You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठी साहित्य संमेलन: द. मा. मिरासदारांनी भोकरवाडीचं जग कसं उभं केलं?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
(आजपासून नाशिकमध्ये आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. द. मा. मिरासदार हे मराठीचे प्रतिष्ठित साहित्यिक होते आणि ते परळी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. त्या निमित्त हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)
द. मा. मिरासदार गेल्याचं कळलं. बऱ्याचदा फेसबुकवर काहीतरी येतं आणि वाटतं नाही हे खोटं असेल. कदाचित काही चूक असेल. पण नंतर कळतं ते खरंच होतं.
मिरासदारांचं वय 95 होतं पण ते गेलं नसतील असं वाटण्याचं कारण म्हणजे नुकताच सुट्टीला गेलो होतो तेव्हा त्यांची पुस्तकं पुन्हा वाचण्यात आली. त्या गोष्टी डोक्यात इतक्या ताज्या आहेत की वाटतच नाही मिरासदार गेले म्हणून.
कुणी प्रसिद्ध व्यक्ती गेल्यावर म्हटलं जातं की अमुक क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसान झालं. कधीकधी ते शब्द इतके वरवरचे वाटतात की काही फील होणंच बंद होऊन जातं.
पण मिरासदार गेल्यावर फक्त म्हणावं नाही वाटत तर हे फील होतंय की मराठी साहित्याचं मोठं नुकसान झालं.
मिरासदार परळीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते तेव्हा त्यांचं नाव पहिल्यांदा ऐकलं होतं. तेव्हा मी आठवीला होतो. आमचे मराठीचे सर साहित्य संमेलनाला गेले होते आणि तिथून त्यांनी मिरासदारांची दोन पुस्तकं आणली होती. त्यांच्याकडून घेऊन ती वाचली होती. एक 'फुकट' होतं आणि दुसरं 'भुताचा जन्म'.
गोष्टी कुणाला आवडत नाहीत? हॉस्टेलमध्ये मोकळ्या वेळेत मिरासदारांची ही दोन्ही पुस्तकं मित्रां-मित्रांमध्ये मोठ्याने वाचल्या होत्या. कारण नेहमी असं व्हायचं की त्यांचं पुस्तक वाचताना मी एकटाच हसायचो.
तेव्हा कुणीतरी विचारणारच काय झालं रे का हसतोय इतका. तेव्हा सांगितलं अरे गोष्टच अशी आहे. मग आम्हालाही वाचून दाखव ना असं कुणी म्हणायचं आणि ती मैफल नकळतच सुरू व्हायची. तेव्हापासून मिरासदार आवडू लागले.
2004 ला औरंगाबादला साहित्य संमेलन झालं होतं. तेव्हा मिरासदारांचा कथाकथनाचा कार्यक्रम होणार म्हणून मी मुद्दामहून परभणीहून गेलो होतो. त्यांच्याच पुस्तकावर त्यांच्याकडून सही घेण्यासाठी बरीच धडपड केली होती. कथाकथनाचा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना सह्या दिल्या होत्या.
त्या कार्यक्रमात त्यांनी 'बाबू मैलकुल्याचे धोक्याचे वळण' ही गोष्ट सांगितली होती. त्यांची कथाकथनाची स्टाइल म्हणजे गप्पा मारता मारता ते गोष्ट सुरू करत असत. लक्षात पण येत नाही की वेगळी गोष्ट सुरू केली आहे.
अरेबियन नाइट्ससारखं एकातून दुसऱ्या गोष्टीत जात गप्पा रंगवत रंगवत ते कथाकथन करत.
1924 साली जन्म झालेल्या मिरासदारांच्या 200 हून अधिक कथा असतील. या कथा आता मेहता पब्लिकेशन्सने नव्याने छापल्या आहेत. मधला काळ त्यांची पुस्तकं मिळत नव्हती. पण हा नवीन सेट आल्यापासून या कथा 20-22 पुस्तकांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.
काही स्फुट लेख आहेत, एक अनुवादित कादंबरी आणि एक डाव भुताचा, गोष्ट धमाल नाम्याची सारख्या चित्रपट कथा त्यांच्या नावावर आहेत.
1950 साली त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली होती. 1952 साली त्यांची नावेतील तीन प्रवासी ही अनुवादित कादंबरी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून त्यांचं लिखाण नियमितपणे दिवाळी अंकात येऊ लागलं. औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने फक्त कथा लिहिल्याच नाहीत तर त्या गावोगाव पोहोचवल्या. त्या सांगायला जाताना पण त्यांना अनेक माणसं भेटली आणि त्याच्या पुन्हा कथा झाल्या.
