You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डुस्को पोपोव्ह : ज्याला डोळ्यासमोर ठेवून 'जेम्स बाँड'चा जन्म झाला तो डबल एजंट
जुगार, हेरगिरी आणि आकर्षक तरुणी... या सगळ्याच बाबतीत त्यांची उदाहरणं दिली जातात...त्यांचं नाव होतं पोपोव्ह.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रसिद्ध झालेले सर्बियातील एक डबल एजंट डुस्को पोपोव्ह यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. हेरगिरीच्या विश्वातील इतिहासात पोपोव्ह यांना 'ट्रिपल एजंट' म्हणूनही ओळखलं जातं.
ब्रिटनमधील नेव्हल इंटलिजन्सचे अधिकारी इयान फ्लेमिंग यांनी डुस्को पोपोव्ह यांच्या भेटीनंतरच जेम्स बाँडचं पात्र रचलं होतं, असं म्हटलं जातं.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोपोव्ह याना पर्ल हार्बर बेटावर जपानी हल्ला करणार असल्याची माहिती होती, असंही काही लोकांचं म्हणणं आहे.
पोपोव्ह यांनी एफबीआयचे तत्कालीन डायरेक्टर अॅडगार हूवर यांना याबाबतीत सांगितलंही होतं.
अॅडगार हूवर यांनी त्यावर विश्वास ठेवला असता असता, तर पर्ल हार्बरमध्ये अमेरिकी नागरिकांची झालेली हानी टाळता आली असती.
कोण होते डुस्को पोपोव्ह?
डुस्को पोपोव्ह यांचा जन्म 1912 मध्ये सर्बियातील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. बेलग्रेड युनिव्हर्सिटीतून कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर उर्वरित शिक्षणासाठी ते जर्मनीला गेले.
"जर्मनीमध्ये पोपोव्ह यांची मैत्री त्याठिकाणच्या 'अब्येहर' या गुप्तचर यंत्रणेशी संलग्न असलेल्या काही लोकांशी झाली होती. 'अब्येहर' नं पोपोव्ह यांना संपर्क केला आणि त्यांना ब्रिटनमध्ये जर्मनीसाठी हेरगिरी करण्याची ऑफर दिली," असं दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिण्यात आलेल्या 'अॅस्टोरिल' या कादंबरीचे लेखक डेजान टियागो स्टांकोविच यांनी म्हटलं आहे.
"यामागचं कारण म्हणजे, जर्मनीकडे तेव्हा ब्रिटनमध्ये फार विदेशी हेर नव्हते. पोपोव्ह यांनी 'अब्येहर'चा प्रस्ताव स्वीकारला आणि ते थेट ब्रिटिश फॉरेन इंटलिजन्स एजन्सी 'एमआय-सिक्स' कडे गेले. पोपोव्ह यांनी एमआय-सिक्सला सर्वकाही सांगितलं."
त्यामुळं पोपोव्ह हे ब्रिटन आणि जर्मनी दोघांसाठी काम करणारे डबल एजंट बनले. हा काळ होता 1940 ते 1944 दरम्यानचा.
ब्रिटनमधील हेरांच्या गोटात पोपोव्ह यांचं कोडनेम 'एजंट ट्रायसिकल' होतं.
रंगेल स्वभाव असलेला गुप्तहेर
अठरा वर्षांपूर्वी ब्रिटननं सर्वप्रथम महायुद्धाच्या काळातील हेर आणि डबल एजंट्स यांच्याशी संबंधित माहिती (कागदपत्रं) जाहीर केली.
त्यावेळी बीबीसीच्या क्लेअर हिल्स यांनी ही कागदपत्रं पाहिली होती.
"ब्रिटनच्या हितांसाठी काम करणाऱ्या आणि सर्वात रंगेल स्वभाव असलेल्या हेराला केवळ एकच कोडनेम दिलं जाऊ शकतं. ते म्हणजे 'प्लेबॉय डबल एजंट'. तो असा व्यक्ती होता, जो एकाचवेळी पत्नी आणि प्रेयसी दोघींना सांभाळू शकत होता," असं क्लेअर यांनी लिहिल होतं.
