You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील या सरकारनं राष्ट्रपती राजवटीसाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत-#5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. या सरकारनं राष्ट्रपती राजवटीसाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत- चंद्रकांत पाटील
'महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत', असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
कोल्हापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
'राज्यपालांनी याबाबत दे होतंय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे. हे सरकार मात्र राज्यपालांचे अधिकार कमी करत सुटले आहे,' असा आरोप पाटील यांनी केलाय.
राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे तसंच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे प्र-कुलपती असणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी अधिवेशानात याबाबत सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत वक्तव्य केलं आहे.
टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
2. सदावर्तेंनी वकिलाचं काम करावं, अन्यथा...- एसटी कामगार संघटनेचे नेते अजय गुजर यांचा इशारा
एसटी कामगारांचे नेते अजय गुजर यांनी त्यांच्या नेतृत्वातील संघटनेचा संप मागे घेतला आहे.
संप मागे घेतल्याची घोषणा करताना त्यांनी एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश झाले असून त्यांना कोणीतरी भडकावत असल्याचा आरोप केला. त्यांचा रोख हा अडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे होता.
गुणरत्न सदावर्ते यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही एसटी कर्मचारी संघटनेतर्फे दुसरे वकील लावू, असंही त्यांनी म्हटलं.
सदावर्तेंनी एसटी कर्मचारी संप करत नसून दुखवटा पाळत आहेत असं म्हटलं होतं. त्याबद्दल बोलताना अजय गुजर यांनी म्हटलं की, सदावर्ते हे वकील आहे. वकिलांनी वकिलांचं काम करावं. सदावर्ते म्हणतात तसं हा दुखवटा असला तरी तो दुखवटा शांततेत करायचा असतो, नाचून भजनकीर्तन करून दुखवटा करू नये. हा दुखवटा शांततेत करायला हवा."
सदावर्ते आणि गुजर यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर संपाबाबत आंदोलकांमध्ये फूट पडली आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
3. 'करण जोहरच्या त्या पार्टीत कोण मंत्री होता हे सिद्ध करा, नाहीतर...'
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेली पार्टी चांगलीच चर्चेत आली.
या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील मंत्री उपस्थित होते, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. आशिष शेलार यांच्या या आरोपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आव्हान दिले आहे.
"खोटे आरोप करू नका, त्या पार्टीत जे मंत्री सहभागी झाले होते. ते सिद्ध करा, नाहीतर जनतेची माफी मागा" असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना दिले आहे.
"आशिष शेलार आणि भाजपचे नेते खोटे बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. खोटं बोल पण रेटून बोल, अशी वृत्ती वाढत आहे," अशी टीका पेडणेकर यांनी यावेळी केली.
एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
4. शिवाजी महाराज हे ओबीसी होते- महादेव जानकर
छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते असं वक्तव्य माजी मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलंय.
शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांना आरक्षण होतं. मात्र मोठे पण मिरवण्याच्या नादात तथाकथित मोठ्यांनी आरक्षण नाकारलं आणि आजची अवस्था निर्माण झाल्याचं जानकरांनी सांगितलं.
ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.
गंगाखेड येथे 31 नोव्हेंबरपासून ओबीसी एल्गार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला जानकर यांनी भेट दिली. त्यावेळी जानकर यांनी आंदोलकांना संबोधित केलं.
झी24 तासनं ही बातमी दिलीये.
5. उन्नाव बलात्कार प्रकरणतील 'त्या' आरोपातून भाजपचा माजी आमदार निर्दोष मुक्त
उन्नाव येथील बलात्कार पीडितेला झालेल्या अपघात प्रकरणी दिल्लीतील राउज अॅव्हेन्यू कोर्टाने भाजपचे माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणात सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असून ते सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे.
बलात्कार पीडिता, तिचे वकील आणि पीडितेच्या दोन मावशी असे चौघे जण रायबरेली येथे जात असताना त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता.
या अपघातात दोन्ही मावशी जागीच ठार झाल्या होत्या तर पीडित अल्पवयीन मुलगी आणि वकील गंभीररित्या जखमी झाले होते. 2019 मध्ये झालेल्या या अपघातामागे कुलदीप सेंगर यांचा हात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता.
त्यानंतर सेंगर याच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयकडे याप्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)