मिरासदारांच्या कथा वाचता वाचता माणूस त्यात हरवून जातो. कधीकधी हसून हसून वाट लागून जाते तर कधी कधी मन सुन्न देखील होऊन जातं. त्यांच्या गंभीर कथा मोजक्याच आहेत.
जास्त विनोदी कथाच आहेत. पण ज्या गंभीर कथा आहेत त्यांच्यात आपल्याला सुन्न करण्याची ताकद देखील आहे.
मिरासदारांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातला अकलूजचा. त्यांचे वडील हे वकील होते. ते पंढरपूरला राहत. तिथे त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी कित्येक लोक येत. त्यांच्याकडे पाहात पाहात त्यांचं निरीक्षण करत त्यांच्या गप्पा ऐकत ऐकत मिरासदार मोठे झाले.
आपल्याला पंढरपूरने घडवलं याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. यात्रेच्या गावामुळे माणसांची सवय लागली. त्यांच्यात मन रमू लागलं आणि मला कथेला विषय सुचत गेले असं ते सांगत.
भोकरवाडीचे जग
प्रत्येक लेखक त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपलं एक जग तयार करतो. प्रत्यक्ष जीवनात पाहिलेले, अनुभवलेले लोक आणि प्रसंगांचं त्याच्या व्यक्तिमत्त्वासारखं आकलन करून त्याच्या जगात नेत असतो.
तसं मिरासदारांचं जग हे 'भोकरवाडी' होतं. भोकरवाडी म्हणायला गेलं तर एक काल्पनिक गाव आहे आणि म्हटलं तर महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव आहे. तिथं सगळ्या प्रकारची माणसं भेटतील.
शिवा जमदाडे, नाना चेंगट, गणा मास्तर, आनशी, गावचे पाटील-कुलकर्णी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बाबू पैलवान, या सर्वांना घेऊन या गोष्टी घडत. शहरीकरणाने गावं बदलली, लोकांचे आपसांतील नातेसबंध बदलले यामुळे कधी जीवनात भकासपणा, एकटेपणा आला तर कधी त्यामुळे आयुष्य रंगतदार बनले.
मिरासदारांच्या गोष्टींचे वैशिष्ट्य असं की त्यांनी ही घालमेल पकडली आणि आपल्या पात्रांच्या आयुष्यात ती टाकली.
बाबू पैलवान, नाना चेंगट हे असे लोक आहेत जे आजूबाजूच्या गावात काय चाललंय हे पाहतात आणि आपल्या गावात ते व्हावं अशी त्यांची इच्छा असते.
कधी ते रसवंती टाकून पाहतील, कधी बाबू पैलवान उपोषणाला बसेल, तर कधी त्यांच्या गावात तेलाची विहीरच सापडेल, कधी काय होईल त्याचा नेम नाही. त्यातून तयार होणाऱ्या गमतीजमती आणि त्याच्यावरच या नमुनेदार लोकांची निरीक्षणं आपल्याला वाचायला मिळतात. मिरासदारांच्या भोकरवाडीतले हे लोक आपल्या दिनचर्येत गढून गेलेले असतात.
आयुष्यात काही नवीन होत नाही याची बहुतेकांना असते. गणा मास्तर पेपर वाचून दाखवतात तेव्हा तर हे दुःख त्यांना अधिकच जाणवतं. दुसऱ्या गावांमध्ये काय काय होतं आणि आपल्या गावात साधं हे सुद्धा होऊ नये हे सुद्धा असं ही मंडळी नेहमी म्हणते.
वरवर हे विनोदी वाटतं पण आपण मागे राहिलोत ही सल त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते.
शहरात पाहिलेली गोष्ट आपल्याच कशी समजते आणि आपण कसे एक्स्पर्ट आहोत हे तर प्रत्येक जण आपल्या पद्धतीने दाखवणार. कुणी तालुक्याच्या गावावरून इंग्रजी पिक्चर पाहून येणार आणि चावडीवर त्याची 'श्टोरी' तीन चार दिवस सांगत बसणार.
हिरो-हिरोईनमधला किसिंग सिन रंगवून सांगताना नेमका कुणीतरी मध्येच बोलणार पण हे समदं थेट चालतं का? त्यावर ती गोष्ट सांगणाऱ्याचे उत्तर असतं 'तर मंग, अॅशेम्ब्लीमध्ये तसा कायदाच पास झालाय तिकडं.'
