नरेंद्र मोदी पुलवामा हल्ल्याचा फायदा घेऊन निवडणूक जिंकले - नवाब मलिक, #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पुलवामा हल्ल्याचा फायदा घेऊन मोदी निवडणूक जिंकले - नवाब मलिक

"पुलवामाची घटना झाल्यानंतर तो आरडीए्क्स कुठून आला, आजपर्यंत सरकारन याचं उत्तर दिलेलं नाही. पुलवामानंतर जी परिस्थिती या देशात निर्माण झाली, त्याचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आलं आहे," असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

"7 वर्षं देशात सत्ता असताना दहशतवाद संपवता येत नाही. चीनसारखे देश आपल्या देशात नवीन गाव वसवत आहे. 2019मध्ये मोदींच्या कामगिरीवर नाही, तर पुलवामा घटनेचा राजकीय फायदा भाजपनं घेतला होता. त्याच्या आधारावर त्यांच्या खूप जागा निवडून आल्या,"असंही मलिक म्हणाले.

"आज मात्र खूप मोठ्या प्रमाणावर लोक भाजपवर नाराज आहेत. 2024मध्ये देशात मोदी सरकार राहणार नाही, हे स्पष्ट आहे,"असं ते पुढे म्हणाले.

2. 'किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 6 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्याला भेट देत आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचं हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवलं जाणार आहे. पण, शिवप्रेमींनी हेलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवण्याला विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही, मात्र किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरू देणार नाही, असा पवित्रा शिवप्रेमींनी घेतला आहे.

पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होतं. या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती आणि केर-कचरा उडत असे. ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने 1996 साली येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता. जवळपास 25 वर्षांनंतर आता शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे, असं शिवप्रेमींचं म्हणणं आहे.

3. मतांसाठी शिवसेनेची हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ - देवेंद्र फडणवीस

मतांच्या लाचारीसाठी शिवसेनेला हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ द्यावी लागत असून खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात भाजपविरोधात काँग्रेसला वगळूनच आघाडी करायची आहे. पण महाराष्ट्रात सरकारमध्ये काँग्रेस असल्याने त्यांची अडचण झाल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा हा उद्योगपतींशी चर्चा करण्यापेक्षा भाजपविरोधी पक्षांची आघाडी उभारण्याच्या राजकीय कारणांसाठीच होता. उद्योगांचे केवळ कारण होते, असंही फडणवीस म्हणाले,

4. विरोधकांमध्ये फूट पाडणे अयोग्य - खरगे

"विरोधकांमध्ये फूट पडणे योग्य नाही. भाजपविरोधात लढायचे असेल तर एकत्र आले पाहिजे. महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय मुद्दय़ांवर काँग्रेसने नेहमीच तृणमूल काँग्रेसला सहभागी करून घेतलं आहे", अशा शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात बुधवारी काँग्रेसच्या 'नाकर्तेपणा'वर टीका केली होती.

एखादा पक्ष लढायला तयार नसेल तर काय करणार, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) महत्त्व संपुष्टात आल्याचं विधानही केलं होतं.

5. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं परिपत्रक जारी

राज्य सरकारने एक परिपत्रक जारी करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे देण्यात आले असून मूळ वेतनाच्या तीन टक्के वार्षिक वेतनवाढ देण्याचाही निर्णय घेतला आहे. तसंच दर महिन्याच्या 10 तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवली असून आतापर्यंत 9 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)