OTT : Zee-Sony विलिनीकरणामुळे कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान?

फोटो स्रोत, Getty Images
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेड (SPNI)आणि झी एंटरटेनमेंट इंटरप्राइज लिमिटेड (ZEEL)नं विलिनीकरणाच्या करारावर सह्या केल्या आहेत.
दीर्घ चर्चा आणि आपसांत सल्ला मसलत करून हा निर्णय घेतला असल्याचं दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
विलिनीकरणाचा हा करार 75 पेक्षा अधिक टीव्ही चॅनेल्स, फिल्मसंबंधित संपत्ती तसंच दोन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यांना लागू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार दोन्ही कंपन्यांनी लिनियर नेटवर्क्स, डिजिटल अॅसेट्स, प्रोडक्शन ऑपरेशन आणि प्रोग्राम लायब्ररीज एकत्र करण्याच्या करारावर सह्या केल्या आहेत.
याचवर्षी सप्टेंबर महिन्यात दोन्ही कंपन्यांनी करारासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली होती.
झी आणि सोनी यांच्या विलिनीकरणामुळे देशात वाढत असलेल्या स्ट्रिमिंग एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या कंपनीचं स्थान आता बलाढ्य बनल्याचं दिसून येतं.
यासोबतच वॉल्ट डिस्ने यांच्या हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मला त्यांनी मोठं आव्हान दिलं आहे.
भारतात सध्याच्या घडीला 90 कोटींहून जास्त टीव्ही प्रेक्षक आहेत. तर टीव्ही वाहिन्यांची संख्या 800 हून जास्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या चॅनेल्सवरील क्रीडा, मालिका तसंच रिअॅलिटी शो या प्रकारातचे अनेक शो पाहिले जातात.
विलिनीकरण झाल्याची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली.
सोनी यात 1.575 अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल आणि विलनीकरणानंतर कंपनीची 52.93 टक्के भागादीरी त्यांच्याकडे असेल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
मात्र आता झालेल्या करारानुसार सोनीकडे जवळपास 51 टक्क्यांची आणि झीच्या संस्थापकांकडे जवळपास 4 टक्क्यांची भागीदारी असेल. इतर भागीदारी ही ZEEL च्या शेअर होल्डरची असेल.

फोटो स्रोत, Getty Images
झीचे पुनीत गोयंका यांना विलनीकरणानंतर कंपनीचे मुख्य सीईओ बनवण्यात आलं आहे. नव्या कंपनीच्या संचालक मंडळात कोण असेल, याचा निर्णय सोनी समुहाचा असेल. त्यात SPNI चे सीईओ एनपी सिंह यांचाही समावेश असेल.
या संचालक मंडळामध्ये ते सोनी पिक्चर्स इंडियाचे सीईओ म्हणून सहभागी असतील. नव्या कंपनीकडे सोनी मॅक्स आणि झी टिव्ही बरोबरच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स झी 5 आणि सोनी लिव्ह यांचा हक्क असेल.
पुनित गोएंका यांनी हा करार म्हणजे भारतात एक मैलाचा दगड ठरणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले, "एकत्रीकरण झालेली कंपनी मनोरंजन क्षेत्रात सर्वसमावेशक भूमिका बजावेल. आमच्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार विविध प्लॅटफॉर्मवर कंटेंट उपलब्ध असेल."

फोटो स्रोत, Getty Images
झी आणि सोनी या दोन्ही कंपन्या भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत होत्या. झीचं स्वतःचं ZEE5 तर सोनीचं SonyLIV हे स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म (ओटीटी) आहे.
तसंच त्यांचा मोठा टीव्ही प्रेक्षकवर्ग आहे. सोनी मॅक्स आणि झी टीव्ही हे त्यांचे प्रमुख लोकप्रिय चॅनेल्स म्हणून ओळखले जातात.
हा एक अत्यंत व्यावसायिक असा करार आहे, असं मत मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योग तज्ज्ञ वनिता कोहली-खांडेकर यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
उदाहरणार्थ, झीप्रमाणे सोनीचा संपूर्ण भारतात प्रामुख्याने ग्रामीण भागात पोहोच नाही. तर झीकडे सोनीप्रमाणे लहान मुलांसाठी अथवा क्रीडाविषयक व्यवसाय नाही. त्या म्हणतात, हा व्यवहार झीला एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जाईल, असं त्या म्हणाल्या.
सध्याच्या परिस्थितीत बहुतांश भारतीयांचा कल हा डायरेक्ट-टू-होम टीव्ही एंटरटेनमेंटकडे जास्त आहे.
पण बदलत्या काळानुसार यामध्ये बदल होत स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मची लोकप्रियताही वाढीस लागली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्ममधलं आघाडीचं स्थान मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हीडिओ आणि हॉटस्टार यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू आहे.
आता झी आणि सोनीच्या विलिनीकरणानंतर या कंपनीकडून मोठं आव्हान या क्षेत्रात निर्माण झालं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























