You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Omicron: भारतात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण सापडले - केंद्र सरकार
भारतामध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 66 आणि दुसरा रुग्ण 46 वर्षे वयाचा आहे.
देशात सध्या कोरोना लशीच्या दुसऱा डोस देण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. युरोपमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून एकूण रुग्णसंख्येच्या 70 ट्कके रुग्णसंख्या युरोपात असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. आतापर्यंत 29 देशांमध्ये 373 ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिसल्याचेही त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्यसंघटनेनं या व्हेरियंटला - व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हटल्याने आता जगभरातले देश या विषाणूसाठीचा जीनोम सिक्वेन्स एकमेकांसोबत शेअर करतील, जगभरात कुठेही या सुरुवातीच्या काळात आढळणारे ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वा क्लस्टर्स - म्हणजे एकाच वेळी, एका भागात अनेक रुग्ण सापडले तर त्याची माहिती WHO ला देण्यात येईल. आणि या भागात तपासण्या आणि संशोधन करण्यात येईल.
कोरोनाच्या या नव्या विषाणूला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे. व्हायरसच्या इतर व्हेरियंटना देण्यात आलेल्या अल्फा आणि डेल्टा अशा ग्रीक नावांप्रमाणे या व्हेरियंटला Omicron - ओमिक्रॉन नाव देण्यात आलंय.
या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल - म्युटेशन्स झाल्याचं आढळलं आहे. विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. त्यामुळं इतर व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा यांनी म्हटलं.
"या नव्या प्रकारच्या विषाणूनं आम्हाला आश्चर्यचकित केलं. बदलांचा विचार करता यानं मोठी उडी घेतली आहे. आम्हाला अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक म्युटेशन झालं आहे," असं ते म्हणाले.
याबाबत माध्यमांना माहिती देताना ऑलिव्हिरा यांनी म्हटलंय, या नव्या विषाणूत एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळलेत. बहुतांश लसींद्वारे या स्पाईक प्रोटिनला लक्ष्य करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो.
यात अधिक खोलवर अभ्यास करून रिसेप्ट बाईंडिंग डोमेनचा (आपल्या शरिरातील पेशींच्या या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो) अभ्यास केला असता यात 10 म्युटेशन आढळले. संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ 2 म्युटेशन झालेले होते.
कोरोनाच्या विषाणूवर मात करण्यात अपयशी ठरलेल्या एकाच रुग्णाच्या शरिरात एवढे म्युटेशन झालेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक म्युटेशन हे वाईटच असतात असंही नाही. पण त्याचे परिणाम नेमके काय होतात, हे महत्त्वाचं असतं.
पण आता समोर आलेली चिंतेची बाब म्हणजे हा नवा विषाणू वुहान आणि चीनमध्ये आढळलेल्या मूळ विषाणूच्या तुलनेत प्रचंड वेगळा आहे. म्हणजे, या विषाणूच्या स्ट्रेनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या लशी फारशा प्रभावी ठरू शकणार नाहीत.
काही म्युटेशन हे आधीच्या इतर काही प्रकारच्या विषाणूंमध्ये आढळलेले आहेत. त्यावरून या विषाणूतील त्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत माहिती मिळते.
उदाहरण सांगायचं झाल्यास, N501Y यामुळं कोरोना विषाणूचा प्रसार हा आणखी सहजपणे होताना दिसतो. यापैकी काही विषाणूमुळं शरिरातील अँटिबॉडीला नेमका विषाणू ओळखणं कठिण ठरत असल्यानं त्यांचा प्रभाव कमी होतो. पण इतर काही पूर्णपणे नवीनही आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)