असदुद्दीन ओवैसींच्या वाहनावर दंडात्मक कारवाई, पोलिसाला आयुक्तांकडून बक्षीस

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर AIMIM पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे.

निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीकोनातून सोलापुरात ओवैसी यांच्या एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पण ओवैसी यांच्या मेळाव्यासोबतच एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

ओवैसींच्या वाहनाला 200 रुपये दंड

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (24 नोव्हेंबर) MIM पक्षाचा एक मेळावा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शहर परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खासदार ओवैसी एका चारचाकी वाहनातून प्रवास करत हैदराबादहून सोलापूरला दाखल झाले. सोलापुरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात ते गेले.

पण यावेळी ते प्रवास करत असलेल्या वाहनाला समोरील बाजूस नंबर प्लेटच लावलेली नव्हती. या ठिकाणी बंदोबस्तास उभे असलेले शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांना हा प्रकार लक्षात आला.

रमेश चिंताकिंदी यांनी ताबडतोब त्या वाहनाचा फोटो काढून घेतला. मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करताना त्यांनी 200 रुपये दंडाची पावती ओवैसी यांच्या चालकांना सोपवली.

मूळ मालक मोहम्मद ताजी मौनोद्दीन यांच्या नावे ही पावती करण्यात आली. यानंतर चालकाने 200 रुपये रोख स्वरूपात भरले.

शिवाय, पोलिसांच्या सूचनेनुसार चालकाने वाहनाचा नंबरप्लेट (TS 11 EV 9922) लावून घेतला.

'नियमानुसार कारवाई केली'

इतका मोठा पोलीस बंदोबस्त असताना एका गाडीवर समोरील बाजूला नंबरप्लेटच नाही, असं माझ्या लक्षात आलं. समाजात यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी नियमानुसार योग्य ती कारवाई केली, असं सहायक पोलीस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांनी सांगितलं.

त्यांनी त्या संपूर्ण घटनेचं सविस्तर वर्णन बीबीसी मराठीशी बोलताना केलं.

चिंताकिंदी म्हणाले, "सकाळी आम्ही बंदोबस्तावर होतो तेव्हा वाहनांच्या ताफ्यात एका गाडीवर नंबरप्लेटच नसल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. त्या गाडीतून खासदार असदुद्दीन ओवैसी उतरून निघून गेले. पण कायद्यासमोर सर्वच जण समान असतात, या प्रामाणिक भावनेतून मी ही कारवाई केली.

सुरुवातीला चिंताकिंदी यांनी वाहनचालकाला बाहेर बोलावून ही बाब निदर्शनास आणून दिली.

ते म्हणतात, "वाहनचालक सुरुवातीला थातूरमातूर उत्तरे देत होता. त्याने नंबरप्लेट पडल्याचं आधी सांगितलं. पण समोरच्या भागात नंबरप्लेटचं स्क्रू फिटिंग दिसलं नाही. याबाबत केलेल्या प्रश्नावर वाहनचालक निरुत्तर झाला. गाडी नवी असल्यामुळे अजून नंबरप्लेट लावलीच नाही, असं त्याने सांगितलं.

"असं करणं चुकीचं आहे. त्यामुळे मी वाहनाची कागदपत्रे वगैरे तपासली असता ती बरोबर होती. तसंच मागच्या बाजूचा वाहनक्रमांक, RC बुकमध्ये नोंदवलेला क्रमांक योग्य असल्याची खात्री केली. त्यामुळे नियमानुसार त्याच्यावर 200 रुपयांची दंडात्मक कारवाई केली," असं ते म्हणाले

यादरम्यान, खासदारांचं वाहन असल्याने पोलिसांनी ही कारवाई करू नये, अशी विनंती कार्यकर्ते चिंताकिंदी यांना करत होते. पण त्यांनी ती साफ फेटाळून लावली.

"ही रक्कम आता तत्काळ भरता येईल, अथवा 15 दिवसांची मुदत मिळू शकेल. किंवा कारवाई मान्य नसल्यास याला न्यायालयात आव्हान देता येईल, असं मी त्याच्यासमोर स्पष्ट केलं. पण वाहनचालकाने त्याची चूक मान्य करून सदर दंड लगेच भरतो, असं सांगितलं. त्यानुसार त्याने 200 रुपये रोख दिले," असं चिंताकिंदी म्हणाले.

ते म्हणतात, "काही दिवसांपूर्वी हरीष बैजल हे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. अशा स्थितीत पोलिसांच्या डोळ्यादेखत असं विना-नंबरप्लेट वाहन फिरणं योग्य नव्हतं. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला असता."

पोलीस आयुक्तांकडून बक्षीस

या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीष बैजल यांनीही या कामगिरीचं कौतुक केलं.

पोलीस आयुक्तांनी ओवैसी यांच्या वाहनावर कारवाई करणाऱ्या रमेश चिंताकिंदी यांना 5 हजार रुपये बक्षीस जाहीर केलं.

सोलापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी याबाबत बीबीसीशी बोलताना सविस्तर माहिती दिली.

"रमेश चिंताकिंदी यांनी केलेल्या कारवाईमुळे कायद्यासमोर सर्वजण समान असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्यामुळेच पोलीस आयुक्तांनी त्यांचं विशेष कौतुक केलं," असं ते म्हणाले.

"नागरिकांनी वाहन चालवत असताना प्रशासनाने निश्चित केलेले सर्व नियम पाळणं आवश्यक आहे. नागरिकांच्याच सुरक्षेसाठी पोलीस वेळोवेळी उपाययोजना करत असतात. त्यामुळे सर्वांनी हे नियम पाळून सहकार्य करावे," असं आवाहन पोलीस निरीक्षक वाबळे यांनी यावेळी केलं.

या घटनेनंतर यासंदर्भात एकच चर्चा सोलापुरात सुरू आहे. सोशल मीडियावरही या कामगिरीबद्दल पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)