You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Omicron: दक्षिण आफ्रिकेतून गेल्या 20 दिवसात जवळपास 1000 लोक मुंबईत आले - आदित्य ठाकरे
"दक्षिण आफ्रिकेतून गेल्या 10 नोव्हेंबरपासून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले," अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
तसंच, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या सर्वांना ट्रेस केले जात आहे. ते मुंबईत आहेत आणि त्यांची माहिती घेतली जातेय, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितली.
लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी दोन डोसमधील अंतर कमी करणं गरजेचं आहे आणि तशी विनंती केंद्राकडे केलीय, अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली.
दुसरीकडे, आज (29 नोव्हेंबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटच्या प्रसाराबाबतही चर्चा झाली.
कोव्हिडच्या नव्या विषाणूसंदर्भात मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली.
...तर संसर्गाला रोखणं सोपे जाईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
"परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती केंद्र सरकारकडून नियमितरित्या मिळत राहावी. जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल आणि संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलंय की, "ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे, तेथील लाट सर्वांत मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत.
ओमिक्रॉन विषाणूचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास तो रूग्ण आढळणार नाही.
"सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वांत जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच 7 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.
"परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असं सांगितले.
'लॉकडाऊन नको असेल तर..', उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश
दरम्यान, लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल (28 नोव्हेंबर) राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या नव्या व्हेरियंटनं जगभर भीतीचं वातावरण निर्माण केलं असताना, भारतातही खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात झालीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनासोबत चर्चा करून, यासंबंधी आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला आदेश दिलेत की, "कोव्हिडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा."
विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य प्रशासनाला केली आहे.
कोव्हिडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला होता. पण आता या विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे आहे.
याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये, म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
राज्यात पुन्हा संसर्गात वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही, या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असं त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. 'कुछ नही होता यार' असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो. मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
ऑक्सिजन, औषध उपलब्धता तपासा, अग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करा
कोव्हिडशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले.
ते म्हणाले, "व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती."
त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे."
मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका
महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे.
या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे
परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे . त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो.
त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चाचण्या वाढवा, आवश्यक किट्स पुरवा
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
तसंच दोन्ही डोससह लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)