लंडनच्या 'सेवोय' हॉटेलच्या एका विशेष खोलीत पोपोव्ह राहायचे. सौंदर्यवती, तरुणींवर प्रभाव कसा पाडायचा यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळंचं त्यांना 'प्लेबॉय' म्हटलं जात होतं. एवढंच नव्हे तर, बेडवर पोपोव्ह यांना एकापेक्षा जास्त पार्टनरचीही आवड होती, हेही नंतर समोर आलं.
"1940 मध्ये ख्रिसमसला मी आणि ट्रायसिकल लंडनच्या क्वॅग्लिनोस रेस्तरॉमध्ये लंचसाठी भेटलो होतो. तिथून आम्ही लँड्सडाऊन क्लबच्या बर्कले स्क्वेअरवर बिलियर्ड्स खेळण्यासाठी गेलो. त्यानंतर डिनरसाठी 'सेवोय' हॉटेलमध्ये परतलो. त्यावेळी ट्रायसिकलनं प्रचंड मज्जा केली, खूप शॅम्पेन प्यायली होती," ब्रिटनचे गुप्तचर सेवेतील अधिकारी मेजर टीए रॉबर्टसन यांनी पोपोव्ह यांच्याबाबत अधिकृत ही माहिती दिली होती.
'प्रचंड गोपनीय'
पोहोव्ह यांना काही जण देशातील सर्वात महत्त्वाचे हेर म्हणू लागले होते. यावरून ब्रिटनमधील गुप्तचर यंत्रणेतील त्यांच्या स्थानाचा अंदाज येतो.
वायरलेस कम्युनिकेशन, न दिसणाऱ्या शाईनं लिहिले जाणारे पोस्टकार्ड, मायक्रोडॉट्सचे स्पेशल कोड अशा अनेक चाली पोपोव्ह यांच्याकडे तयार असायच्या.
ब्रिटनबाबत अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवत असल्याचं पोपोव्ह यांनी जर्मनीला पटवलं होतं. मात्र प्रत्यक्षात 'एमआय-सिक्स'च्या परवानगीनंच पोपोव्ह जर्मनीला माहिती पुरवत होते.
एजंट ट्रायसिकल यांच्या फाईलमध्ये 'अत्यंत गोपनीय' नावाचंही एक प्रकरण होतं. त्यात एका खास घटनेचा उल्लेख होता. एका जर्मन अधिकाऱ्यानं पोपोव्ह यांना ब्रिटनच्या हत्यारांबाबत माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नांची एक यादी दिली होती, असं त्यात म्हटलं आहे.
ब्रिटनच्या वेब्रिज, वॉल्व्हॅम्पटन आणि डार्टफोर्डमधील कारखान्यांमध्ये कशाचं उत्पादन केलं जात आहे. तसंच ब्रिटनच्या लष्कराकडे कशा प्रकारच्या बंदुका आणि शस्त्रं आहेत, हे जर्मन अधिकाऱ्यांना पोपोव्ह यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं.
'डबल एजंट' पोपोव्ह
जर्मनीला पोपोव्ह यांच्याकडून अत्यंत बारीक सारीक माहिती हवी होती. ब्रिटनकडे किती लढाऊ विमानं आहेत? किती स्पिटफायर आहेत आणि किती हरिकेन विमानं आहेत? लष्कराच्या शस्त्र विभागात काय आहे किंवा काय नाही? अशी माहिती त्यांना विचारण्यात आली होती.
ब्रिटनच्या गुप्तचर सेवेतील अधिकारी पोपोव्ह या प्रश्नांसाठी उत्तरं तयार करायचे. ती उत्तरं वरवर खरी वाटायची पण प्रत्यक्षात ती माहिती अर्धवट असायची. जर्मन अधिकाऱ्यांना एजंट ट्राइसिकल ही अर्धवट माहितीच द्यायचे.
