You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी, भाजपकडून त्यांचा वापर- शिवसेना खासदार #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) राज ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी, भाजपकडून त्यांचा वापर - शिवसेना खासदार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी असल्याची टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलीय. झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय.
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना, अयोध्येच्या साध्वी गुरु माँ कांचनगिरी यांनी नुकतीच मुंबईत येऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन उतरणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
याच अनुषंगानं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, "राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलेलं आहे. परप्रांतियांचा प्रश्न उभा करत उत्तर भारतीयांना मारायचं, बिहारी लोकांची सालटी काढायची हे धंदे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केले आहेत."
तसंच, "भाजप राज ठाकरेंना शिवसेनेशी लढण्यासाठी शिखंडीसारखा वापर करत असतील, तर ते योग्य ठरणार नाही. उलट भाजपची सर्व मतं शिवसेनेकडे येतील," असंही विनायक राऊतांनी म्हटलं.
विनायक राऊत यांच्या टीकेवर मनसेकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाहीय. त्यामुळे मनसेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
2) 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही - भाजप आमदार
भारतातील 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नसल्याचं मत भाजपचे उत्तर प्रदेशातील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे. पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले.
डेक्कन हेरॉल्डनं ही बातमी दिली आहे.
2014 सालच्या दरडोई उत्पन्नाशी आताच्या दरडोई उत्पन्नाची तुलना केली असताना पेट्रोलचे दर वाढले नसल्याचं लक्षात येईल, असंही उपेंद्र तिवारी म्हणाले.
"ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे, त्यांना पेट्रोल लागतं. 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही," असंही ते म्हणाले.
विरोधकांकडे भाजपविरोधात बोलण्यासाठी मुद्दा नसल्यानं ते पेट्रोल दरवाढीचा मुद्दा आणत असल्याचंही तिवारी म्हणाले.
3) हिंदू-मुस्लीम वादासाठी शाहरूखच्या मुलाचा वापर - नाना पटोले
हिंदू-मुस्लीम वादासाठी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोकसत्तानंही ही बातमी दिली.
भारतात हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा गंभीर आरोपही पटोलेंनी यावेळी केला.
नाना पटोले म्हणाले, "एनसीबी ज्या पद्धतीने हे प्रकरण दाबायाचं प्रयत्न करत आहे, त्यावरून निश्चितच दाल मे कुछ काला है. मोठ्या अभिनेत्याच्या मुलाच्या आधारे हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे."
तसंच, "कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, जे चूक करतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर 3 हजार किलो अमली पदार्थ सापडले, त्याचे काय झाले? त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही," असंही पटोले म्हणाले.
4) यूपीत सत्तेत आल्यास मुलींना स्मार्टफोन, स्कूटी देऊ - प्रियंका गांधी
उत्तर प्रदेशमध्ये सत्ते आल्यास 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना स्मार्टफोन आणि पदवीचं शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना इलेक्ट्रिक स्कूटी देऊ, अशी घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली. हिंदूस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
याबाबत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "मी काही मुलींना भेटले. त्यांनी मला सांगितलं की, अभ्यासासाठी त्यांना स्मार्टफोन हवाय. सुरक्षितता हवीय. मला आनंद वाटतो की, यूपी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात या मुलांना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कूटी देण्याचं वचन देण्यात आलंय."
गेल्याच आठवड्यात काँग्रेसनं उत्तर प्रदेशात घोषणा केली होती की, विधानसभा निवडणुकीत 40 टक्के तिकिटं महिलांना देणार आहोत.
5) सुबोध जयस्वाल यांना संभाव्य आरोपी मानावं - महाराष्ट्र सरकार
"सुबोध जयस्वाल राज्याचे पोलीस महासंचालक असताना त्यांनीच पोलिसांच्या बदल्या आणि इतर शिफारशी मंजूर केल्या होत्या. त्यामुळे सीबीआयचे प्रमुख सुबोध जयस्वाल यांनी स्वतः लाच यामध्ये संभाव्य आरोपी म्हणून पाहावं," असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुंबई हायकोर्टात करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तपास सुरू आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
"सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक या सर्वोच्च सरकारी अधिकाऱ्यांनाच चौकशीसाठी बोलावलेलं आहे, मग ही निष्पक्ष चौकशी आहे का? असा सवाल उपस्थित होतो," असं सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी हायकोर्टाला सांगितलं.
अनिल देशमुखांविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना बजावलेल्या समन्सविरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
सीबीआयला या याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी हायकोर्टानं 28 ऑक्टोबरपर्यत ही सुनावणी तहकूब केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)