You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुप्रिया सुळेंचं डान्स व्हीडिओवरील टीकेला उत्तर #5मोठ्याबातम्या
आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. ते आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं- सुप्रिया सुळे
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली.
लग्नाआधी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमातील संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंच्या डान्सचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुन काहींनी टीकादेखील केली होती. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.
ते आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांनी सांगितलं, "तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार?"
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
2. ममता बॅनर्जी आणि आमच्यात एक वेगळं नातं आहे - आदित्य ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (30 नोव्हेंबर) संध्याकाळी त्या मुंबईत दाखल झाल्या.
त्यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ममता बॅनर्जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय.
"पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री जेव्हाही मुंबईच्या दौऱ्यावर त्या येतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत असतो. आमच्यात एक वेगळे नातं आहे. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही," असं आदित्य ठाकरे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी म्हटलं, की उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. मला इथे येऊन बरे वाटले. मी खूप आनंदी आहे असं म्हणत 'जय मराठा, जय बांग्ला' असा नारा ममता बॅनर्जींनी दिला.
टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
3. राज्यपालांची ठाकरे सरकारला 2 वर्षं पूर्ण झाल्यावर प्रतिक्रिया- 'बाजार में जाओ और मिठाई खाओ'
महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षं पूर्ण झाली आहेत. याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी म्हटलं, "बाजार में जाओ और मिठाई खाओ."
त्यांच्या या खोचक प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी हे पुणे दौऱ्यावर होते. सोमवारी (29 नोव्हेंबर) आळंदीत त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतलं. मंगळवारी (30 नोव्हेंबर) पुण्यातील एमआयटी विद्यापिठात आयोजित संत ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी ते उपस्थित राहिले.
"आपल्या ऋषीमुनींचं ज्ञान, वसुधैव कुटुंबकम आणि एकं सतचं तत्व जगाला मार्गदर्शक आहे. बौद्धिक, अध्यात्मिक आणि शारीरिक शक्तीच्या समन्वयाने जगात संतुलन स्थापित होईल, अन्यथा बलशाली राष्ट्रं इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करतील," असं राज्यपालांनी यावेळी बोलताना म्हटलं.
न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिलीये.
4. देशात अद्यापतरी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी (30 नोव्हेंबर) राज्यसभेत महत्त्वाची दिली आहे. देशात अद्यापतरी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यसभेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.
आतापर्यंत 16 देशांमध्ये 'ओमिक्रॉन' वेरियंट संसर्ग पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, ब्रिटन, नेदरलंड, जर्मनी, हॉंगकॉंग, इटली, बेलजियम, इस्रायल, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमध्ये 'ओमिक्रॉन'चा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
5. ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड लस किती प्रभावी हे दोन-तीन आठवड्यांत कळेल- अदार पूनावाला
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर कोव्हिशील्ड लस किती प्रभावी आहे, हे येत्या दोन-तीन आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी म्हटलं.
त्यासंदर्भात आम्ही अजून अभ्यास करत आहोत, असंही पूनावाला यांनी सांगितलं.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
'ओमिक्रॉन' गंभीर आहे की नाही हे आताच सांगता येणार नसल्याचंही पूनावाला यांनी म्हटलं. 'ओमिक्रॉन'चा विचार करता बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो, अशी शक्यताही पूनावाला यांनी व्यक्त केली.
अर्थात, सरकारनं सध्या तरी आपलं सर्व लक्ष लशीचे दोन डोस देण्यावरच केंद्रित करायला हवं असही त्यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)