ऑनर किलींग: कुटुंबाचा विरोध पत्करत प्रेमविवाह केल्यानं बहिणीचं शीर केलं धडावेगळं #5मोठ्याबातम्या

ऑनर किलिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. ऑनर किलींग : कुटुंबाचा विरोध पत्करत प्रेमविवाह केल्यानं बहिणीचं शीर केलं धडावेगळं

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातून ऑनर किलींगचा भयावह प्रकार समोर आला आहे. कुटुंबाच्या विरोधात जात प्रियककराबरोबर विवाह करणाऱ्या तरुणीची सख्ख्या भावानं निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. 'न्यूज 18 लोकमत'नं हे वृत्त दिलं आहे.

वैजापूरमधील गोळेगावची ही घटना आहे. याठिकाणी किशोरी मोटे नावाच्या तरुणीनं सहा महिन्यांपूर्वी पळून जात प्रेमविवाह केला होता. त्या रागातून भावानं कोत्यानं वार करत तिचं शीर धडावेगळं करत तिची हत्या केली.

किशोरीच्या प्रेमविवाहाला कुटुंबाची मान्यता नव्हती. त्यामुळं रागातून भावानं हे कृत्य केलं. बहिणीला भेटण्यासाठी म्हणून गेलेल्या भावानं कोत्यानं तिच्यावर वार करत तिची हत्या केली आहे.

विशेष म्हणजे या तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी असलेल्या तिच्या भावानं वैजापूर पोलिस ठाण्यात जात आत्मसमर्पण केलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपासही करत आहेत.

2. छगन भुजबळांचा फडणवीसांना चिमटा, 'पुन्हा येईन म्हटलं की गडबड होते'

नाशिकमधील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोल लगावला आहे.

पुढचं साहित्य संमेलनही नाशिकला व्हावं अशी इच्छा आहे. सर्व साहित्यिकांनी नाशिकला येत राहावं. मी पुन्हा येईन म्हटलं की गडबड होते, त्यामुळं आपण परत या, असं म्हणत भुजबळांनी फडणवीसांना टोला लगावला, 'महाराष्ट्र टाईम्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस, साहित्य संमेलन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छगन भुजबळ

साहित्य संमेलनामुळं नाशिकमध्ये गेले काही दिवस चांगलीच लगबग होती. इतर राज्यांबरोबरच सिंगापूर दुबईतूनही कवी याठिकाणी कार्यक्रमांत सहभागी झाले.

काही आमदार वगळता सर्वांचेच हातभार साहित्य संमेलनाला लागले. सगळ्यांनी आमदार फंडातून 10-10 लाख रुपये दिले. हा कार्यक्रम संपल्यावर आता चुकल्यासारखं वाटेल असंही भुजबळ म्हणाले.

दरम्यान, 95 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे लातूरच्या उदगीरमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

3. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा किती गैरवापर करणार, चंद्रकांत पाटील यांचा सवाल

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेकीच्या प्रकाराबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा किती अतिरेक करणार? असा सवाल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लोकांच्या टोकाच्या श्रद्धा आहेत. त्यांना दुखावण्याचा अधिकार कुणालाही नाही असंही पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील, साहित्य संमेलन

फोटो स्रोत, CHANDRAKANTPATIL

फोटो कॅप्शन, चंद्रकांत पाटील

लोकशाहीमध्ये मनातला राग व्यक्त करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तरीही शाई फेकून निषेध व्यक्त करणं हे न समजण्यासारखं असल्याचंही पाटील म्हणाले.

त्याचवेळी ही पद्धत चुकीची असली तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक करायला नको असंही ते म्हणाले. तर प्रवीण दरेकर यांनीही ती उत्सफूर्त प्रतिक्रिया असल्याचं या प्रकरणी म्हटलं आहे.

'टीव्ही 9' नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

4. जॅकलिन फर्नांडिसविरोधात लूकआऊट नोटिस, ईडीने विमानतळावरच रोखले

200 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी ईडीनं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरोधात लूकआऊट नोटिस जारी केली. त्यामुळं तिला मस्कतला जाताना मुंबई विमानतळावरच अडवण्यात आलं आहे.

सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांच्या खंडणीचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यानं बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा उल्लेख त्याच्या विरोधातील आरोपपत्रात आहे.

जॅकलिन फर्नांडिझ

फोटो स्रोत, STR

फोटो कॅप्शन, जॅकलिन फर्नांडिझ

त्यामुळं जॅकलिनाला अडवण्यात आलं असून. तिच्याविरोधात जारी केलेल्या लूक आऊट नोटीसमुळे ती भारताबाहेर कोठेही जाऊ शकणार नाही.

तसंच या आरोपपत्रामध्ये आणखी एक अभिनेत्री नोरा फतेही हिचाही समावेश आहेत. या दोन्ही अभिनेत्रींना सुकेश याने महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्यामुळं या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली आहे.

'लोकसत्ता'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

5. इस्लाम धर्माचा त्याग करत हिंदू धर्म अवलंबणार वसीम रिझवी

शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार आहेत. सोमवारी महंत यति नरसिंम्हानंद गिरी महाराज हे त्यांना सनातन धर्माची दीक्षा देतील.

वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचं मृत्यूपत्रही प्रसिद्ध केलं होतं. त्यात त्यांनी मृत्यूनंतर दफनविधी न करता हिंदु धर्माप्रमाणे दहनविधी करुन अंत्यसंस्कार करण्याची इच्छा जाहीर केली होती.

वसीम रिझवी यांनी कुरआणातील काही आयात हटवण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळं कट्टरतावादी मुस्लीम हे त्यांच्या विरोधात आहेत.

रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समुदायाशी संबंध नाही. ते मुस्लीम विरोधी संघटनांचे एजंट असल्याचा दावा या संघटना करतात.

'आजतक'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)