पुणे मेट्रोचं काम गणेशोत्सवानंतरही का रखडलं?

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
पुण्यातील लकडी पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू झाल्यानंतर पुलापासून गर्डरची उंची कमी आहे, असा आरोप पुण्यातील गणेशमंडळांनी घेतला.
या कमी उंचीमुळे विसर्जन मिरवणुकीतील रथ लकडी पुलावरुन पुढे जाणार नाहीत, त्यामुळे शेकडो वर्षांची पुण्याची विसर्जन मिरवणुकीची परंपरा खंडीत होईल, असं देखील गणेश मंडळांचं म्हणणं होतं.
गणेशोत्सवाच्या काळात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने सप्टेंबर महिन्यात गर्डर टाकण्याचं काम थांबवण्यात आले होतं. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी देखील जोपर्यंत यातून तोडगा निघत नाही तोपर्यंत हे काम थांबवण्याची विनंती मेट्रोला केली होती. त्यामुळे हे काम थांबवण्यात आलं.
काम थांबवून दोन महिने उलटून गेले असले तरी अद्याप गर्डर टाकण्याचं काम सुरू करण्यात आलेलं नाही. त्याचबरोबर भलं मोठं गर्डर हे अजूनही लकडी पुलाच्या कडेलाच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूकीला देखील मोठा अडथळा यामुळे होत आहे.
नेमका वाद काय?
पुण्यात सध्या दोन मेट्रोमार्गांचं काम प्रगतीपथावर आहे. पहिला मार्ग पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा आहे, तर दुसरा मार्ग वनाझ ते रामवाडी असा आहे.
पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी ते फुगेवाडी हा टप्पा वर्षअखेर सुरू करण्याचा मेट्रोचा विचार आहे. त्याचप्रमाणे वनाझ ते रामवाडी या मार्गावरील वनाझ ते गरवारे हा टप्पा डिसेंबर अखेर सुरू करण्याचं मेट्रोचं नियोजन होतं.
वनाझ ते रामवाडी या मार्गात लकडीपुलावर गर्डर टाकण्याची गरज आहे. त्यासाठीची तयारी देखील मेट्रोकडून करण्यात आली होती. गर्डर टाकण्यात येणार असल्याने लकडीपुलावरील वाहतूक रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आलं होतं. पण, हा गर्डर टाकण्याआधीच गणेश मंडळांनी त्याला आक्षेप घेतला.
बीबीसी मराठीने गणेश मंडळांचे प्रतिनिधी अॅड. निखिल मालानी यांच्याशी चर्चा केली.

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc
मालानी म्हणाले, ''सध्या लकडी पुलावरील गर्डरच्या उंचीमुळे गणेश विसर्जन मिरवणूक आणि पुढील विकासकामांना अडथळा निर्माण होणार आहे. आज या उंचीमध्ये बदल करणे शक्य आहे तेव्हाच हा बदल करणं अपेक्षित आहे. मेट्रो म्हणते आम्ही नियमानुसारच उंची ठेवली आहे, पण आमचा त्यांना प्रश्न आहे की हे नियम पाळताना एखाद्या शहराच्या परंपरा, सांस्कृतिक वारसा, त्या शहराची गरज याचा विचार केला जातो की नाही."
"प्लॅनिंग करत असताना या बाबींचा विचार मेट्रोकडून झालेला नाही. अनेक ठिकाणी मेट्रोच्या खांबांची उंची जास्त आहे, त्यामुळे इथेच का कमी केली असा देखील प्रश्न आहे."
"मेट्रोकडून याबाबत काही पर्याय सुचविणे अपेक्षित आहे. पण, आम्ही दिलेल्या पर्यायांची चिरफाड ते करत आहेत. पुढे लकडी पुलाची पुर्नबांधणी होईल तेव्हासुद्धा या गर्डरच्या उंचीची अडचण होणार आहे. लकडी पुल हा सर्व अर्थाने मोकळा असलेला मध्यभागातला एकमेव पूल आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यात यावा अशी आमची मागणी आहे."
कॉंग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी देखील या गर्डरच्या उंचीवर आक्षेप घेतला होता.
बीबीसी मराठीशी बोलताना बागूल म्हणाले, "मेट्रोचे अधिकारी यावर पर्याय सुचवणार होते. ते दिल्लीवरुन पुण्यात येऊन पाहणी करणार होते. पण, एअरपोर्ट बंद असल्याने ते येऊ शकले नव्हते. आम्ही ते काय पर्याय सुचवतायेत याची वाट पाहतोय."
मेट्रोच्या कामाला उशीर होतोय?
लकडी पुलावरील गर्डरच्या रखडलेल्या कामामुळे मेट्रोच्या कामाला उशीर होतोय का, यावर काही तोडगा निघाला का याबाबत बीबीसी मराठीने पुणे मेट्राचे जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनावणे यांना विचारला केली.

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc
सोनावणे म्हणाले, "महापौर याबाबत निर्णय घेणार आहेत. आम्ही त्यांना माहिती दिली आहे. दोन बैठका देखील झाल्या आहेत. या निर्णयामुळे काम थांबलंय आणि मेट्रोच्या कामाला उशीर देखील होतोय हेही खरं आहे.
"एक्सपर्ट कमिटीने अहवाल दिला आहे. त्यावर पालिकेत एक मिटींग झाली आहे. त्यावर आता महापौर निर्णय घेतील. आम्ही हे काम लवकरात लवकर सुरू व्हावं असं देखील कळवलं आहे."
येत्या आठवड्यात अंतिम निर्णय होईल - महापौर
गर्डरच्या वादावर येत्या आठवड्यात निर्णय होऊन काम लवकरात लवकर सुरु होईल असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मोहोळ म्हणाले, "या गर्डरच्या उंचीमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा येईल, अशी भूमिका काही गणेश मंडळांनी मांडली. त्यासंदर्भात मेट्रोचे अधिकारी आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधी यांची दोनवेळा बैठक झाली. काही पर्याय मंडळांनी सुचवले त्याची तपासणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्याचा अहवाल मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिला आहे.
"दोन बैठका झाल्या आहेत. या आठवड्यात याबाबतचा अंतिम निर्णय होईल. मंडळांच्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं पाहिजे आणि काम लवकर सुरू झालं पाहिजे यासाठी एक मध्यम मार्ग काढण्यात येईल. लवकरात लवकर मेट्रोचं काम सुरु होईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

























