T20 World Cup : पाकिस्तानला भारता पेक्षाही न्यूझीलंडला हारवणं महत्त्वाचं वाटत होतं, कारण...

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

विश्वचषकात भारताला हरवता येत नाही हे 29 वर्षांचं जोखड फेकून दिल्यानंतर पाकिस्ताननं न्यूझीलंडचा वचपा काढला. मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला.

भारत-पाकिस्तान सामन्याला भावनिक किनार होती. तशी किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भावनिकता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला आहे.

सुरक्षिततेच्या कारणास्तव न्यूझीलंडने पााकिस्तानात दाखल झाल्यानंतर पहिल्या सामन्याच्या काही तास आधी दौरा रद्द करत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. दोन महिन्यांपूर्वी न्यूझीलंडचा संघ 3 वनडे आणि 5 ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल झाला. क्वारंटीन पूर्ण केल्यावर त्यांनी पाच दिवस सरावही केला. पहिल्या मॅचच्या सकाळी त्यांनी दौऱ्यातून माघार घेत असल्याचं स्पष्ट केले.

"पाकिस्तानात धोक्यामध्ये झालेली वाढ आणि न्यूझीलंडच्या टीमच्या सुरक्षा सल्लागारांशी सल्लामसलत केल्यानंतर हा दौरा पुढं सुरू ठेवू शकणार नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे," असं न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशननं एका ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं होतं.

न्यूझीलंडच्या या अनपेक्षित निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये धुरळा उडाला. खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. माजी खेळाडू, पीसीबी पदाधिकारी यांनी न्यूझीलंडच्या निर्णयावर जोरदार टीका केली.

आम्हाला मिळालेल्या माहितीचा विचार करता, हा दौरा सुरू ठेवणं शक्य नव्हतं, असं न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेवीड व्हाइट म्हणाले होते. "पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा धक्का असेल, याची मला जाणीव आहे. कारण त्यांनी उत्तम प्रकारे आयोजन केलं. मात्र, आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे आणि हाच एकमात्र पर्याय आहे असं आम्हाला वाटतं," असंही ते म्हणाले होते.

न्यूझीलंड क्रिकेट प्लेअर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हीथ मिल्स यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. खेळाडू सुरक्षित आहेत आणि त्या सर्वांच्या भल्यासाठीच आम्ही काम करत आहोत, असं ते म्हणाले.

सुरक्षेच्या कारणावरून संघाला परत बोलावण्यासंदर्भात अधिक चर्चा करू शकत नाही, असंही न्यूझीलंड क्रिकेटनं म्हटलं होतं.

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचा निर्णयाला पाठिंबा

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनीही, खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करता पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

"मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा केली आणि आमच्या संघाची काळजी घेण्यासाठी त्यांचे आभार मानले," असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या.

"स्पर्धा होऊ शकली नाही, है दुर्दैवी आहे. पण खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे. आम्ही या निर्णयाच्या पूर्णपणे पाठिशी आहोत," असंही त्यांनी म्हटलं.

दुर्देवी निर्णय-पीसीबी

न्यूझीलंडचा हा निर्णय एकतर्फी आणि निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. त्यांचा संघ सुरक्षेच्या बाबतीत समाधानी होता, असं पीसीबीने म्हटलं होतं.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं त्यांना सुरक्षेसंदर्भात अलर्ट मिळाला असून, त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. पीसीबी आणि पाकिस्तान सरकारनं येणाऱ्या सर्व संघांसाठी सुरक्षा पुरवण्याची पुरेशी तयारी केली आहे.

न्यूझीलंडच्या संघाचे सुरक्षा अधिकारी याठिकाणी दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर समाधानी होते. ठरलेले सामने व्हावे अशी पीसीबीची इच्छा होती. पाकिस्तान आणि जगभरातील क्रिकेटप्रेमी अखेरच्या क्षणाला दौरा रद्द केल्यानं निराश असतील, असं पीसीबीने म्हटलं.

