के. आर. विजयन-मोहना: वर्षभर बचत करून जगभ्रमंती करणाऱ्या जोडीतील आजोबांचे निधन

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

वर्षभर पैसे वाचवून वर्षभरातून एकदा परदेश प्रवास करणाऱ्या चहाविक्रेता जोडप्यातील आजोबांचा मृत्यू झाला आहे. केरळातील या आजोबा-आजींच्या जोडीने आतापर्यंत तब्बल 26 देशांना भेट दिली होती.

कोव्हिडचे निर्बंध उठल्यानंतर गेल्याच महिन्यात त्यांनी रशियाला भेट दिली होती. ही भेट या जोडीची शेवटची भेट ठरली.

अनेकांसाठी आदर्श असलेल्या आणि इंटरनेटवर हिट असलेल्या या जोडप्यापैकी आजोबांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर नेटिजन्सनी हळहळ व्यक्त केली आहे.

केरळातील कोची शहरातील श्री बालाजी कॉफी हाऊसचे के. आर. विजयन (वय वर्षं- 71) आणि त्यांची पत्नी मोहना (वय वर्षं -69) हे दोघे अनेकांसाठी आदर्श होते.

रोज आपल्या कमाईतील 300 रुपयांची बचत ते करत असत आणि वर्षाच्या शेवटीला त्यातून ते परदेश प्रवास करत असत. आपले प्रवास त्यांनी शक्यतो ट्रॅव्हल एजन्सीसोबतच केले होते.

इंग्रजीचे अत्यल्प ज्ञान असल्यामुळे आपण ट्रॅव्हेल एजन्सीबरोबरच जातो असं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं.

27 वर्षांपूर्वी त्यांनी बालाजी कॉफी हाऊसची स्थापना केली होती. या युगुलाला फिरण्याची हौस होती. सुरुवातीला त्यांनी भारत भ्रमण केले. 2007 मध्ये पहिल्यांदा त्यांनी परदेश प्रवास केला. त्यावेळी ते इस्रायलला गेले होते.

2019 मध्ये महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना या जोडप्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यांचे हे कृत्य प्रेरणादायी आहे असे त्यांना वाटल्यानंतर महिंद्रा यांनी या जोडप्यासाठी आस्ट्रेलिया, न्यूझीलंडची परदेशवारी प्रायोजित केली होती.

या जोडप्याने आतापर्यंत अमेरिका, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, रशिया, इस्रायल इत्यादी देशांना भेट दिली होती.

कोव्हिडमुळे त्यांना 2020 मध्ये परदेश प्रवास करता आला नव्हता. पण कोव्हिड निर्बंध उठल्यानंतर या दोघांनी रशियाचा प्रवास केला होता.

विजयन यांना केरळ टुरिजमने श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे, "एक धाडसी प्रवासी आपल्या अंतिम प्रवासासाठी निघाला आहे की मळलेली वाट सोडून चालण्याचं त्यांचं धाडस आणि आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर मैलांचे दगड गाठण्याचं त्यांचं कसब हे चिरकाल स्मरणात राहील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)