शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानंतर मुख्याध्यापकानं पत्नीसह 2 मुलांची हत्या करत संपवलं जीवन

फोटो स्रोत, Kiran Aware
- Author, जीवन बोधले
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
(या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात.)
सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यात एका मुख्याध्यापकाने स्वतःच्या 2 मुलांसह पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी आपले जीवन संपवल्याची घटना 11 जून रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
योगेश पाटील असं या शिक्षकाचं नाव असून ते नंदुरबार जिल्ह्यात एके ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक होते.
सुट्टीसाठी ते त्यांच्या सोलापूरमधील गावी आले होते. मात्र, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमध्ये झालेल्या मोठ्या तोट्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे पोलिसांनी बीबीसी मराठीला सांगितले.
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)
नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी रात्री (11 जून) ही घटना घडल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दाखल करुन घेतलेल्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, योगेश पाटील यांना 1 कोटी 80 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे.
आपल्या पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मृत योगेश पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
'शेअर मार्केटमधील तोटा'
योगेश पाटील यांचे मित्र सोमनाथ घायतिडक यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.
ते म्हणाले, "गेल्या 6 महिन्यांपासून ते शेयर मार्केटमध्ये पैशांची उलाढाल करत होते. पण, अचानकच त्यांना शेयर मार्केटमध्ये मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्यांनी संपूर्ण कुटुंबाला संपवून स्वतःचे जीवन संपवले."
आपल्या आईकडूनही त्यांनी PF चे पैसे घेतले होते. तसेच, काही मित्रांकडून देखील त्यांनी काही पैसे घेतले होते. हे सर्व पैसे त्यांनी शेयर मार्केटमध्ये गुंतवलेले होते, असंही सोमनाथ घायतिडक यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Kiran Aware
कुटुंबीयांनी काय सांगितलं ?
योगेश बाळासाहेब पाटील यांच्या आई संगीता पाटील यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला.
त्यांनी सांगितलं, "माझ्या मुलाने असं करायला नको होतं. काहीतरी मार्ग निघाला असता."

फोटो स्रोत, Kiran Aware
शरद साळुंखे हे मृत योगेश पाटील यांचे मामा आहेत.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "त्यानं खूप चुकीचा निर्णय घेतला. लहानपणापासून त्याचे खूप हाल झाले होते. खूप संघर्ष करून त्यानं हे सगळं कमावलं होतं. 2 लेकरं आणि बायको एवढ्या पुरतंच मर्यादित त्याचं कुटुंब होतं."
"हे करण्यापूर्णी त्यानं कुणाला तरी बोलायला हवं होतं. तो खूप एकलकोंडा झाला होता. जास्त कुणाशी बोलत नव्हता. शेअर मार्केटमध्ये झालेल्या लॉसमुळे त्यानं हे पाऊल उचललं," असंही त्यांनी सांगितलं.
दूधवाल्यामुळे घटना उघडकीस
योगेश पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत बार्शी तालुक्यातील हत्तीज या गावी त्यांच्या घरी राहत होते.
सुट्टीच्या निमित्ताने ते गावी आलेले असल्याने नेहमी प्रमाणे रोज सकाळी दूध द्यायला येणाऱ्या माणसाने त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला.
पण, घरातून काहीच आवाज न आल्याने साशंकतेने गावकऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडण्यात आला. यानंतर ही घटना समोर आली.
पोलीस तपासात काय समोर आलं ?
या घटनेची नोंद वैराग पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणासंदर्भात माहिती दिली.

फोटो स्रोत, Kiran Aware
आपले जीवन संपवण्यापूर्वी योगेश पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठीही मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्या आईची माफी मागितली असून 'तू दिलेल्या पैशांचा चुकीचा वापर मी केला असून समाजात तोंड दाखवायला मला जागा राहिलेली नाही,' असा उल्लेख केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
महत्त्वाची सूचना: शेअर बाजारातील गुंतवणूक संदर्भातील प्रश्नांची उत्तरं
शेअर बाजारात गुंतवणूक करणे सुरक्षित असते का? यावर बीबीसी मराठीने सविस्तर लेख लिहिला आहे. तो तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
(हा लेख केवळ माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