डुस्को पोपोव्ह यांनी न दिसणाऱ्या शाईचा एक फॉर्म्युला तयार केला होता. ते दारुच्या ग्लासमध्ये ती मिसळायचे. पोपोव्ह यांच्याबाबत अशा अनेक बाबींचा उल्लेख फाईलमध्ये आहे. अदृश्य शाईनं लिहिलेले त्यांचे पोस्टकार्ड, एअरमेल द्वारे पाठवलेली पत्रे ज्यावर ओपन्ड अँड एक्झामिन्ड असे शिक्के असायचे. प्रेयसींना लिहिलेली पत्रे जी प्रत्यक्षात हिज मॅजेस्टीच्या सर्व्हिसला पाठवली जात होती.
ते इंग्रजी, इटालियन आणि फ्रेंच तिन्हा भाषा बोलायचे. कामापुरती जर्मन भाषाही त्यांना येत होती.
संदेशांद्वारे त्यांनी मित्रदेशांच्या बॉम्ब हल्ल्यामुळं जर्मनीच्या शहराच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली होती. अशाच एका संदेशात पोपोव्ह यांनी जर्मनीच्या हॅम्बर्ग बेटाला बॉम्बहल्ल्यानं प्रचंड नुकसान झालं आहे, मात्र अजूनही ते वापरण्या योग्य आहे, अशी माहिती दिली होती.
बुद्धिमान आणि सज्जन
"एजंट ट्राइसिकल जर्मनीवर वार करण्याची एकही संधी सोडत नव्हते. 1941 मध्ये एका ठिकाणी तर पोपोव्ह यांनी दोन वर्षांत ब्रिटनच्या विजयाची खात्री असल्याचंही म्हटलं होतं. त्याचं कारण म्हणजे जर्मनीची अर्थव्यवस्था आणि नैतिक बळ दोन्ही कमकुवत झालं होतं," असं पोपोव्ह यांच्याबाबत ब्रिटिश लष्करातील एका अधिकाऱ्यानं लिहिलं होतं.
अशाच एका औपचारिक संदेशामध्ये पोपोव्ह यांना 'बुद्धिमान आणि सज्जन व्यक्ती' म्हटलं होतं.
"त्यांच्याकडे व्यक्तिमत्वं आहे, चार्म आहे. ते युरोप किंवा अमेरिकेच्या कोणत्याही शहरात समाजात अशाप्रकारे राहतात, जणू ते त्यांचंच घर आहे. ते आंतरराष्ट्रीय प्लेबॉयसारखे आहेत. वर्षातील एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ पॅरिसमध्ये घालवतात. सुंदर महिलांसोबत राहण्याची त्यांना विशेष आवड आहे," असा तो पूर्ण संदेश होता.
सर्वात रंजक बाब म्हणजे, एजंट ट्राइसिकलनं ब्रिटनच्या गुप्तचर सेवेकडून पैसे घेण्यास नकार दिला होता. ज्या देशाबाबत खरं प्रेम आहे, त्यासाठी काम करण्याचा आनंद आहे. शिवाय जर्मनी गरजेच्या तुलनेत भरपूर पैसा देते असं पोपोव्ह यांचं म्हणणं होतं.
मात्र, अनेक ठिकाणी ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेनं त्यांना पैशाची मदत केली होती. "शुक्रवारी, 14 मार्च, 1941. सेवोयमध्ये लंचदरम्यान माझी ट्रायसिकलशी भेट झाली. बिल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचं त्यांनी मला सांगितले तेव्हा ते थकलेले दिसत होते. आधीच्या दिवशी त्यांचा बराच खर्च झाला असावा, असं जाणवत होतं," अशी नोंद एका ठिकाणी आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पोर्तुगाल
इटलीमध्ये ट्रेनिंगनंतर इंग्रजांनी पोपोव्ह यांना पोर्तुगालला पाठवलं. त्याठिकाणी त्यांचे जर्मन बॉस 'कसिनो अॅस्टोरिल' हॉटेलमध्ये राहायचे.
"त्या काळात पोर्तुगालमधील ऐतिहासिक 'कसिनो अॅस्टोरिल' हॉटेल हेरगिरीसंबंधी घटनांसाठी महत्त्वाचा अड्डा असायचा," असं डेजान टियागो स्टांकोविच सांगतात.
'कसिनो अॅस्टोरिल' लिस्बन शहराबाहेरचं एक बीच रिसॉर्ट होतं.
"दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पोर्तुगाल तटस्थ देश होता. युरोपच्या इतर तटस्थ देशांप्रमाणे, पोर्तुगालमध्येही हेरगिरीच्या कारवाया जोमानं सुरू होत्या. हॉटेलची लॉबी, बार, सगळीकडे हेरच असायचे. त्यापैकी बहुतांश हे जर्मनी आणि ब्रिटनचे असायचे," असं इतिहासकार आयरीन पेमेंटल यांचं म्हणणं आहे.
"ते एकमेकांना अभिवादन करायचे, भेटायचे आणि गोपनीय माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असायचे. पोपोव्ह आणि त्यांचे जर्मन बॉस 'कसिनो अॅस्टोरिल' च्या रूलेट टेबल (एका प्रकारचा जुगार) वर क्रमांकांच्या मदतीनं माहितीची देवाण घेवाण करायचे."
इयान फ्लेमिंग यांची भेट
जगात कोरोनाचं संकट आलेलं नसतं, तर बॉक्स ऑफिसवर सध्या जेम्स बाँडच्या 'नो टाइम टू डाय' चित्रपटाचा गाजावाजा सुरू असता.
"दुसऱ्या महायुद्धादरम्यान, 1941 च्या उन्हाळ्याच्या एका रात्री 'कसिनो अॅस्टोरिल' हॉटेलमध्ये डुस्को पोपोव्ह आणि इयान फ्लेमिंग यांची भेट झाली," असं डेजान टियागो स्टांकोविच सांगतात.
त्यावेळी इयान फ्लेमिंग ब्रिटनच्या नेव्हल इंटलिजन्सचे अधिकारी होते. त्यानंतर जेम्स बाँडचं पात्र निर्माण करण्यासाठी त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.
"माझ्या मते, इयान फ्लेमिंगच्या मनात जेम्स बाँडची कल्पना त्याच भेटीनंतर त्याच ठिकाणी आली असावी," असं डेजान टियागो स्टांकोविच म्हणतात.
पोर्तुगालनंतर डुस्को पोपोव्ह यांचं नवं मिशन होतं अमेरिका.
"अमेरिकेला जाण्याच्या एका रात्रीपूर्वी पोपोव्ह अॅस्टोरिलमध्ये जुगार खेळत होते. दुसऱ्या दिवशी त्यांना प्रवासावर निघायचं होतं. त्यामुळं त्यांच्याकडं भरपूर पैसे होते. जर्मनीनं त्यांना ते दिले होते. जुगाराच्या टेबलवर ते अत्यंत बेजबाबदार वर्तन करत होते. वेगवेगळ्या मुलींबरोबर झळकत होते. कुठल्याही प्रकारे ते हेर वाटत नव्हते. तेवढ्यात, इयान फ्लेमिंग यांची नजर त्यांच्यावर पडली," असं स्टांकोविच सांगतात.
पोर्तुगालमधील 'कसिनो अॅस्टोरिल'
फ्लेमिंग आणि पोपोव्ह दोघेही एकाच वेळी अॅरिस्टोरिलमध्ये होते. पॅलेसियो अॅस्टोरिल हॉटेलच्या डिस्प्लेमध्ये दोघांचे चेक-इनचे डॉक्युमेंट्स होते.
1969 मध्ये या हॉटेलमध्ये जेम्स बाँडचा चित्रपट 'ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस'चा काही भाग शूट झाला होता.
या हॉटेलमध्ये जेम्स बाँड नावाचा एक स्वीटही आहे. त्यात पाहुणे थांबू शकतात.
"फ्लेमिंग आणि पोपोव्ह याठिकाणी नियमितपणे थांबायचे याबाबत आमच्याकडे माहिती आहे. फ्लेमिंग आणि पोपोव्ह यांची त्या रात्री कसिनोमध्ये भेट झाली असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, फ्लेमिंग यांनी पोपोव्हबाबत कधीही काहीही लिहिलं नाही. त्यामुळं जगाला त्यांची कहाणी माहिती नाही, असं स्टांकोविच म्हणतात.
