आदिपुरुषः अरविंद त्रिवेदी रावणाची भूमिका साकारण्यासाठी दिवसभर उपवास का करायचे?

फोटो स्रोत, Arvind Trivedi
दूरदर्शनवरील प्रचंड गाजलेल्या 'रामायण' या धार्मिक मालिकेमध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं ऑक्टोबर 2021 मध्ये निधन झालं. मृत्यूसमयी अरविंद त्रिवेदी 83 वर्षांचे होते.
रामायणातील रावणाच्या भूमिकेनं अजरामर झालेल्या त्रिवेदी यांनी 'विक्रम और बेताल' मालिकेतही महत्तवाची भूमिका साकारली होती. त्याशिवाय गुजराती सिनेसृष्टीमध्ये देखील त्यांचं मोठं नाव होतं.
रामायणातील सर्वच पात्रांप्रमाणं रावणाचं पात्रही अजरामर झालं होतं. त्यात अरविंद त्रिवेदी यांचा मोठा वाटा होता. मात्र रावणाचं पात्र त्यावेळी बॉलिवूडमध्ये खलनायक साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्यांनं साकारावं असं सर्वांना वाटत होतं.
अमरीश पुरींना होती पसंती
रामानंद सागर यांच्या रामायणात लंकेश रावणाच्या भूमिकेनं अरविंद त्रिवेदी यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अरविंद हे मूळचे मध्य प्रदेशच्या इंदूर शहराशी संबंधित आहेत. त्यांनी 250 पेक्षा जास्त गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

फोटो स्रोत, Arvind Trivedi
अरविंद गुजरातमध्ये नाटकांमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांना रामानंद सागर 'रामायण' तयार करत असून पात्रांसाठी ऑडिशन घेत असल्याचं समजलं. त्यासाठी ऑडिशन द्यायला ते गुजरातहून मुंबईला आले. त्यांना केवटाची भूमिका हवी होती, असं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं होतं.
स्वतः अरुण गोविल यांनीही मान्य केलं की, त्यांनी आणि संपूर्ण टीमने रामानंद सादर यांना अभिनेते अमरीश पुरींना ही भूमिका द्यावी असं सांगितलं होतं.
"या मालिकेत रावणाची भूमिका अभिनेते अमरीश पुरी यांनी करावी अशी सर्वांची इच्छा होती. मी केवटच्या पात्रासाठी ऑडिशन दिलं. त्यानंतर जेव्हा मी परत निघालो तेव्हा, माझी बॉडी लँग्वेज आणि अॅटिट्यूड पाहून रामानंद सागर, 'मला माझा रावण मिळाला', असं अरविंद म्हणाले होते.
सेटवर पोहोचण्यासाठी रेल्वेत उभं राहून प्रवास
अरविंद त्रिवेदी यांची भूमिका एवढी प्रभावी होती की, जेव्हा टीव्हीवर दशानन लंकेशच्या रुपात त्यांचा आवाज यायचा तेव्हा खरंच रावण टीव्हीच्या पडद्यावर उपस्थित असल्यासारखं वाटायचं.

फोटो स्रोत, Ramanand Sagar Foundation
रावणाच्या रुपात दिसणारं त्यांचं रुंद कपाळ आणि चेहऱ्यारील रागाचे भाव यामुळं हाच खरा रावण असं वाटू लागायचं.
रामायणच्या शुटिंग दरम्यानच्या काही आठवणी अरविंद त्रिवेदी यांनी यापूर्वी बीबीसीबरोबर बोलताना सांगितल्या होत्या.
रावण बनणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. शुटिंगसाठी तयार व्हायला त्यांना पाच तास लागत होते. केवळ त्यांच्या मुकुटाचंच वजन हे 10 किलो होतं. त्याशिवाय त्यांना इतर अनेक दागिने आणि जड वस्त्रदेखील परिधान करावी लागत होती, असं अरविंद यांनी सांगितलं होतं

फोटो स्रोत, Ramanand Sagar Foundation
"रामायणचं शुटिंग गुजरात-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या उमरगावमध्ये होत होतं. मी नेहमी रेल्वेतून मुंबईहून उमरगावला जात होतो. रेल्वेत अनेकदा जागाही मिळत नव्हती. त्यामुळं उभं राहून जावं लागत होतं. पण जेव्हा मालिका टीव्हीवर दिसू लागली, तेव्हा लोक मला रेल्वेमध्ये बसायला जागा देऊ लागले. मालिकेत पुढं काय होणार असं लोक विचारायचे. त्यावर तुम्ही अशीच मालिका पाहत पाहत राहा, तुम्हाला सर्वकाही समजेल असं मी त्यांना सांगायचो."
'रामभक्त रावण'
"मी प्रत्यक्ष जीवनात श्री रामांचा आणि शिवशंकराचा भक्त आहे. त्यामुळं मी जेव्हा शुटिंगसाठी सेट्वर जायचो, त्यादिवशी मी उपवास करायचो. कारण स्क्रिप्टनुसार मला श्रीरामांना वाईट-साईट बोलावं लागणार असायचं आणि त्याचं मला प्रचंड दुःख वाटत होतं," असं अरविंद म्हणाले होते.

फोटो स्रोत, Ekta Trivedi
"मी दिवसभर उपवास करायचो. शुटिंग होण्यापूर्वी मी श्रीराम आणि शंकराची आराधना करायचो, तर शूटिंग संपल्यानंतर कपडे बदलून मग मी उपवास सोडायचो. शूटिंगदरम्यान हीच माझी दिनचर्या होती," असं त्यांनी सांगितलं.
सेटवर हजारो लोकांचे अश्रू
प्रत्यक्ष जीवनातही अरविंद हे अरुण गोविल यांना प्रभू असं च म्हणत होते, असं त्यांनी सांगितलं होतं.
"या मालिकेनंतर मी लोकांसाठी अरविंद त्रिवेदी नव्हे, तर लंकापती रावण बनलो होतो. रावणाची भूमिका साकारून मी एवढा प्रसिद्ध होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. भारतच नव्हे तर विदेशातही लोक मला ओळखायला लागतील, माझं नाव लक्षात ठेवतील, असं कधीही वाटलं नव्हतं," असं त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Ramanand Sagar Foundation
"रामायण मालिकेचा अखेरचा भाग शूट होत होता, त्यादिवशी उमरगाव आणि त्याच्या जवळपास असलेल्या परिसरातील हजारो लोक सेटवर आले होते. सगळेच त्यादिवशी खूप रडले होते."
रामायणात रावणाची भूमिका निभावल्यानंतर अरविंद त्रिवेदी यांनी राजकारणात प्रवेश केला. 1991 मध्ये त्यांनी गुजरातच्या साबरकांठा लोकसभा मतदगारसंघातून विजय मिळवला.
2002 मध्ये त्यांना भारतीय सेन्सॉर बोर्ड (CBFC)च्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं.
मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अरविंद त्रिवेदी बहुतांश वेळ रामभक्तीमध्ये घालवत होते. कोरोना काळात त्यांच्या मृत्यूसंदर्भात अफवा उठल्याचंही पाहायला मिळालं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