कारुण्यातून तयार झालेला विनोद
मिरासदारांनी लिहिलेल्या या गोष्टी वाचल्या की वाटतं ही सगळी माणसं जिवंतच आहेत. गप्पा मारणं आणि त्यातून गोष्टी तयार करणं हेच त्यांचं काम आहे.
मिरासदारांना गप्पांचे वेड होते असं त्यांनी त्यांच्या लेखांतून कित्येक वेळा सांगितलं आहे. त्यांच्या या गप्पांच्या वेडाचेच प्रतिबिंब या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळते.
गप्पांच्या आवडीतून गोष्टी तयार झाल्या की गोष्ट सांगण्याच्या आवडीतून ते गप्पा मारू लागले हे निश्चित करता येणार नाही. कोंबडी आधी की अंडं आधी असा हा प्रश्न आहे. म्हणून मिरासदारांच्या बहुतेक गोष्टी या गप्पा मारणाऱ्या पात्रांतूनच बाहेर येताना दिसतात.
चावडीवर बसलेले लोक. त्यात एखादा येतो आणि सांगतो लका, काय झालं माहित्येय का. आणि तिथून गोष्टीला प्रारंभ होतो. गोष्ट साधीच असते पण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी.
तर काही वेळा लोक एकदम साधे पण त्यांची गोष्टच अद्भुत. तसाच आपला नाना घोडके. दिसायला एकदम साधा गडी पण त्याने आयुष्यात ज्या गोष्टी केल्या आहेत त्याची कल्पना तुमच्या आमच्या सारख्या मर्त्य माणसाला कधीच येणार नाही.
त्याने भुताशी झुंज केली आहे, वेताळाची पालखी पाहिली आहे, वाघ-सिंह तर जाता येता त्याला नमस्कार घालतात पण नानाला एका गोष्टीची खंत आहे ती म्हणजे वय होत चाललं पण लग्न काही झालं नाही.
यातून मिरासदारांच्या 'नव्व्याण्णबादची एक सफर' या गोष्टीचा जन्म झाला आहे. ही गोष्ट केवळ मिरासदारांची सर्वोत्कृष्ट कथा नाही तर सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा आहे असं प्रसिद्ध विनोदी लेखक बाळ गाडगीळ यांनी त्यांच्या 'विनोद तत्त्वज्ञान' या पुस्तकात म्हटलं आहे.
अतिशयोक्तीचा वापर
विनोदी लेखक आणि अतिशयोक्ती हा अलंकार वापरणार नाही असं म्हणणंच अतिशयोक्तीचं ठरू शकतो. प्रत्येक विनोदी लेखक आपल्या भात्यातलं हे हत्यार वापरतो. पण मिरासदारांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी टोक गाठू शकतात.
वाचताना आपल्या लक्षातही येणार नाही पण नंतर ही गोष्ट लक्षात येते. तोपर्यंत गोष्टीने तिचा डाव साधलेला असतो. त्यांची 'माझ्या बापाची पेंड' ही गोष्ट घ्या ना.
एखादा छोटा मुलगा गांजा खाऊन वर्गात गेला तर काय होईल आणि इतकंच नाहीतर त्याच्या मास्तराने तो खाल्ला तर काय होईल. याचा कल्पनाविस्तार ते करत जातात आणि ती कथा वाचता वाचता आपलं हसून हसून पोट दुखू लागतं.
'आमच्या स्वयंपाकीण बाईचा नवरा', 'शिवाजीचे हस्ताक्षर', 'माझ्या बापाची पेंड' यामध्ये त्यांनी लहान मुलांच्या निरागसतेची अतिशयोक्ती दाखवली आहे.
एखाद्या माणूस भोळा आहे हे मिरासदार कसं सांगतील. तर हा भोळसट माणूस समोरच्या माणसाला विचारू शकतो जाण्यासाठी दोन कोस आहे तर परत येण्यासाठी पण दोन कोसच आहे का? अतिशयोक्तीचा कहर म्हणजे त्यांची 'निरोप' ही कथा.
इनामदाराची बायको अवघडली आहे, कोणत्याही क्षणी ती बाळंतीण होऊ शकते. तिच्या डिलेव्हरीसाठी एखादी डॉक्टर बाई पाहिजे असा निरोप शहरात जाऊन द्यायचा असतो. भोकरवाडीतले लोक तो कसा पोहोचवतील? हे प्रत्यक्ष वाचणंच मजेशीर आहे.