मात्र, फ्लेमिंग यांच्या मृत्यूनंतर पोपोव्ह यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. 'स्पाय एन्काऊंट स्पाय' या आत्मचरित्रात फ्लेमिंग यांना त्यांच्याकडूनच जेम्स बॉडची प्रेरणा मिळाली होती, असं लिहिलं आहे.
जेम्स बाँड यांचा 'कसिनो रॉयल' चित्रपटमध्ये प्रत्यक्षात 'कसिनो अॅस्टोरिल' हाच आहे.
जेम्स बॉन्डची प्रेरणा
"इतिहासात जेम्स बाँडच्या पात्रासारखं व्यक्तिमत्व असलेले अत्यंत मोजके हेर आहेत. मात्र, डुस्को पोपोव्ह खरंच असे होते, जे जेम्स बाँडसारखेच वाटायचे. त्याला अपवाद केवळ दारु पिण्याच्या सवयीचा होता. जेम्स बाँडप्रमाणे दारु पिणं शक्य नसल्याचं पोपोव्ह म्हणायचे. 007 चं पात्र मात्र प्रचंड दारू पिणारं होतं,'' असं डेजान टियागो स्टांकोविच म्हणाले.
फ्लेमिंग यांनी त्यांच्या जेम्स बाँड या पात्रासाठी महागड्या वस्तू, ऐशोरामाची जीवनशैली आणि सुंदर महिलांप्रती आकर्षण अशी अनेक वैशिष्ट्य तयार केली होती. त्यामुळं हे पात्र बऱ्याच अंशी पोपोव्ह यांच्यापासून प्रेरणा घेतलेलं असावं असं वाटायचं. 'अॅस्टोरिल' या पुस्तकाच्या संशोधनादरम्यान स्टांकोविच यांना ही माहिती मिळाली होती.
डुस्को पोपोव्ह यांचा डेटिंग रेकॉर्ड पाहता, त्यांचे अनेक महिलांशी संबंध होते, असं सांगितलं जातं.
पोपोव्ह यांच्या प्रेमिकांमध्ये फ्रेंच अभिनेत्री सिमोने सिमोन यांचं नावही घेतलं जातं.
ट्राइसिकल कोडनेम
पोपोव्ह यांना एजंट ट्रायसिकल हे कोडनेम मिळण्याचीही एक कथा आहे. पोपोव्ह ट्रिपल एजंट होते. त्यांनी अमेरिकेसाठीही काम केलं होतं, त्यामुळं त्यांना हे नाव मिळालं होतं.
स्टांकोविच मात्र याची वेगळी कहाणी सांगतात. "मला जी गोष्ट खरी वाटते, त्यानुसार पोपोव्ह यांना पर्ल हार्बरवर होणाऱ्या जपानींच्या हल्ल्याची माहिती मिळाली होती. पण ते बढाया मारणारे होते आणि त्यांच्या वर्तनामुळं अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयचे तत्कालीन डायरेक्टर अॅडगार हूवर यांना त्यांच्यावर विश्वासच बसला नाही. हूवर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. एवढी महत्त्वाची माहिती असेल असं पोपोव्ह यांच्याकडे पाहून, कोणालाही वाटत नव्हतं."
जर्मनीच्या अधिकाऱ्यांना पोपोव्ह यांच्यावर एवढा विश्वास का होता?
"पोपोव्ह यांचं कुटुंब बेलग्रेडमध्ये गरिबीबरोबर संघर्ष करत होतं. पोपोव्ह यांच्यावर मात्र तेव्हा पैशाचा पाऊस पडत होता. ते हजारो खर्च करत होते. बेलग्रेडमध्ये नाझींच्या हल्ल्यादरम्यान पोपोव्ह यांच्या कुटुंबाला बंदी बनवून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं पोपोव्ह यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, असं जर्मनीला वाटत होतं.
मात्र पोपोव्ह यांचा डबल गेम त्यामुळंही थांबला नाही. कारण पोपोव्ह यांचा उद्देश इतर कोणत्याही गोष्टीच्या तुलनेत जास्तीत जास्त पैसा मिळवणे हा होता," असं डेजान टियागो स्टांकोविच म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)