शेती : सीमा जाधव यांनी 18 प्रकारच्या देशी-विदेशी भाजीपाल्याचे वाण घेऊन असा कमावला नफा

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

पतीच्या पगारात उदरनिर्वाह होत नाही म्हटल्यावर त्यांनी स्वत: शेती करायचं ठरवलं. पारंपरिक पीकांऐवजी त्या चक्क ब्रोकोलीचं उत्पादन घेत आहेत.

दूरदर्शनवर परदेशी भाजीपाल्याविषयीचा कार्यक्रम पाहिला आणि मग अशी शेती करण्याची इच्छा घरच्यांसमोर बोलून दाखवली.

सीमा सांगतात, "2002 पासून आधुनिक पद्धतीनं शेती करायला सुरुवात केली. यात काही परदेशी तर काही देशी भाजीपाल्याची निवड केली.

"घरचे सुरुवातीला पारंपरिक पीक जास्त प्रमाणात घेत होते, त्यांचं म्हणणं होतं की हिला शेती करायला येईल की नाही. काय घेईल पिकं, पुढे सगळा प्रॉब्लेम होईल. पण मी त्यांना विश्वास निर्माण करून दिला. बाहेर नोकरी करण्यापेक्षा मी शेतात मालक म्हणून काम करेल, मग त्यांनी होकार दिला."

पहिली 2 वर्षं भाजीपाल्यातून फार काही उत्पन्न मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर सीमा यांनी वेगळा विचार केला.

याविषयी त्या सांगतात, "2002 मध्ये वांगी, टमाटर ही देशी पिकं घेत होते. ती भोसरी मार्केटमध्ये विकायला घेऊन जायचे. आपण इतके कष्टानं करायचो, पण त्यांना बाजारभाव जास्त मिळत नव्हता. दलालाचे कमिशन, हमाली, तोडणी, खुरपणी याचा खूप जास्त खर्च होत होता. त्यानंतर मी आपल्या शेतात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. त्यानंतर 2004 पासून मी परदेशी भाजीपाला जास्त आधुनिक पद्धतीनं घ्यायला सुरुवात केली."

सध्या सीमा यांच्याकडे 1 एकर क्षेत्रावर देश-विदेशी भाजीपाल्याचे 18 प्रकारची वाणं आहेत. ब्रोकोली त्यापैकी एक. त्यांच्या ब्रोकोलीला 300 रुपये किलो इतका दर मिळत आहे. शेतीत सातत्यानं कमाई करण्यासाठी नियोजन महत्त्वाचं असल्याचं त्या सांगतात.

"आमच्याकडे भाजीपाल्याची बाराही महिने लागवड होते. परेदशी भाजीपाला कमी कालावधीत जास्त पैसे देणारं पीक आहे. ते लागवडीपासून अडीच महिन्यापासून चालू होतं आणि साडेतीन महिन्यांमध्ये संपतं. जर समजा ब्रोकोली संपली, तर ती संपायच्या अगोदर आम्ही दुसरी रोपं तयार ठेवतो. आणि त्या क्षेत्रावर दुसऱ्या पिकाची लागवड करून टाकतो."

शेतमाल नुसता पिकवून चालत नाही, तो विकताही आला पाहिजे, त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे, असं सीमा आग्रहानं सांगतात.

"सुरुवातीला आठवडे बाजारांमध्ये विक्री केली. त्यानंतर मी काही सोसायट्या बघितल्या. तिथं जे चेअरमन असतात, सेक्रेटरी असतात, मॅनेजर यांची भेट घेतली. त्यांना आपला भाजीपाला कसा चांगला आहे याची माहिती दिली. त्यांना पाव किलो, अर्धाकिलो असे पॅकेट्स दिले. तुमच्या घरी वापरून बघा आणि रिप्लाय द्या असं सांगितलं. आम्ही आमचा भाजीपाला तुमच्या सोसायटीत रिझनेबल रेटनं देऊ, असं त्यांना सांगितलं."

यामुळेच मग लॉकडाऊनच्या काळातही सीमा यांनी चांगली कमाई केली. सध्या पुण्यातील 4 सोसायट्यांमध्ये त्यांचा भाजीपाला जात आहे. पण, भाजीपाला कमी कालावधीत खराब होण्याची भीती असते. त्यासाठी मग सीमा यांनी एक आयडिया वापरली.

"पॅकिंगमध्ये पूर्वी गोणीचा वापर करायचे, तसा आपण कोरोग्रेटल बॉक्सचा वापर करतो. पाऊस, उन, वारा यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी एक शेडनेट हाऊस मी उभारलं आहे. पॉलिथिन बॅगामध्ये माल डायरेक्ट भरला तर तो आतून सडून किंवा कुजून जातो. त्यामुळे आम्ही प्रत्येक बॅगला 5 ते 6 होल पंचिंग करतो. त्यामुळे आतमध्ये माल खराब होत नाही, तो स्वच्छ, चांगला आणि ताजा राहतो."

महिलेनं केलेली शेती ही फायद्याचीच असते, पण त्यासाठी तिनं उपलब्ध शेतीचं योग्य नियोजन करावं, असं सीमा यांचं मत आहे.

सीमा जाधव यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता शेती बघायला त्यांच्याकडे दूरवरून लोक येतात आणि त्याही त्यांना खुल्या मनानं मार्गदर्शन करतात.

त्या सांगतात, "आपली शेती कोणत्या प्रकारची आहे ते आपण लक्षात घेतलं आहे. त्याचपद्धतीनं पिकं घेतली पाहिजे. शेजारच्यानं एक पीक लावलं म्हणून आपण तेच पीक लावतो. त्यानं अर्ध्या एकरात लावलं तर आपण एक एकरात लावतो आणि इथंच फसतो. तसं न करता 5 गुंठा, 10 गुंठा अशा क्षेत्रात वेगवेगळी पीकं लावली पाहिजे."

( या बातमीसाठी नितीन नगरकर यांनी माहिती पाठवली आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)