शक्तिमान : 'गंगाधर ही शक्तिमान है', आणि तो परत आलाय

फोटो स्रोत, Social media
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
तुमच्या बालपणातला 'शक्तिमान' उर्फ गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री आता सिनेमारूपात येतोय, अशी घोषणा सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल आणि मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंटरनॅशनल यांनी केली आहे.
पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री (हुश्श...! एका दमात म्हणून पाहा) हा शक्तिमानचा मूळ मानवी अवतार. हा गंगाधर 'आज की आवाज' या वर्तमानपत्रात फोटोग्राफर म्हणून काम करतो. इतर अनेक सुपरहिरोंप्रमाणेच आपल्या शक्तिमानचं मानवी रूपंही अगदी सर्वसाधरण... किंबहुना अजागळच.
मुकेश खन्नांनी गंगाधर आणि शक्तिमान या दोन्ही भूमिका रंगवल्या. कपाळावर आलेले केस, पुढे आलेले दोन दात, कधी हाफ शर्ट तर कधी टाय आणि सूट घातलेला गंगाधर.
तर लाल वेल्हेटचा बॉडी सूट आणि त्यावर सोनेरी पट्टे आणि शक्तिमानचा सूर्याचा लोगो अशा रूपातला, एक बोट वर करून आकाशात झेप घेणारा शक्तिमान ही दोन्ही पात्रं अतिशय लोकप्रिय झाली.
असं म्हटलं जातं की गंगाधर शास्त्रीच्या पात्राचं रूप हे अमेरिकन कॉमेडियन जेरी लुईस यांच्यावरून घेण्यात आलं होतं.
एरवी अजागळ वाटणारा, रिपोर्टर गीताच्या मागे फिरणारा हा गंगाधर कोणी अडचणीत आल्यास शक्तिमानचं रूप घ्यायचा.... डाव्या हाताचं एक बोट वर करत शक्तिमान आकाशात झेप घेई आणि मग वावटळीसारखा - भोवऱ्यासारखा फिरत त्या गरजू माणसापर्यंत पोहोचे.
कुंडलिनी योगाच्या मदतीने सामान्य गंगाधरमध्ये सुपरहिरोची शक्ती आल्याचं या सिरीयलच्या गाण्यातून सांगण्यात यायचं.
अंधेरा कायम रहे...
फक्त शक्तिमानच नाही तर शक्तिमानचे शत्रूही लोकप्रिय झाले, कारण या पात्रांची वेशभूषा तर आगळीवेगळी होतीच. पण यातल्या काही पात्रांना स्वतःचे खास असं संवादही होते.
शक्तिमानचा सगळ्यांत मोठा शत्रू होता तमराज किल्विश. धारदार नाक आणि टोकदार नखांची बोटं, काळे कपडे असणाऱ्या या किल्विशच्या तोंडी असणारं - अंधेरा कायम रहे, हे वाक्य तेव्हा अतिशय लोकप्रिय झालं होतं.

फोटो स्रोत, YouTube
याशिवाय 'पॉवर....' म्हणणारा डॉ. जयकाल, इलेक्ट्रिक मॅन, नताशा, कपाला, केकडा मॅन असे शक्तिमानचे भरपूर शत्रू होते.
शक्तिमानचा दूरदर्शन अवतार
सप्टेंबर 1997 ते मार्च 2005 अशी सुमारे 8 वर्षं शक्तिमान मालिका दूरदर्शनवरून प्रसारित होत होती. या मालिकेची निर्मिती मुकेश खन्नांच्याच 'भीष्म एन्टरटेन्मेंट'ने केली होती.
दिग्दर्शक होते दिनकर जानी. आठ वर्षांच्या काळात शक्तिमानचे तब्बल 520 एपिसोड्स दूरदर्शनवरून प्रसारित झाले.
शक्तिमानच्या करामती दाखवताना त्यासाठी वापरण्यात आलेले इफेक्ट्स ही या शोची खासियत होती. खरंतर मुकेश खन्नांच्या मनात टर्मिनेटर किंवा सुपरमॅन सिनेमासारखे इफेक्ट होते. पण त्याकाळी भारतात हे शक्य झालं नाही आणि खन्नांना उपलब्ध टेक्नॉलॉजीत भागवावं लागलं.
सध्याच्या VFX च्या जमान्यामध्ये शक्तीमान पाहताना ही गोष्ट नक्कीच विचित्र वाटेल, पण 90च्या दशकाच्या उत्तरार्धात शक्तिमानच्या या ग्राफिक अॅक्शन्स - त्याचं वावटळीसारखं गरगर फिरणं वा झेप घेणं अतिशय लोकप्रिय होतं.

