You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठी साहित्य संमेलन यंदा होणार का? आणि झालं तर कुठे होणार?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
जानेवारी महिना साहित्यिक आणि वाचकांसाठी पर्वणी ठरतो कारण याच काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असतं. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे साहित्य संमेलन होणार आहे का, आणि झालंच तर कुठे होणार हा प्रश्न उभा राहिला आहे.
यंदाच्या संमेलनासाठी सुरुवातीपासूनच दिल्ली आणि नाशिक ही दोन नावं चर्चेत होती. 94 व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि लोकहितवादी मंडळ या दोन संस्थांनी प्रस्ताव पाठवले होते. तसंच दिल्लीच्याही सरहद संस्थेने प्रस्ताव पाठवला होता.
साहित्य महामंडळाचा कल नाशिककडे झुकायला लागल्यानंतर सरहद संस्थेने महामंडळाला पत्र पाठवून आपल्या प्रस्तावाची आठवणही करून दिली होती.
रविवारी, 3 जानेवारीला मराठवाडा साहित्य परिषदेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. याच बैठकीत स्थळनिश्चिती समिती नेमण्यात आली. या समितीचे सदस्य गुरूवार, 7 जानेवारीला नाशिकमध्ये स्थळांची पाहाणी करणार आहेत. त्यानंतर 8 तारखेला ही समिती आपल्या शिफारशी सादर करेल. त्यानंतरच साहित्य संमेलन कुठे होणार हे ठरणार असल्याचं असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
'महाराष्ट्रदिनी दिल्लीत संमेलन व्हावं'
दिल्लीत मराठी साहित्य साहित्य संमेलन व्हावं असा प्रस्ताव पाठवणाऱ्या सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "हे महाराष्ट्राच्या स्थापनेचं हीरकमहोत्सवी वर्ष होतं आणि यंदा 61 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र दिनी दिल्लीत संमेलन व्हावं अशी आमची इच्छा आहे."
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एकदाही दिल्लीत संमेलन झालं नाहीये. "मराठी भाषा आणि मराठी माणूस स्वतःपुरतं पाहात नाही, तो समाजाचा विचार करतो आणि देशावर आता अशी वेळ आलेली आहे, की महाराष्ट्राने देशाचा विचार करावा. साहित्याच्या माध्यमातून दिल्लीत जर आपण हे घडवू शकलो, तर ही एक चांगली संधी आहे. हे लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीचं वर्ष आहे, पानिपतच्या युद्धाला 260 वर्ष होत आहेत.
"हे महाराष्ट्राचं संमेलन आहे. देशात आज विचारमंथनाची परिस्थिती आहे. आत्ता महाराष्ट्राच्या भूमिका, साहित्यिकांचा आवाज हा दिल्लीत पोहोचला पाहिजे. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आवाज साहित्य महामंडळाच्या माध्यमातून छान जाऊ शकतो, ही आमची भावना आहे," असंही ते पुढे बोलताना म्हणाले.
नाशिकमधल्या स्थळांची चाचपणी?
साहित्य वर्तुळातल्या अनेकांचं मत आहे की साहित्य संमेलन नाशकातच होण्याची दाट शक्यता आहे. स्थळनिश्चिती समिती 7 जानेवारीला नाशकातल्या अनेक जागांची पाहाणी करणार आहे. त्याबरोबरच निधी संकलन, मनुष्यबळ, जागा, निमंत्रितांची व्यवस्था अशा अनेक गोष्टींची माहिती घेतली जाणार आहे.
सरकारी नियमांचं पालन करून किती लोकांना प्रवेश देता येऊ शकतो, त्यानुसार कुठली जागा सोयीस्कर ठरेल यावरून जागा निश्चित केली जाईल.
नाशकात संमेलन झालं तर लोकहितवादी मंडळ आयोजक असेल कारण सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा एक खटला न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यांना आयोजकत्व देता येत नसल्याचं साहित्य महामंडळाने स्पष्ट केलं आहे.
नाशिकमधल्या डोंगरे वसतीगृह, गोखले एज्युकेशन सोसायटी कॅम्पस, तपोवन, केटीएचएम कॉलेज, ठक्कर डोम अशा जागांचा विचार केला जाऊ शकतो.
लोकहितवाही मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, 3 जानेवारीला पार पडली. या सभेत बोलताना मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की, "महामंडळाला 31 मार्चच्या आधी नियंत्रित स्वरूपाचे संमेलन घ्यायचे आहे, त्यामुळे जर नाशिकला संमेलन घ्यायचं ठरलं तर आपल्याकडे दोनच महिन्यांचा कालावधी असेल, अशातही आपण संमेलन यशस्वी करून दाखवू."
संमेलन होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात सगळे मोठे इव्हेंट रद्द झाले, गर्दीवर मर्यादा आल्या अशात यंदाचं साहित्य संमेलन होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. सुरुवातीला साहित्य संमेलन नको अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने घेतली होती. पण आता मात्र संमेलन नक्कीच होईल असं अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी बीबीसीशी बोलतना सांगितलं.
"शासनाचे सगळे नियम पाळून संमेलन होईल. दर दोन सत्रांच्यामध्ये सॅनिटायझेशन, पुस्तक प्रदर्शनात मोठे रस्ते, कमी गर्दी अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातील. नियंत्रित स्वरूपात हे साहित्य संमेलन होईल. यंदा आम्ही कमी साहित्यिकांना आमंत्रित करू, पुस्तक प्रदर्शनात कमी प्रकाशक असतील. पण संमेलन होईल. हे लक्षात घ्या, साहित्य संमेलन हे फिजिकलच व्हायला हवं. ते ऑनलाइन होऊ शकत नाही. ऑनलाइन फार फार तर भाषण होऊ शकतं."
संमेलनाला सरकारकडून परवानगी मिळेल का या प्रश्नांच उत्तर देताना ठाले-पाटील म्हणाले की, "शासनाकडूनच आम्हाला अनेकदा विचारणा झालीये की साहित्य संमेलन कधी होणार, कुठे होणार. याचाच अर्थ त्यांनी हे गृहित धरलं आहे की संमेलन होणार आहे."
संमेलन लोकांसाठी
सर्वसामान्य लोकांकडून वारंवार विचारणा झाल्यामुळे संमेलनाचा घाट घातल्याचं ठाले-पाटील यांनी स्पष्ट केलं. "संमेलन लोकांसाठी असतं. लोकांची इच्छा नसेल तर होणार नाही, पण आम्हाला असंख्य लोकांचे फोन आले, माध्यमांमध्ये बातम्या आल्या की संमलेन व्हावं. यंदाच्या संमेलनाला गर्दीही कमी असेल. रसिक लोकच हजेरी लावतील असं मला वाटतं," ते पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)