पंजाब निवडणूकः काँग्रेस, अकाली दलाचे नेते भाजपात #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाचमोठ्याबातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. पंजाबमध्ये काँग्रेसचे दोन आमदार भाजपात, दिनेश मोंगियाचाही पक्षप्रवेश

पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं विजयाची गणितं जुळवायला सुरुवात केली आहेत.

भाजपमध्ये विरोधी पक्षातील इनकमिंग सुरू झालं आहे. भाजपनं पंजाबच्या विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. दोन आमदार, एक खासदार आणि एक माजी आमदार यांना भाजपनं पक्षप्रवेश दिला आहे. तसंच माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगियानंदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस आणि अकाली दलातील नेत्यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे फतेहसिंग बाजवा आणि बलविंदरसिंह लाडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर अकाली दलचे गुरतेज सिंग घुडियाना, जगदीप सिंग अशा नेत्यांनीही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबमधील भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगियानंही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2001 ते 2007 दरम्यान त्यानं भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

2. पेपटफुटी प्रकरणामागे महेश बोटले आणि 'न्यासा'चाच हात

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गट ड बरोबरच गट कचेही पेपर फुटले असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आणखी दोन मुख्य दलालांना अटक झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

आरोग्य विभागाचे सहसंचालक महेश बोटले आणि परीक्षेची जबाबदारी असलेल्या न्यासा कंपनी यांनीच हे पेपर फोडले असल्याचं आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं आहे. ई सकाळनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दरम्यान, गट क चा पेपर फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणीदेखील सायबर पोलिसांनी आणखी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेले नवे दोन दलाल हे अमरावती येथील आहेत.

बोटले आणि न्यासा कंपनीनेच पेपर फोडल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गट ड च्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 92 प्रश्न त्यांनी फोडले होते, अशी माहिती समोर आली आहे.

3. मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर गंभीर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या एका अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मळवली ते ताजे या गावांच्या दरम्यान कारला अपघात झाल्याचं महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात प्रकाश घोडके आणि राजमती गाडेकर हे ठार झाले तर शालन घोडके गंभीर जखमी आहेत.

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना ताजे गावच्या हद्दीत टायर फुटल्यामुळं भरधाव वेगात कार महामार्गावर तीन ते चार वेळा पलटली, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे.

कारमधील जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही काळ या महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. अपघातग्रस्त कार बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आला.

4. एटीएसच्या दबावामुळे मालेगाव स्फोट प्रकरणी योगींचे नाव घेतले-साक्षीदार

मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राज्यातील दहशतवाद विरोधी पथककाने (एटीएस) धमकावल्यामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह आरएसएसच्या चार जणांची नावं घेतली होती, अशी साक्ष एका साक्षीदारानं मंगळवारी विशेष न्यायालयात दिली.

या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरू असताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह एटीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

या प्रकरणी सध्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर आरोपींवर खटला सुरू आहे. या प्रकरणी साक्षीदारानं एटीएसनं छळ केल्याचंही कोर्टात म्हटलं आहे. दरम्यान, कोर्टानं साक्षीदाराला फितूर घोषित केलं.

हे प्रकरण एनआयएकडे वर्ग होण्यापूर्वी एटीएस अधिकाऱ्याने या प्रकरणी योगी आदित्यनाथ, इंद्रेश कुमार यांच्यासह संघाच्या चार नेत्यांची नावं घेण्याची धमकी दिली होती, असं या साक्षीदारानं म्हटलं आहे.

5. पुढच्या वर्षी देशात 5G सुरू होण्याची शक्यता, मार्च एप्रिलमध्ये लिलाव

देशातील प्रमुख शहरांमध्ये पुढच्या वर्षीपासून फाईव्ह जी नेटवर्कची सुविधा सुरू होणार आहे. त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश असेल. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दूरसंचार नियामाक ट्राय नं 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी शिफारसी मागवल्या आहेत. मार्च-एप्रिल 2022 मध्ये हे लिलाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्योजक आणि ट्राय यांच्यात चर्चा सुरू आहे.

त्यामुळं देशातील मुंबई, पुणे याशिवाय दिल्ली, बेंगळुरु, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबादसह मेट्रो आणि मोठ्या शहरांत फाईव्ह जी नेटवर्कची सुविधा सुरु होईल.

5G आल्यानंतर शहरं अधिक स्मार्ट होतील. हे तंत्रज्ञान वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, शहरे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं सांगण्यात आलं आहे. 5G तंत्रज्ञानामुंळं चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं शिक्षण दिलं जाऊ शकेल असंही सांगितलं जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)