मनाला सुन्न करणाऱ्या गोष्टी
गमतीशीर कथा लिहिणाऱ्या मिरासदारांनी मनाला चटका लावणाऱ्या कथा देखील लिहिल्या आहेत. सोन्या बामण, रानमाणूस, भावकी, गवत, कोणे एके काळी, नेम या गंभीर कथा मिरासदारांनी लिहिल्या आहेत.
मरणाच्या दारात असलेल्या मुलावर खर्च करावा वाटू नये असणारा बाप त्यांनी रानमाणूसमध्ये रंगवला आहे. किती केलं तरी तो वाचणार नाही कशाला पैसा खर्चायचा असं वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा या कथेचं नाव रानमाणूस का दिलंय हे कळतं.
भावकीतली भांडणं किती निरर्थक असतात आणि त्याचा लहान मुलांवर कसा परिणाम होतो हे दाखवणारी भावकी, अनाथ सोन्या जगण्यासाठी काय काय करतो हे दाखवणारी सोन्या बामण या एकाहून एक चांगल्या गंभीर कथा मिरासदारांनी लिहिल्या आहेत.
तोच तोच पणा?
दोनशेहून अधिक कथा लिहिणाऱ्या मिरासदारांच्या सर्वच कथा श्रेष्ठ आहेत असं नाही. काही कथांमध्ये तोच तोच पणा येतो. टगेवाडी फेस्टिवल सारख्याच इतर दोन चार कथा त्यांनी लिहिल्या आहेत.
'टगेवाडीचाच फेस्टिवल' मग भोकरवाडीतही दिसतो. तिथंही तसेच परिसंवाद झडतात फक्त थोडे फार संदर्भ बदलतात.
मंत्र्यांसाठी असलेले क्लासेस, त्यांची फजिती हे पुन्हा पुन्हा वाचल्यासारखं वाटतं. विनोदी कथा लिहिणं हा काही 'विनोद' नाही असं मिरासदार म्हणायचे.
विनोदी लेखकाला विनोद लिहिण्यासाठी, सुचण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतात दरवेळीच सगळी भट्टी जमून येईल असेही नाही आणि वाचणाऱ्याच्या मूडवर पण ते अवलंबून आहे.
पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या 'गोळाबेरीज' मध्ये म्हटलं होतं ते म्हणत की प्रत्येक बॉलवर सिक्स मारला जाऊ शकत नाही. प्रत्येकच वेळी विनोद घडेल असं सांगू शकत नाही. तसंच मिरासदारांच्या गोष्टींचीही आहे. काही काही गोष्ट आपण वाचत जातो त्यात काहीच होत नाही पण एखादी गोष्ट समोर येते तेव्हा आपली हसून हसून पुरती वाट लागून जाते.
'पंढरपूरचे मिरासदार'
त्यांच्या स्फुट लेखनातून त्यांनी पंढरपूर कसं होतं, तिथले यात्रेकरू, तिथले यजमान यांचं वर्णन केलं आहे. भक्तीरसात सदैव डुंबलेल्या पंढरपूरमध्ये वाळवंटात लढाई व्हायची.
ही गोष्ट त्यांच्या लिखाणातूनच समजली. नारळ, कवठ यातला आत भाग काढून त्यात दारूगोळा भरला जाई आणि एकमेकांवर फेकला जाई. कलगीवाले आणि तुरेवाले या दोन गटात ही लढाई व्हायची.
या लढाईची तयारी पाच-सहा महिन्यापासून तालिमीत व्हायची. लोक भाजून निघायचे पण खेळायचे असा तो प्रकार होता. अशा अनेक गोष्टी मिरासदारांमुळे मला समजल्या.
मिरासदार औरंगाबादमध्ये राहिले, कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे पूर्ण महाराष्ट्र भटकले, चित्रपट कथा लेखनाच्या निमित्ताने मुंबई चित्रपटसृष्टी पाहिली, नंतर पुण्यात वास्तव्य केलं पण ते खरे पंढरपूरचेच होते.
या गावाशी असलेला जिव्हाळा त्यांच्या लिखाणातून नेहमी जाणवतो. आज ते जग सोडून गेले आहेत. त्यांच्या श्रद्धेनुसार आज ते विठोबासोबत आहेत.
गेल्या 95 वर्षांत पृथ्वीवर काय काय झालं हे खास त्यांच्याच शैलीत ऐकून घेण्यासाठीच विठोबाने त्यांना आपल्याजवळ बोलावून घेतलं असं वाटतंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)