Covid-19 ची तिसरी लाट भारतात फेब्रुवारी महिन्यात उच्चांक गाठू शकते का?

कोरोना, ओमिक्रॉन, कोव्हिड, लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट भारतात फेब्रुवारी महिन्यात उच्चांक गाठू शकते, अशी भीती इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी कानपूरच्या (IIT Kanpur) गणित आणि सांख्यकी तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणतात, "आता लोक मास्क वापरत नाहीत. सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नाहीय. लसीकरण होत नाहीय. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येऊ शकते."

अमेरिका आणि युरोपमध्ये 'ओमिक्रॉन' व्हेरियंटमुळे कोरोनासंसर्गाची त्सुनामी आलीय. ओमिक्रॉन डेल्टापेक्षा तीन पटींनी जास्त झपाट्याने पसरतो. त्यामुळे भारतात ओमिक्रॉन कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गणिती मॉडेल खरं होतंच असं नाही. पण याच्या अभ्यासातून तिसऱ्या लाटेचा उच्चांक कधी येईल याचा अंदाज बांधून आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यास मदत होते.

भारतातील कोरोनासंसर्गाची सद्यस्थिती काय?

भारतात डेल्टा व्हेरियंट आणि त्याच्या उपप्रकारांनी बाधित लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येतेय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात सद्य स्थितीत कोव्हिड-19 ने संक्रमित 78 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • बुधवारी (22 डिसेंबरला) देशभरात 7 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.
  • आधीच्या दिसवाच्या तुलनेत या संख्येत 18 टक्क्यांनी वाढ झालीये.
  • सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आढळले
  • महाराष्ट्रात तब्बल 48 दिवसांनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1201 नोंदवण्यात आलीये. तर, मुंबईत 490 नवीन रुग्णांची नोंद
  • दिल्लीत 125 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
कोरोना, ओमिक्रॉन, कोव्हिड, लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

देशात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली होती. पण गेल्याकाही दिवसात कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलंय.

फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या लाटेचा उच्चांक?

केंद्र सरकारनेही भारतात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट नक्की येईल. आणि त्यासाठी आपण तयार राहायला हवं असा इशारा दिला होता.

कोरोना संसर्गाची सद्यस्थिती पाहता, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी कानपूरच्या (IIT Kanpur) गणित आणि सांख्यकी तज्ज्ञांनी भारतात तिसरी लाट कधी येईल आणि उच्चांक कधी गाठू शकेल याबाबत आपला अहवाल प्रसिद्ध केलाय.

  • देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट डिसेंबरच्या (2021) मध्यापासून सुरू होईल
  • फेब्रुवारी 2022 च्या सुरूवातीला कोरोना संसर्गाची तिसरी लाट उच्चांक किंवा पीक गाठेल
  • पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेबाबत अंदाज बांधण्यात आला आहे
  • तिसऱ्या लाटेबाबत संशोधन करण्यासाठी अमेरिका, यूके, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण अफ्रिका, इस्राइल यांसारख्या 10 देशांचा अभ्यास करण्यात आला
  • झांबिया आणि झिबाब्वेमध्ये कोरोनासंसर्गाचा ट्रेन्ड भारतासारखाच आढळून आला

हे संशोधन IIT Kanpur च्या गणित आणि सांख्यकी विभागाचे असोसिएट प्रोफेसर शुभ्र शंकर दास यांनी प्रसिद्ध केलंय.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दिवसाला साडेतीन लाखांपर्यंत कोव्हिडबाधित रुग्णांची नोंद होत होती. तर मुंबईत कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या पीकवर असताना 11 हजार रुग्णांची दिवसाला नोंद करण्यात आली होती.

कोरोना, ओमिक्रॉन, कोव्हिड, लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेबाबत इंडियन IIT हैद्राबादचे प्रो. विद्यासागर आणि IIT कानपूरचे मणिंदर अग्रवाल यांनी संशोधन केलंय. सूत्र मॉडेलवरून भारतात येणाऱ्या काळात कोरोनाचा प्रसार कसा होईल याबाबत त्यांनी अंदाज बांधलाय.

इंडिया-टूडेशी बोलताना प्रो. विद्यासागर म्हणतात, "आमच्या अंदाजानुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारतात कोरोना संसर्गाचा पीक येईल. आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तर, देशात दिवसाला 1.5 ते 1.8 लाख रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे."

संशोधकांच्या सांगण्यानुसार, ओमिक्रॉन कोरोनाविरोधी लशीला दाद देत नसेल तर ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

ओमिक्रॉनमुळे महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढेल?

कोरोनासंसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत अतिरिक्त मुख्य आरोग्यसचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्य कॅबिनेटला डिसेंबरमध्ये माहिती दिली होती.

महाराष्ट्रात जानेवारीपर्यंत मोठ्या संख्येने लोकांना ओमिक्रोन व्हेरियंटचा संसर्ग होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते, "राज्यात जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे."

