिसणार आहे. 18 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

फोटो स्रोत, YRF films
वेगवेगळ्या विषयांची निवड करण्यासाठी ओळखला जाणारा आयुष्यमान खुराणा 'डॉक्टर जी' चित्रपटात दिसणार आहे. हा एक सोशल ड्रामा आहे.
कार्तिक आर्यन, हंसल मेहता यांच्या 'कॅप्टन इंडिया' मध्ये झळकणार आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट 2015 च्या युद्धकाळातील येमेनच्या दौऱ्यातील एअर इंडियाच्या एका पायलटची कथा आहे. भारताची सर्वात मोठी बचाव मोहीम 'ऑपरेशन राहत'चा चेहरा हे पायलट बनले होते.
अमर कौशिक यांच्या 'भेडिया' मध्ये वरुण धवन असणार आहे.
तसंच 2021 मध्ये लोकांवर छाप सोडलेली कियारा आडवाणी, वरुण धवनबरोबर धर्मा फिल्म 'जुग जुग जियो'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि नीतू कपूरही झळकणार आहेत. हा चित्रपट 24 जूनला प्रदर्शित होईल.
कतरिना कैफ सिद्धांत चतुर्वेदीबरोबर 'फोन भूत' या हॉरर कॉमेडीमध्ये झळकणार आहे. 15 जूनला तो प्रदर्शित होणार आहे.

फोटो स्रोत, Hype PR
तर सिद्धांत चतुर्वेदी, दीपिका पादुकोण यांच्याबरोबर शकुन बत्राच्या 'गहराइयाँ' चित्रपटातही दिसेल. हा चित्रपट OTT वर 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
टायगर श्रॉफ अॅक्शन हिरोची प्रतिमा कायम राखत विकास बहलच्या 'गणपत- पार्ट 1' मध्ये भूमिका करताना दिसेल.
त्याचबरोबर सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठान' आणि सलमान खानचा 'एक था टाइगर 3' चं शुटिंगही जवळपास पूर्ण झालं आहे. मात्र त्यांच्या प्रदर्शनाबाबत अद्याप तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत.
यशराज फिल्मनं या चित्रपटांच्या तारखा ठरवलेल्या नाहीत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)


