फोटो स्रोत, YouTube
शक्तिमानची लोकप्रियता
तसं पहायला गेलं तर शक्तिमान पहिला भारतीय सुपरहिरो. त्यापूर्वी मिस्टर इंडिया मोठ्या पडद्यावर अवतरला होता, किंवा मग कॉमिक्सद्वारे नागराज मर्यादित प्रमाणात वाचकांना माहीत होता. ठकठकमधून भेटणारा 'दिपू - दि ग्रेट' मराठी वाचकांच्या ओळखीचा होता.
पण परदेशी सुपरमॅन वा स्पायडरमॅनसारखे हे सुपरहिरो लोकप्रिय नव्हते. आणि भारतातही हे स्पायडरमॅन वा सुपरमॅन ठराविक वर्गापर्यंतच पोहोचलेले होते.
शक्तिमानच्या रूपाने पहिला भारतीय सुपरहिरो उदयाला आला. स्पायडरमॅनसारखाच हा शक्तिमानदेखील एरवी सामान्य रूपात वावरायचा. सामान्य वाटणाऱ्या गोष्टी आणि चुका करायचा. म्हणूनच हा सुपरहिरो गावागांवत पोहोचला.
या शक्तिमानची कॉमिक बुक्स नंतर राज आणि डायमंड कॉमिक्स प्रकाशनाने छापली.
शक्तिमानचा ड्रेसही वेशभूषा स्पर्धांमध्ये लोकप्रिय झाला. शक्तिमानचे स्टिकर्स आणि इतर मर्चंडाईज याचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

फोटो स्रोत, YouTube
या ओरिजनल भारतीय सुपरहिरोची लोकप्रियता इतकी मोठी होती की दूरदर्शनवर ही मालिका पाहणाऱ्या पिढीच्या नंतरच्या मुलांसाठी Sonic या वाहिनीवर २०११मध्ये शक्तीमान अॅनिमेटेड रूपातही आला.
गेल्या वेळच्या कॉमिक कॉनदरम्यान शक्तिमानच्या 3D अॅनिमेटेड सीरिजचीही घोषणा करण्यात आली होती.
सॉरी शक्तिमान
शक्तिमान पाहत मोठ्या झालेल्या पिढीच्या तोंडात आजही हे शब्द अनेकदा येतात. कारण या मालिकेच्या लोकप्रियतेच्या एका टप्प्यावर शक्तिमान संपल्यानंतर १५ मिनिटांचं एक विशेष सेगमेंट प्रसारित होऊ लागलं होतं. या सेगमेंटचं नावच होतं - सॉरी शक्तिमान.
शक्तिमान लोकप्रियतेच्या भरात असताना ही मालिका पाहणारी अनेक मुलं शक्तिमानचे स्टंट्स घरात करून पाहू लागली, शक्तिमानसारख्या गिरक्या घेऊ लागली, त्यात जखमी होऊ लागली.
गावांमध्ये गवताच्या पेंढ्या रचून त्यावर उड्या मारणं हा लोकप्रिय खेळ झाला.
किंवा मग शक्तिमान खरा आहे, आपल्याला वाचवायला येईल म्हणून बिल्डिंगवरून मुलांनी उड्या मारल्याच्याही बातम्या आल्या. या सगळ्यानंतर मग मालिकेच्या शेवटी 15 मिनिटं एक विशेष सेगमेंट सुरू करण्यात आलं.

फोटो स्रोत, YouTube / Ultra
स्वतः शक्तिमान या वेळात मुलांना समजवत असे. शक्तिमान कसा काल्पनिक आहे, त्याचे खरे भासणारे स्टंट कसे 'ग्रीन स्क्रीन'वर केले जातात, याविषयी सांगण्यात येऊ लागलं. ग्राफिक्स वापरून तयार होणाऱ्या मालिकेच्या दृष्टीने ही मोठी गोष्ट होती.
या सगळ्यासोबतच शक्तिमान नंतर मुलांना एकूण बरं - वाईट समजावून सांगू लागला. शक्तिमानच्या 'नैतिक शिक्षणा'चं हे सॉरी शक्तिमान घोषवाक्यंही पुढे इतकं लोकप्रिय झालं, की लोकांच्या बोलण्यात येऊ लागलं.
याच 'Sorry Shaktiman' नावाने सध्या एक युट्यूब चॅनल सुरू आहे. मुकेश शर्मांनीच हे युट्यूब चॅनल सुरू केलं असून याद्वारे शक्तिमान मुलांना अनेक गोष्टी समजावून सांगतो.
शक्तिमानचं पुनःप्रसारण
कोरोना काळात रामायण आणि महाभारत पुन्हा प्रसारित करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांनी शक्तिमान दाखवण्यात येण्याची मागणी केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तर १३० कोटी भारतीयांना लवकरच शक्तिमान पुन्हा पाहता येणार असल्याचं मुकेश शर्मांनी २९ मार्चला ट्वीट केलं होतं. १ एप्रिलपासून दुपारी १ वाजता त्याचं पुन्हा प्रसारण करण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
शक्तिमान पुन्हा दाखवण्यात येणार असल्याचं समजल्यानंतर सोशल मीडियामध्ये आता याविषयीचे मीम्सही फिरायला लागले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
सुपरहिरोंचा इतिहास
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पहिला सुपरहिरो म्हणून १९३६मध्ये आलेल्या फँटमची नोंद आहे.
१७ फेब्रुवारी १९३६मध्ये पहिल्यांदा वर्तमानपत्रातल्या कॉमिक स्ट्रिपद्वारे फँटमचं पदार्पण झालं. मास्क आणि जांभळ्या रंगाचा सूट घालून 'फँटम'चा अवतार घेणाऱ्या किट वॉकरची ही गोष्ट होती. त्यानंतर मग आता लोकप्रिय असणाऱ्या इतर सुपर हिरोंचं पदार्पण झालं.
पण डॉक्टर मँड्रेक द मॅजिशिय १९३४मध्ये प्रसिद्ध होऊ लागल्याने हाच खरा पहिला सुपरहिरो असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























