विक्रम गोखलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- मराठी साहित्य मंडळाचे निवेदन #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. विक्रम गोखलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- मराठी साहित्य मंडळाचे निवेदन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर आणि ठाण्यातील काही साहित्यिकांनी दिले आहे.

मराठी साहित्य मंडळातर्फे हे निवेदन ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात देण्यात आलं आहे.

'विक्रम गोखले यांनी कंगनाला समर्थन देऊन बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा आणि देशाचा अपमान केला आहे,' असं मत जयप्रकाश घुमटकर यांनी मांडलं आहे. हे वृत्त न्यूज 18 लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

विक्रम गोखले यांनी, म्हटलं होतं, "कंगना राणावत जे म्हणाली आहे ते खरं आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलेलं आहे बरं का."

"ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही," असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

ते पुढे म्हणाले होते, "जे 70 वर्षांत झालं नाही ते मोदींनी केलं. पक्षाचं काम सर्वच करतात पण ते देशासाठी काम करतात."

"आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. केवळ लाल बहादूर शास्त्री सोडून. त्यांची जयंती 2 ऑक्टोबरला येते. ती हेतूपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो."

2. पेट्रोल-डिझेलच्या किमती अमेरिका ठरवते- दानवे

पेट्रोल डिझेलच्या किमती अमेरिका ठरवते. केंद्र सरकार त्या किमती रोज वर-खाली करत नाही, त्यामुळे दरवाढीला केंद्र सरकारला जबाबदार धरता येणार नाही असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

औरंगाबादच्या भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हे विधान दानवे यांनी केले आहे.

"केंद्राने कर कमी केल्यावरही राज्य सरकारने आपला कर कमी केलेला नाही हे आपण लोकांना सांगायला हवे, हा देश फक्त केंद्र सरकारच्या पैशावर चालतो. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र येऊन काहीही निर्णय घेत नाहीत," असंही त्यांनी यावेळेस सांगितलं आहे.

3. आधी कोठडीतले जेवण घ्या- न्यायालय

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले आहे. आपल्याला घरचे जेवण देण्यात यावे अशी मागणी अनिल देशमुख यांनी केले होते.

त्यावर 'आधी कोठडीतले जेवण घ्या' अशा शब्दांमध्ये न्यायालयाने त्यांना फटकारले असून त्यांची मागणी फेटाळली आहे.

ईडीची कोठडी संपल्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात पुन्हा उभं करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची कोठडी सुनावली.

प्रकृतीचं कारण देत देशमुख यांनी घरच्या जेवणाची मागणी केली होती. 'तेव्हा आधी तुरुंगातलं जेवण घ्या, योग्य वाटलं नाही तर विचार करू' असं न्यायालयानं त्यांना सांगितलं. मात्र तुरुंगात वेगळा बेड देण्याची त्यांची मागणी मान्य करण्यात आली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने प्रसिद्ध केली आहे.

4. राष्ट्रवादीची 'युवती' निघाली वाहनचोर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती विभागाच्या कार्यकर्तीला चंद्रपूरमध्ये वाहनचोरीत अटक करण्यात आली आहे. आपल्या साथीदारांच्या मदतीने ती वाहनांची चोरी करत असे. न्यूज 18 लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. नेमकी संधी साधून मोपेड चोरी करत होते. त्यानंतर त्या मोपेडला दूरवर पर्यंत ढकलत नेण्यात येत होतं.

'निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर मेकॅनिक साथीदाराच्या सहाय्याने गाडी सुरू केली जात होती. तिथून मोपेड आपल्या राहत्या ठिकाणी आणत होते. मोपेड चोरी केल्यानंतर तिची विक्री केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. एकूण 11 मोपेड वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीकडून जप्त केली आहेत.' असं या वृत्तात म्हटलं आहे.

5. हार्दिक पंड्याकडून 5 कोटींची 2 घड्याळं जप्त

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याकडून 5 कोटी रुपयांची 2 घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. भारताचा संघ रविवारी भारतात परतल्यावर कस्टम विभागाने विमानतळावर केलेल्या तपासणीत हे उघड झाले आहे.

या घड्याळांचे बिल हार्दिककडे नव्हते तसेच याबाबत त्याने काहीही जाहीर केले नव्हते. यामुळे हार्दिक पंड्या पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)