पाकिस्तानचा कर्णधारही नाराज

"अचानक मालिका स्थगित झाल्यानं निराश झालो आहे. यामुळे लाखो पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकलं असतं. मला आमच्या सुरक्षा यंत्रणांच्या क्षमता आणि कामगिरीवर विश्वास आहे. ते आमचा गौरव आहेत आणि राहतील," असं आझमनं म्हटलंय.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीनंही हा निर्णय निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. "मी गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानात खेळत असून, मला पूर्णपणे सुरक्षित वाटतं. तिथं खेळण्याचा माझा अनुभव अत्यंत उत्तम आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे," असं तो म्हणाला.

परिणाम

न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानात येणं रद्द केलं. या तीन मालिका रद्द झाल्याने पाकिस्तानच्या प्रतिमेला धक्का बसला.

आजही पाकिस्तान आंतरराष्ट्रीय संघांसाठी सुरक्षित नाही असा संदेश जगभरात गेला. न्यूझीलंड आणि इंग्लंड मालिकेसाठी तिकीटविक्री झाली होती.

मालिका रद्द झाल्याने पीसीबीला हे पैसे मिळणार नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. या दोन मालिका रद्द झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

न्यूझीलंडचा संघ 18 वर्षांनी पाकिस्तानात आला होता. 2003 मध्ये न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना खेळाडूंचं वास्तव्य ज्या हॉटेलात तिथे जवळच बॉम्बस्फोट झाला होता. सुदैवाने यात न्यूझीलंडच्या ताफ्यातील कोणालाही काही झालं नाही. मात्र काही तासांमध्ये दौरा रद्द करून न्यूझीलंडचा संघ मायदेशी रवाना झाला होता.

न्यूझीलंडविरुद्ध बदला घ्या-पीसीबी अध्यक्ष

"न्यूझीलंडने सेक्युरिटी थ्रेटचे तपशील जारी केले नाहीत. आम्ही चांगलं आदरातिथ्य करतो. आमची सुरक्षायंत्रणा तावून सुलाखून निघालेली आहे. न्यूझीलंड-इंग्लंड संघांच्या माघारीचा परिणाम पुढच्या दौऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. न्यूझीलंडने दौरा रद्द केल्यामुळे जे नुकसान झालं आहे त्याची नुकसानभरपाई मिळेल याची मी खात्री देतो.

न्यूझीलंडविरुद्ध खेळताना अंगावर आलं तर शिंगावर घ्या. कोणताही कनवाळूपणा दाखवू नका. विश्वचषकात भारताविरुद्ध जिंकायचं आहे. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांना हरवा.

पाकिस्तानच्या चाहत्यांनी आपला राग संघाला पाठिंबा देऊन काढावा. न्यूझीलंड आमच्याबरोबर चांगलं वागलं नाही, आम्ही याचा बदला मैदानात काढू. पाकिस्तान क्रिकेट संपणार नाही," असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, माजी कर्णधार रमीझ राझा यांनी म्हटलं होतं.

विश्वचषकात बाकी संघ महत्त्वाचे आहेतच पण न्यूझीलंडला कसंही करून हरवा असं पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरनेही म्हटलं आहे.

विश्वचषकात पाकिस्तान-न्यूझीलंड किती वेळा आमनेसामने?

ट्वेन्टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंड 5 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये पाकिस्तानचं पारडं 3-2 असं निसटतं जड आहे.

2007मध्ये पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडला 6 विकेट्सनी नमवलं. 2009 मध्ये ओव्हल इथे झालेल्या मुकाबल्यात पाकिस्तानने 6 विकेट्सच्या अंतराने न्यूझीलंडला हरवलं.

2010मध्ये ब्रिजटाऊन इथे झालेल्या अटीतटीच्या मुकाबल्यात न्यूझीलंडने एका धावेने विजय मिळवला होता.

2012मध्ये पल्लेकल इथे झालेल्या लढतीत पाकिस्तानने 13 धावांनी विजय मिळवला होता.

2016 मध्ये मोहाली इथे झालेल्या लढतीत न्यूझीलंडने पाकिस्तानवर 22 धावांनी विजय मिळवला होता. पाच वर्षांपूर्वी झालेल्या या लढतीपैकी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके खेळाडू सध्याच्या संघात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)