ओमिक्रॉन, डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीन पटींनी जास्त पसरणारा आहे. याबाबत बोलताना राज्याचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, "महाराष्ट्रात आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 65 रुग्ण आढळून आलेत. यापैकी 35 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय."

कोरोना, ओमिक्रॉन, कोव्हिड, लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन अत्यंत तीव्रतेने आणि अभूतपूर्व वेगाने पसरणारा असल्याचा इशारा दिला होता.

ओमिक्रॉनबाबत माहिती देताना महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणतात, "ओमिक्रॉनचा रॅपिड जनरेशन टाइम 5 आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी दीड ते तीन दिवसांचा आहे."

तिसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?

भारतात झपाट्याने पसरलेल्या डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव अजूनही कायम आहे. पण, डेल्टामुळे पसरलेली दुसरी लाट आता नियंत्रणात आलीये.

पण, जगभरातील 109 देशांमध्ये पसरलेल्या ओमिक्रोन व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. अमेरिकेत 70 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनारुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटचे आहेत. तर, हीच परिस्थिती यूके आणि युरोपातील काही देशांमध्ये दिसून येत आहे.

ओमिक्रॉन फेब्रुवारीत भारतात येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरू शकतो?

महाराष्ट्र टास्सफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक बीबीसीशी बोलताना म्हणाले, "भारतात फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनची तिसऱ्या लाट येऊ शकते. लसीकरण आणि मास्कचा योग्य वापर यानेच आपण ही लाट थोपवू शकतो."

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन पाश्चिमात्य देशात आणि युरोपात धुमाकूळ घालत असला. तरी, भारतात आतापर्यंत 216 रुग्ण ओमिक्रॉन संक्रमित आढळून आलेत. या रुग्णांमध्ये परदेशातून आलेले आणि त्यांच्या संपर्कातील लोक जास्त आहेत.

ते पुढे सांगतात, "लोकांनी मास्क घालणं सोडून दिलंय. सोशल डिस्टंसिंगचं योग्य पालन होत नाहीये. लसीकरण होत नाहीये. त्यामुळे आपण सर्व सीमांवर मागे पडतोय. सर्वात महत्त्वाचं आपण अत्यंत महत्त्वाचा वेळ गमावतो आहे."

ओमिक्रॉनशी मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञांनी आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक कर्मचारी आणि वयोवृद्धांना लशीचा बूस्टर डोस देण्याची मागणी केलीये. केंद्र सरकारने अजूनही बूस्टर डोसबाबत विचार केलेला नाही. पुढील आठवड्यात यावर लसीकरणासंबंधी तज्ज्ञांची बैठक होणार आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनने भारतात दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय, असं डॉ. अविनाश भोंडवे यांचं मत आहे.

कोरोना, ओमिक्रॉन, कोव्हिड, लसीकरण

फोटो स्रोत, PA Media

ते सांगतात, "आतापर्यंत परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग आढळून येत होता. मात्र तेलंगणात ओमिक्रॉनचा स्थानिक संसर्ग झालेला रुग्ण आढळून आलाय."

येत्या काळात देशातील विविध ठिकाणी असं आढळून येण्याची शक्यता असल्याचं ते म्हणतात.

ओमिक्रॉनचा संसर्ग तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. लीना म्हणतात, "कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरा लाट थोडी कमी तीव्रतेची असायला हवी."

दुसऱ्या लाटेतील परिस्थितीनंतर भारतात बेड्सची संख्या, रुग्णालयं यांच्यावर जास्त भर देण्यात आलाय. कोरोनाविरोधी लस, औषध असल्याने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण चांगल्या परिस्थितीत आहोत असं तज्ज्ञांचं मत आहे.

डॉ. जयेश लेले म्हणाले, "तिसरी लाट येईल का नाही याबाबत काहीच सांगता येणार नाही. मात्र, इम्युनिटीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या आणि ऑक्सिजनची गरज नक्की कमी असेल."

सांख्यिकी मॉडेल खरे होतात?

प्रत्येक सांख्यकी मॉडेल खरे होतातच, असं नाही.

देशात कोरोना संसर्ग मार्च 2020 मध्ये पसरल्यापासून अनेक गणिती आणि सांख्यिकी संशोधकांनी कोरोनाची परिस्थिती कशी असेल असा अंदाज बांधला होता. पहिल्या लाटेतील रुग्णसंख्येवरून दुसऱ्या आणि दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येवरून तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यात आलाय.

पण हे अंदाज प्रत्येकवेळी खरे ठरत नाहीत. तज्ज्ञ सांगतात, "आरोग्य यंत्रणांना योग्य तयारीसाठी वेळ मिळवा या दृष्टीने हे गणिती किंवा सांख्यिकी अंदाज बांधण्यात येतात."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)